तिरूपतीहून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू अर्पण, मंदिरात घुमला गोविंदाचा गजर

मुंबई तक

• 11:26 AM • 14 Oct 2021

तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून गुरूवारी करवीर निवासिनी अंबाबाईला गुलाबी रंग सोनेरी काठ-पदराचा 1 लाख 7 हजार 730 रुपयांचा शालू अर्पण करण्यात आला. तिरुमला देवस्थान समितीचे डेप्युटी ऑफीसर एम.रमेश बाबू यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर देवस्थान समितीकडून या महावस्त्राची रितसर पावती करुन त्याचा स्वीकार करण्यात आला. तिरुपती देवस्थानकडून […]

Mumbaitak
follow google news

तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून गुरूवारी करवीर निवासिनी अंबाबाईला गुलाबी रंग सोनेरी काठ-पदराचा 1 लाख 7 हजार 730 रुपयांचा शालू अर्पण करण्यात आला. तिरुमला देवस्थान समितीचे डेप्युटी ऑफीसर एम.रमेश बाबू यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर देवस्थान समितीकडून या महावस्त्राची रितसर पावती करुन त्याचा स्वीकार करण्यात आला.

हे वाचलं का?

तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवात देशभरातील विविध शक्तीपीठांना महावस्त्र किंवा शालू अर्पण केला जातो. त्यानुसार करवीर निवासिनी अंबाबाईलाही कित्येक वर्षापासून हा शालू अर्पण केला जात आहे. यावर्षी आज नवमीच्या तिथीला गोविंदाचा जयघोष करत शालू मंदिरात आणण्यात आला,यानंतर देवस्थान समिती कार्यालयात विधीवत मंत्रोपचारामध्ये शालू देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात आला.

यावेळी तिरुपती देवस्थान समितीच्या एम.कंचन,वेदपारायण पंडीत के.संपतकुमार,डी.जनार्दन,भरत ओसवाल,के.रामाराव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी नवरात्रात महालक्ष्मी देवस्थानाला तिरूपती देवस्थानाकडून शालू पाठवण्याची प्रथा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे मंदिरं भाविकांसाठी बंद करण्यात आली होती. त्या वर्षीही हा शालू तिरूपती देवस्थानाकडून पाठवण्यात आला होता.

कोल्हापूरच्या अंबाबाईला का पाठवण्यात येतो शालू?

नवरात्र उत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरूपती देवस्थानाकडून शालू पाठवण्यात येतो. कोल्हापूरची महालक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे या नात्याने हा शालू पाठवला जातो. मात्र ती महालक्ष्मी नसून अंबाबाई असल्याचा वाद उपस्थित झाला.

काय आहे वाद?

कोल्हापूरच्या देवीला आदिशक्ती करवीरनिवासिनी मानलं जातं. कोल्हापूरच्या देवीच्या मूर्तीच्या हातात असलेली आयुधं ही नाग, सिंह, महाळुंग, नागमुद्रा अशी आहेत. ही सगळी प्रतीकं पार्वतीची आहेत. तसंच तिरूपतीच्या बालाजीची पत्नी अंबाबाई नसून पद्मावती आहे असं इतिहास अभ्यासकांनी पुराव्यांसहीत मांडलं आहे. पार्वती ही शिवाची म्हणजेच शंकराची पत्नी आहे. त्यामुळे तिला विष्णुपत्नी या नात्याने साडी कशी पाठवता? असा प्रश्न उपस्थित होऊन हा वाद निर्माण झाला होता. जाणीवपूर्वक कोल्हापूरच्या अंबाबाईला महालक्ष्मी असल्याचं भासवलं जातं आहे असा आरोपही करवीर देवस्थान समितीने केला होता. 2018 मध्ये हा वाद झाला होता जो राज्यात गाजला होता.

    follow whatsapp