आर्यन खान प्रकरणी चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

• 02:32 PM • 05 Nov 2021

आर्यन खान प्रकरणात चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्याशी आज तकने संपर्क साधला. ज्यानंतर त्यांनी आज तकला फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले आहेत समीर वानखेडे? मी मुंबई एनसीबीचा झोनल डायरेक्टर आहे, यापुढेही असणार आहे. माझ्याकडून हे पद काढून घेण्यात आलेलं […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खान प्रकरणात चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्याशी आज तकने संपर्क साधला. ज्यानंतर त्यांनी आज तकला फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत समीर वानखेडे?

मी मुंबई एनसीबीचा झोनल डायरेक्टर आहे, यापुढेही असणार आहे. माझ्याकडून हे पद काढून घेण्यात आलेलं नाही. आर्यन खान प्रकरणी माझ्यावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. त्यामुळे नवाब मलिकांनी केलेल्या आऱोपांची आणि आर्यन खान प्रकऱणाची चौकशी SIT कडून चौकशी करावी असं मीदेखील सुचवलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण माझ्याकडून काढून घेतलं हे एक प्रकारे बरंच झालं. मी ड्रग्ज प्रकरणात ज्या काही खास मोहिमा असतील त्या राबवत राहणार. मला दिल्लीत बोलवण्यात आलेलं नाही. मात्र मला या केसमधून वेगळं करण्यासाठीची ऑर्डर समोर मला मिळाली आहे.

2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकून समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणी कारवाई केली. यामध्ये त्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक केली. तसंच मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह एकूण आठ जणांना अटक केली. आर्यन खानला 28 ऑक्टोबरला जामीन मिळाला आणि तो ३० ऑक्टोबरला तुरुंगाबाहेर आला. त्यानंतर मुनमुन धमेचा आणि अरबाझ यांनाही जामीन मिळाला. समीर वानखेडे यांनी केलेल्या या कारवाईची चर्चा देशभरात झाली. याचं कारण म्हणजे समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप.

समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून काय काय आरोप केले आहेत?

समीर वानखेडे यांनी क्रूझवर केलेली कारवाई हा सगळा बनाव आहे, शाहरुखच्या मुलाला टार्गेट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोटी जात प्रमाणपत्रं सादर केली आणि त्याद्वारे नोकरी मिळवली.

समीर वानखेडे हे ७० हजारांचा शर्ट, दोन लाखांचे बूट वापरतात.

समीर वानखेडे मालदिव्सला गेले होते तिथे त्यांनी बॉलिवूडच्या कलाकारांसोबत डील केलं होतं

समीर वानखेडे यांना मेहुणा आहे, तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्यांचं कुटुंबही मुस्लिम आहे.

वानखेडेंनी बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली.

किरण गोसावी एका गुन्ह्यात फरार आहे तो पंच कसा काय?

मनिष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता क्रूझवर काय करत होता?

समीर वानखेडे यांनी निकाह केला होता, त्यानंतर त्यांचा तलाक झाला तो त्यांनी लपवला याचं कारण काय?

असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले होते.

के.पी. गोसावींनी केलेल्या सगळ्या आरोपांचे माझ्याकडे पुरावे-प्रभाकर साईल

तसंच या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानेही आरोप केला होता तो म्हणजे खंडणीचा. किरण गोसावीने आर्यनला सोडण्याच्या बदल्यात शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटी रूपये मागितले होते आणि त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे आहेत असं म्हटलं होतं. असं प्रभाकर साईलने मीडियाला सांगितलं. या सगळ्या आरोपानंतर दिल्लीच्या एनसीबीचं एक पथक मुंबईत आलं. त्यांनी खात्या अंतर्गत समीर वानखेडेंची चौकशीही केली. त्यानंतर आता आज समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणासह इतर पाच प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. मात्र त्यांची बदली कऱण्यात आलेली नाही.

    follow whatsapp