Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ आणि मुझफ्फरनगर पोलिसांना उघड आव्हान देत कुख्यात हिस्ट्रीशीटर अंकित चौहानने मंगळवारी एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. एका महिला कॉन्स्टेबलला पळवून नेल्याचा आरोप असलेल्या अंकितने पोलिसांच्या वेढ्याला चकमा देत थेट कोर्टाची पायरी चढली. कोर्टाच्या परिसरात पोलिस त्याला पकडण्यासाठी जाळे विणत असतानाच, त्याने गुपचूप कोर्टात पोहोचून 2022 च्या एका जुन्या हत्येच्या प्रकरणात स्वतःचा जामीन रद्द करून घेतला आणि तिथून थेट जेलमध्ये रवानगी करून घेतली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 35 वर्षीय काकी 15 वर्षांच्या पुतण्यासोबत गेली पळून! 10 दिवसांनंतर दोघेही सापडले पण...
लग्नाच्या आदल्या रात्रीच पळवले
या प्रकरणाची सुरुवात शनिवारी रात्री झाली होती. मेरठची रहिवासी असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचा साखरपुडा मुझफ्फरनगरमधील एका तरुणाशी झाला होता. रविवारी रात्री तिची वरात येणार होती, मात्र शनिवारी रात्रीच ही महिला कॉन्स्टेबल संशयास्पद परिस्थितीत घरातून बेपत्ता झाली. याप्रकरणी तिच्या वडिलांनी कुख्यात गुंड अंकित चौहान याच्यावर अपहरणाचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. मात्र, हे प्रकरण प्रेमसंबंधातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.
वडिलांसोबत जाण्याचा निर्णय
पोलीस तपासादरम्यान रविवारी संध्याकाळी महिला कॉन्स्टेबलला बक्सर चौकातून ताब्यात घेण्यात आले. सोमवारी तिला कोर्टात हजर केले असता, तिने यावेळी स्वतःच्या इच्छेने आपल्या वडिलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कोर्टाने तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले, पण तेव्हापासून पोलीस अंकित चौहानच्या शोधात होते. अंकितला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली होती, मात्र त्याने पोलिसांच्या हाती लागण्यापेक्षा कायदेशीर पळवाटेचा आधार घेत स्वतःला सुरक्षितपणे कायद्याच्या स्वाधीन केले.
हे ही वाचा : आशीषशी लग्न अन् संजयसोबत अफेअर, अंजलीच निघाली पतीच्या हत्येची मास्टरमाईंड
पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
अंकित चौहानने ज्या पद्धतीने पोलिसांना गुंगारा देऊन कोर्टात शरणागती पत्करली, त्यामुळे मेरठ आणि मुझफ्फरनगर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस त्याला पकडण्यासाठी धावपळ करत असताना, त्याने शांतपणे कोर्टात जाऊन जुन्या गुन्ह्यातील जामीन रद्द केला आणि पोलिसांच्या ताब्यात जाण्यापासून स्वत:ची सुटका केली. सध्या या हिस्ट्रीशीटरची रवानगी कारागृहात करण्यात आली असून, पोलीस आता पुढील कायदेशीर कारवाईची तयारी करत आहेत.
ADVERTISEMENT











