Shiv Sena Symbol: ‘रामाचं धनुष्यबाण रावणाला…’, राऊतांच्या संतापाचा स्फोट

Eknath shinde Shiv Sena and Election commission: मुंबई: शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. निवडणूक आयोगापुढे जी सुनावणी झाली त्यानंतर अनेक जण असा तर्क लढवत होते की, पक्षाचं नाव आणि चिन्ह हे बहुदा गोठवलं जाऊ शकतं. मात्र, निवडणूक आयोगाने या दोन्ही गोष्टी शिंदेंना बहाल केल्याने महाराष्ट्राच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:45 AM • 17 Feb 2023

follow google news

Eknath shinde Shiv Sena and Election commission: मुंबई: शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. निवडणूक आयोगापुढे जी सुनावणी झाली त्यानंतर अनेक जण असा तर्क लढवत होते की, पक्षाचं नाव आणि चिन्ह हे बहुदा गोठवलं जाऊ शकतं. मात्र, निवडणूक आयोगाने या दोन्ही गोष्टी शिंदेंना बहाल केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नव्या आध्यायाला सुरुवात होणार आहे. मात्र, याचबाबत शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटासह निवडणूक आयोगावर देखील जहरी टीका केली आहे. यावेळी संजय राऊतांचा संतापाचा अक्षरश: स्फोट झाला आहे.

हे वाचलं का?

संजय राऊतांच्या संतापाचा स्फोट, म्हणाले महाराष्ट्र सूड घेतल्याशिवाय…

शिवसेना नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर पाहा संजय राऊत नेमकं कशा पद्धतीने व्यक्त झाले:

’40 बाजारबुणगे पैशाच्या जोरावर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि चिन्ह हे अशाप्रकारे विकत घेऊ शकत असतील तर या देशातील जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास हा आजपासून पूर्णपणे उडून गेला आहे. ज्या पद्धतीने सरकार बनवलं. ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप वापर झाला, त्या खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला आहे हे आज स्पष्ट झालं आहे. हा खोक्यांचा विजय आहे.’

‘केंद्रीय संस्था हुकूमशाहीच्या दहशतीखाली, टाचेखाली आहेत आणि त्यांना हवे तसे निर्णय ते देत आहेत. हा निर्णय ठरवून दिला जात आहे. तीन-चार महिन्यांपासून याची स्क्रिप्ट तयार आहे आणि हे भरोसे दिल्यावरच आणि अधिक खोके या जीवावर शिवसेनेत फाटाफूट घडवून आणली. त्यांना काहीही करून बाळासाहेबांची शिवसेना नष्ट करून बाजारबुणग्यांच्या हाती द्यायची होती. आज मोदी-शाह यांच्या भाजपने ते करून दाखवलं. पण महाराष्ट्र याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.’

‘बाळासाहेब ठाकरेंचा हा अपमान आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ५० वर्षांपूर्वी रक्त आणि घाम गाळून या शिवसेनेची बीजं रोवली आणि आमच्यासारख्या अनेक पिढ्या उभ्या केल्या. ती शिंद्यांची कशी होऊ शकते, दुसऱ्या कोणाची कशी होऊ शकते. जिथे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे ती शिवसेना खरी.’

‘बाजारबुणगे गेले.. म्हणजे बहुमत नाही. त्यांनी याच चोरलेल्या चिन्हावर निवडून येऊन दाखवावं. रामाचं धनुष्यबाण रावणाला देऊन निवडणूक आयोगाने काय सिद्ध केलं? ही लोकशाही आहे का? लोकशाहीच्या नावाने सुरू झालेली अराजकता आहे.’

‘यांना आमदार-खासदार उद्धव ठाकरे यांनीच केलंय ना. शिवसेनेनेच केलंय ना. तेव्हा तुम्हाला उद्धव ठाकरे चालले ही शिवसेना चालली. पण भाजपने हा एक नीच असा खेळ या महाराष्ट्रात केला.. काय तर म्हणे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे. कुठून आणला विचार हा?’

‘हातात असलेल्या सत्तेचा अमर्याद गैरवापर करून त्यांनी हा सूड घेण्याचा प्रयत्न केला पण सूड ही दुधारी तलवार असते. आज ती तुमच्या हातात आहे उद्या ती आमच्या हातात येऊ शकते हे विसरू नका. आज आमच्याकडे शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरेंसाठी प्राण देणारे शिवसैनिक आहेत. त्यांना तुम्ही कसं विकत घेणार?’ अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी शिंदे गटासह निवडणूक आयोगाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

    follow whatsapp