दिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी गूड न्यूज, WHO कडून COVAXIN च्या आपत्कालीन वापरास मंजुरी

मुंबई तक

• 01:04 PM • 03 Nov 2021

नवी दिल्ली: दिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागार गटाने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (COVAXIN)लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही शिफारस केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी करण्यात आलेली आहे. भारत बायोटेकच्या कोरोना (Corona) प्रतिबंध लस कोव्हॅक्सिनला आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: दिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागार गटाने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (COVAXIN)लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही शिफारस केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी करण्यात आलेली आहे.

हे वाचलं का?

भारत बायोटेकच्या कोरोना (Corona) प्रतिबंध लस कोव्हॅक्सिनला आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नव्हती. कोव्हॅक्सिनला WHO ने मान्यता द्यावी अशी सातत्याने मागणी सुरु होती. दरम्यान, हे प्रकरण बराच काळ प्रलंबित होते. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता या लसीच्या आपत्कालीन वापरासाठीच्या मंजुरीची शिफारस करण्यात आली आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, ही मंजुरी केवळ 18 वर्षावरील मुलांसाठी असणार आहे. त्याच्या खालील वयोगटासाठी अद्याप अर्ज करण्यात आलेला नाही.

WHO ने ऑक्टोबर महिन्यात दिले होते ‘हे’ स्पष्टीकरण

जागतिक संघटनेने लसीला मंजुरी देण्यास झालेल्या विलंबाबाबत गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एक मोठे विधान केले होते, ज्यामध्ये WHO ने म्हटले होते की भारत बायोटेककडून लसीबद्दल अजून माहिती हवी आहे, जेणेकरून लसीचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकतो. आपत्कालीन वापरासाठी (Emergency Use) मंजुरी देण्यापूर्वी त्याचे योग्यरितीने मूल्यांकन केले जाणे गरजेचे आहे.

भारत बायोटेक बऱ्याच महिन्यांपासून Covaxin साठी WHO च्या मंजुरीची वाट पाहत होते. हैदराबादस्थित भारत बायोटेकने 19 एप्रिल रोजी लसीशी संबंधित डेटा WHO संस्थेला सुपूर्द केला होता. अखेर सहा महिन्यानंतर आता या लसीला परवानगी देण्यात आली आहे.

कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळण्याबाबत विलंब होत असल्याबाबत WHO ने 18 ऑक्टोबर रोजी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये असे म्हटले होते की, ‘COVAXIN लसीला मंजुरी मिळावी यासाठी बरेच लोक वाट पाहत आहेत. परंतु कोणत्याही लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याआधी आम्हाला त्याचे संपूर्ण मूल्यांकन करणं हे गरजेचं आहे. ही लस सुरक्षित आहे की नाही किंवा प्रभावी आहे की नाही यासाठी हे मूल्यांकन आवश्यक असतं.’ असं WHO ने म्हटलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असेही म्हटले आहे की, भारत बायोटेक कंपनी या लसीबाबत सातत्याने डेटा देत आहे. ज्याचे मूल्यांकन केले जात आहे.

Covishield आणि Covaxin चा मिक्स डोस कोरोनावर प्रभावी? ICMR म्हणतं…

दरम्यान, या लसीला WHO कडून मान्यता मिळाल्याने भारतातील अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण की, कोव्हॅक्सिन घेतलेल्या अनेकांना परदेशात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता त्यांना या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

    follow whatsapp