"नरड्याला सुरी लावली तरी ठाकरेंना सोडायचं नव्हतं, एकवचन कशाला बोलतात?"

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे अनेक नागरिकांनी मत व्यक्त केले.

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 11:30 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"नरड्याला सुरी लावली तरी ठाकरेंना सोडायला पाहिजे नव्हतं, एकवचन कशाला बोलतात?"

point

ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर धाराशिवकर काय म्हणाले?

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयानंतर धाराशिवमधील सर्वसामान्य नागरिकांची भूमिका जाणून घेण्यासाठी घेतलेल्या प्रतिक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक नागरिकांनी ओमराजे निंबाळकर यांना निवडून देताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वासोबतच ठाकरे कुटुंबावरील विश्वासालाही महत्त्व दिल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करण्याऐवजी ठाकरे यांच्यासोबत राहायला हवे होते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. काहींनी हा निर्णय निष्ठेपेक्षा सत्ता आणि पैशांच्या राजकारणाशी जोडून पाहिला, तर काहींनी मतदारांच्या विश्वासाला धक्का बसल्याचे मत मांडले.

हे वाचलं का?

हेही वाचा : शिवसेनेविरोधात जिंकलेल्या गोकुळ गीतेंची श्रीकांत शिंदेंच्या शेजारी बसूनच मोठी घोषणा, शिंदेंच्या खेळीने कोण चेकमेट?

"नरड्याला सुरी लावली तरी ठाकरेंना सोडायला पाहिजे नव्हतं"

धाराशिव बसस्थानक परिसरात बोलताना अनेक नागरिकांनी ओमराजे निंबाळकर यांचे काम केल्याचे मान्य केले, मात्र पक्ष बदलण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. काही नागरिकांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजकीय संधी दिली आणि मोठे केले, त्यामुळे त्यांनी साथ सोडू नये होती असे मत व्यक्त केले. “आम्ही मतदान करताना फक्त उमेदवाराकडे नाही तर ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे पाहून मतदान केले होते. नरड्याला सुरी लावली तरी सोडायला पाहिजे नव्हतं, एकवचन कशाला बोलतात?" ,” अशी भावना अनेकांनी मांडली. काही नागरिकांनी राजकारणात सातत्याने होत असलेल्या पक्षांतरांमुळे लोकांचा विश्वास उडत असल्याचे सांगितले. “आज एका पक्षात आणि उद्या दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?” असा सवालही काहींनी उपस्थित केला.

हेही वाचा : दाढी खाजवून आदित्य ठाकरेंनी खिजवलेलं, 24 तासाच्या आतच एकनाथ शिंदेंनी फिरवला गेम! वाचा Inside Story

'जनतेला दिलेल्या वचनांशी प्रामाणिक राहणे अधिक महत्त्वाचे'

काही नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील विविध प्रश्न, बसस्थानक परिसरातील अपूर्ण कामे, स्वच्छतेच्या समस्या आणि स्थानिक पायाभूत सुविधांची स्थिती याकडे लक्ष वेधत नागरिकांनी विकासाची गरज मान्य केली. मात्र विकासासाठी पक्षांतर करणे हा एकमेव पर्याय नसल्याचे त्यांचे मत होते. विरोधी पक्षात राहूनही लोकांची कामे करता येतात, निधी मिळू शकतो आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढता येते, असे अनेकांनी सांगितले. काहींनी लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेल्या वचनांशी प्रामाणिक राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी घेतलेले निर्णय जनतेला सहज स्वीकारता येत नाहीत, असे मतही व्यक्त करण्यात आले.

मात्र सर्व प्रतिक्रिया नकारात्मकच नव्हत्या. काही नागरिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल सकारात्मक अनुभवही सांगितले. खासदार म्हणून ते सर्वसामान्यांच्या संपर्कात राहतात, फोन घेतात आणि लोकांची कामे करण्यासाठी तत्पर असतात, असे काहींनी सांगितले. त्यांच्या मते, पक्ष कोणताही असला तरी व्यक्ती म्हणून ओमराजे लोकांसाठी उपलब्ध राहिले आहेत. तरीही बहुसंख्य नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये त्यांच्या पक्षांतराबाबत नाराजी आणि संभ्रम दिसून आला. विशेषतः ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयामुळे मतदारांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्याचे चित्र दिसले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराकडे धाराशिवकर नाराज असल्याचं चित्र आहे.