‘ ओमसह सर्व 6 खासदारांचं महायुतीत स्वागत, आता ओमराजे प्रतिस्पर्धी नाहीत', राणा पाटलांचं वक्तव्य

Ranajagjitsinha Patil on Omprakash Rajenimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचं महायुतीमध्ये स्वागत केलंय.

Rana Patil

Rana Patil

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 06:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

‘ओमसह सर्व 6 खासदारांचं स्वागत, आता ते प्रतिस्पर्धी नाहीत',

point

राणा जगजितसिंह पाटलांचं वक्तव्य

Ranajagjitsinha Patil on Omprakash Rajenimbalkar, धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राणा पाटलांनी ओमराजे निंबाळकरांसह सर्व सहा खासदारांचं महायुतीमध्ये स्वागत केलंय. शिवाय, ओमराजे आता प्रतिस्पर्धी राहिलेले नाहीत, असंही त्यांनी सांगितलंय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : ओमराजेंनी प्रवेश करताच शिंदेच्या शिवसेनाचा मोठा निर्णय; राणा पाटील समर्थकांना धक्का

माणूस कुठल्याही पार्टीत असला तरी त्याचा विचार नीच, त्यांना कायम विरोध - ओमराजे 

कट्टर शत्रू असलेल्या ओमराजे निंबाळकरांचे राणा पाटलांनी स्वागत केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. शिंदेंसेनेत प्रवेश केल्यानंतर ओमराजे निंबाळकर हे राणा पाटलांबाबत म्हणाले, " मी राजकारणात येण्याचं कारण कधीही लपवून ठेवलेलं नाही. माझ्या मतदारसंघात जे बोललो त्या मुद्द्यावर मी ठाम आहे. माणूस कुठल्याही पार्टीत असला तरी त्याचा विचार नीच आहे. ज्याने नीच कृत्य केलंय, अशा माणसाला माझा कायम विरोध असणार आहे. तो विरोध इथून पुढेही तुम्हाला दिसत राहिल. अशा नालायक लोकांचं राजकारण संपल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही शपथ घेऊन मी राजकारणात आलो होतो."

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागल्यानंतर ओमराजेंनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. निधी मिळत नसल्याने आणि लोकांची कामे होत नसल्याने आपण शिंदेंसेनेत जात असल्याचं सांगितलंय. मात्र, त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणजे राणा पाटील अगोदरच महायुती म्हणजे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे पुढील काळात धाराशिवच्या राजकारणात काय घडणार? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

हेही वाचा : 18.5 कोटींचा निधी मंजूर झाला? त्याचं काय केलं? ओमराजे निंबाळकर म्हणाले...

राणा पाटील आणि राजे निंबाळकर यांचे हाडवैर संपूर्ण राज्याला सर्वश्रूत आहेत. पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर ही भावकी एकमेकांविरोधात इरेला पेटली होती. पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होताच. मात्र, त्यांची हत्या झाल्यानंतर गेल्या 20 वर्षांत दोन्ही कुटुंब एकमेंकांविरोधात सातत्याने कुरघोड्या करायला पाहायला मिळाले आहेत. 

शिंदेसेनेत प्रवेश करताना ओमराजेंकडून पवनराजे हत्या प्रकरणाबाबत भाष्य 

शिंदेसेनेत प्रवेश करताना ओमराजेंनी पवनराजे हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे पाठबळ देतील, असं बोलून दाखवलं होतं. "राजेसाहेबांच्या केसमध्ये 20 वर्षानंतर सगळेच निर्दोष आहेत, कोर्ट म्हणत आहे की राजकीय शत्रूत्व आहे. उद्देश आहे पण सगळे निर्दोष. मी स्वतः खासदार असताना मी माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तर इतरांचे काय ? प्रत्येक जण म्हणत आहे, तुमची प्रतिमा व महाराष्ट्रात नाव आहे. मी प्रतिमा सांभाळायला खासदार बनलो आहे का, या लोकांना धडा शिकवण्यासाठी झालो आहे. निकाल विरोधात गेल्यावर एकनाथ शिंदे हे तात्काळ गृहमंत्री यांना बोलले, मला पाठबळ दिले. निकाल लावायसाठी गेलो नाही", अशा शब्दात ओमराजेंनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.