State Election Commission press conference : राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी आज (दि.4) पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
आजपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिकांचा कार्यकाळ संपला असून, या सर्व ठिकाणी नव्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतील.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :
नामनिर्देशन दाखल करण्याची तारीख – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याचा दिवस – 21 नोव्हेंबर
चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल जाहीर – 3 डिसेंबर
हेही वाचा : नालासोपाऱ्यात 'लिव्ह इन'मध्ये राहाणाऱ्या जोडप्याची चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ :
या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आता 15 लाख रुपये, तर ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित केली आहे.
याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी नव्या मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदान टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली असून, संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह लावण्यात आले आहे. अशा मतदारांकडून इतरत्र मतदान करणार नाही, याचे लेखी घोषणापत्र घेतले जाणार आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानासाठी पात्र आहेत, त्यापैकी 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यभरात 13 हजार नियंत्रण युनिट्स बसवण्यात आले आहेत.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 32 वेगवेगळ्या जनजागृती मोहीमा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग मतदार, गर्भवती स्त्रिया, लहान बाळांसह येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रथम मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. काही मतदान केंद्रे केवळ महिलांनी चालवली जातील आणि त्या केंद्रांना ‘गुलाबी मतदान केंद्रे’ अशी ओळख दिली जाईल.
विभागनिहाय नगरपरिषद आणि नगरपंचायतींची संख्या :
कोकण विभाग – 17
नाशिक विभाग – 49
पुणे विभाग – 60
संभाजीनगर विभाग – 52
अमरावती विभाग – 45
नागपूर विभाग – 55
इतर महत्त्वाच्या बातम्या
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनंतर आता अजितदादांचे दुसरे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? कुठून लढणार?
ADVERTISEMENT











