सांगली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले असल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री हे 2 ऑगस्ट रोजी सांगलीत पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यसाठी आले होते. मात्र याचवेळी हरभट रोडवर शिवेसना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले.
ADVERTISEMENT
भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसंच निवेदन फाडून हवेत उधळण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की मुख्यमंत्री निवदेन स्वीकारताच पुढे गेले. त्यामुळेच ही निवेदनं फाडून उधळण्यात आली.
भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ येथील वातावरण तणावाचं झालं होतं.
भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट
व्यापारी आणि भाजप कार्यकर्ते हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सांगलीमधील हरभट रोडवर थांबले होते. पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा इथे थांबला नाही. त्याचवेळी काही व्यापारी आणि भाजप कार्यकर्ते पुढे जाण्याच प्रयत्न करत होते. तेव्हा पोलिसांनी या लोकांना आडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाल्याचं पाहायला मिळाली. त्यांनतर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, यावेळी आंदोलकाकडून अशी मागणी करण्यात येत होती की, कायम पुराचा फटका बसणाऱ्या लोकांच्यासाठी कायमस्वरूपी पुर्नवसनाचा पर्याय किंवा अन्य जागेत स्थलांतर करण्यात यावं.
‘आपत्ती की आली Package जाहीर करण्याची थोतांडं मला येत नाहीत, मी ठोस मदत करणार’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेलं नुकसान याची पाहणी करण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. सांगलीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे प्रचंड असं नुकसान झालं आहे. दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भिलवडी या गावाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी येथील नागरिकांशी संवाद देखील साधला. यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या स्वरुपाची निवेदनं देखील दिली आहेत.
भिलवडी येथे नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन सांगितलं की, ‘सरकार सर्वोतोपरी मदत करेल, पण वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच त्या निर्णयांसाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल.’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
‘जर पुनर्वसन करायचं असेल तर काही जणांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे. दरवर्षी पूर येतो, दरवर्षी नुकसान होतं. चार महिने विस्थापितांचं जगणं जगावं लागतं. हे सगळं कुठेतरी थांबवायचं असेल, तर पुनर्वसनाचा विचार करावा लागेल.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ADVERTISEMENT
