मुंबई: राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचं प्रचंड मतं फुटल्याने सरकारमध्ये चलबिचल पाहायला मिळाली अशातच शिवसेनेचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या साधारण 30 आमदारांनासोबत घेऊन गुजरातमधील ला मेरिडियन हॉटेलमध्ये मध्यरात्री गेले असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र एक खळबळजनक ट्वीट केलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा नारायण राणे यांचं नेमकं ट्विट काय?
‘शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.’ असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या अनेक आमदारांसोबत सरकारमधून बाहेर पडण्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे. असं असताना नारायण राणे यांनी खळबळजनक ट्वीट केलं आहे.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी थेट आरोप केला होता की, आनंद दिघे यांच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता.
एकनाथ शिंदे गुजरातमध्येच का गेले?; संजय राऊतांनी घेतलं चंद्रकांत पाटलांचं नाव
पाहा निलेश राणे नेमकं काय म्हणाले होते:
‘मी साहेब जरी म्हणत असलो तरी वडील आहेत ते माझे. जाहीर कार्यक्रमात कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंचं खरं काय झालं. कट कसा रचला गेला आणि त्यांचं मरण हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारण्यासाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या.. आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली.’
‘जे दिघे साहेबांबाबत झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसैनिकांना म्हणून त्यांना ठार मारण्यात आलं. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन. त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायंच होतं बाळासाहेबांना अनेक वेळा सोनू निगमला ठार मारण्याचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना विचारा.. ते तेव्हा घाबरले असतील. पण आता बाळासाहेब हयातीत नाही तर ते सांगतील सुद्धा.’
‘कसे-कसे कुठे-कुठे शिवसैनिक सोनू निगमला ठार मारण्यासाठी गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन आणि काय नातं होतं सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल तर जाहीर सभेत सांगेन.’
‘कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या.. मृत्यू कोणाकोणाचे झाले? हे सगळं जाहीर सभेत सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणे साहेब कधीच बोलले नव्हते.’ असे गंभीर आरोप निलेश राणे यांनी त्यावेळी केले होते.
राणे तेव्हा म्हणालेले, ‘आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिक होते’
दरम्यान, त्यावेळी नारायण राणे यांनी आपले पुत्र निलेश राणे यांच्या या सगळ्या आरोपांचं खंडन केलं होतं.
‘शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात मध्यंतरी जे काही आरोप झाले, ते मला मान्य नाहीत.’
‘चुकीच्या गोष्टींचं मी समर्थन करणार नाही, दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाही, कारण दिघेंना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो, मी निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेला होता. आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिक आहे, तो कोणत्याही घातपातामुळे झालेला नाही, हे मला माहीत आहे, असं नारायण राणे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
असं असताना आता स्वत: नारायण राणे यांनी आता ट्विट केलं आहे की, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.’ यामुळे नारायण राणे यांना नेमकं काय म्हणायचं आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं काही वर्षांपूर्वी राणे म्हणाले होते. पण असं असताना त्यांनी आता जे ट्विट केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
