'तळपायाची आग मस्तकात गेली...', निवडणुकांच्या 'तारखा' जाहीर झाल्या अन् राज ठाकरेंचा पाराच चढला!

राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त करत निवडणूक आयुक्त आणि आयोगावर जहरी टीका केली आहे.

mns chief raj thackeray was furious after dates for elections to nagar parishad and nagar panchayats in state were announced making venomous criticism

राज ठाकरे निवडणूक आयोगावर चिडले (फोटो सौजन्य: फेसबुक)

रोहित गोळे

• 07:02 PM • 04 Nov 2025

follow google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज (4 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल. एकीकडे मतदार याद्यांवर आक्षेप घेत विरोधक निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत असताना दुसरीकडे आयोगाने थेट निवडणुका जाहीर केल्याने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला थेट सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले म्हटले असून, मतदार याद्यांतील घोळ आणि दुबार नोंदणीवरून आयोगावर कठोर टीका केली. 

'...तळपायाची आग मस्तकात गेली', राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर तीव्र टीका

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही मिनिटांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी X वर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि लिहिले, "आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?"

राज ठाकरेंनी पुढे असंही लिहिलं की, "महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन..."

विरोधकांची रणनिती काय?

एकीकडे विरोधक सातत्याने मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे दाखवून देत आहे. कधी निवडणूक आयोग तर कधी थेट जनतेत जाऊन विरोधकांनी याबाबत आवाज उठवला आहे. मतदार या पूर्णपणे दुरूस्त करून नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी राज ठाकरे आणि विरोधक हे मागील काही दिवसांपासून करत होते. यासाठी आधी निवडणूक आयुक्तांची भेट, आंदोलन, मोर्चा या सगळ्याचा वापर करून ते आपला आवाज निवडणूक आयोगापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष करत आज थेट निवडणुकाच जाहीर केल्या.

हे ही वाचा>> तुमच्या जिल्ह्यातील 'या' नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी होणार निवडणुका! तारीखही जाहीर

निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्याने आता विरोधक मात्र, काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अवघ्या 3 दिवसांपूर्वी विरोधकांनी या सगळ्याविरोधात मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला होता. ज्यामध्ये मनसेने लाखो दुबार मतदार असल्याच्या याद्याच सर्वांसमोर आणल्या होत्या. मात्र, या सगळ्याला थेट केराची टोपली दाखवत निवडणूक आयोगाने आज राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने काय-काय घोषणा केल्या?

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या कार्यक्रमाची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींमध्ये मतदान होईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून, नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर आहे. प्रचार 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजता संपेल. या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 07 लाख 3576 हजार मतदार असून, 13355 मतदान केंद्रे उभारली जातील.

हे ही वाचा>> स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

आयोगाने सांगितले की, या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने घेण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तथापि, पत्रकार परिषदेत मतदार याद्यांतील चुका, दुबार नोंदणी आणि अन्य तांत्रिक मुद्द्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आयोगाने स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. आयुक्तांनी असे सांगितले की, मतदार याद्या केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाकडून मिळतात आणि राज्य आयोगाची जबाबदारी मर्यादित आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. कोविड महामारी, आरक्षण वाद आणि अन्य कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता जाहीर झालेल्या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय संघर्षाची नवी सुरुवात ठरू शकतात. 

दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुका महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर निश्चितच परिणाम करेल. मतदार याद्यांतील घोळ आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून या निवडणुका वादग्रस्त ठरू शकतात. त्यामुळे आता या सगळ्यांमध्ये मतदार राजा नेमकं काय करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.