पुणे: पुण्यात मंगळवारी (4 नोव्हेंबर) दुपारी साडेतीन वाजता बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ एका 17 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना लोकप्रिय दखनी मिसळ या उपहारगृहासमोर घडली, ज्यामुळे व्यावसायिक भागात प्रचंड दहशत पसरली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मृत तरुणाची ओळख मयंक सोमदत्त खराडे (वय 17) अशी झाली आहे. तर त्याचा मित्र अभिजीत संतोष इंगळे (वय 18) त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाला. या हल्ल्यात अभिजीत इंगळेच्या एका बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, या जीवघेण्या हल्ल्यानंतर दोन्ही तरूणांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मयंकला मृत घोषित केले. तर अभिजीतवर सध्या उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा>> घरच्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची अन् दिवसा घरातच प्रियकरासोबत संबंध... पुण्यातील व्यावसायिकाच्या सुनेचं धक्कादायक कृत्य!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचे दोन मित्र मोटारसायकलवरून जात असताना तीन अज्ञात हल्लेखोरांनी, ज्यांचे चेहरे मास्कने झाकलेले होते, त्यांना अडवले आणि तीक्ष्ण हत्याराने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात मयंकच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून तात्काळ पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्यांनी तात्काळ तपास सुरू केला. सध्या पुणे शहरात नाकाबंदी करून पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
हे ही वाचा>> पुण्यात विवाहित पुरुषाचे 18 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध, नंतर दुसऱ्यासोबत सूत, त्याची सटकली अन् चॉपरने हल्ला करत संपवलं
17 वर्षीय तरुणाच्या हत्येचं नेमकं कारण काय?
प्राथमिक तपासात ही हत्या जुना वादातून झाल्याचा संशय आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सध्या पोलिसांकडून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरच हत्येचं नेमकं कारण काय हे सर्वांसमोर येईल.
मागील तीन दिवसात भरदिवसा झालेला हा पुण्यातील दुसरा खून आहे. यापूर्वी कोंढवा येथे रिक्षाचालक गणेश काळे याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या झाली होती. दरम्यान, सलग होणाऱ्या हिंसक घटनांमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. आज झालेल्या हत्येनंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणांचा त्वरित छडा लावण्याचे आदेश दिले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT











