प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांतच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडल्याचे समोर आले आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. मात्र, निकाल लागल्यानंतर काही तासांतच गीते हे शिवसेनेच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ADVERTISEMENT
दराडेंचा पराभव, महायुतीवर विश्वासघाताचे आरोप
एकीकडे विधान परिषद निवडणुकीत पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीतील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. महायुतीमधील काही घटकांनी विश्वासघात केल्यामुळेच पराभवाला सामोरे जावे लागल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण आणखी तापले होते.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या काळात गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिवसेनेकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले होते. मात्र गीते यांनी माघार घेण्यास नकार दिलेला आणि अखेर त्यांनी निवडणुकीत विजय मिळवत दराडेंना मोठा धक्का दिला होता. असं असतानाही निकालाच्या अवघ्या काही तासात शिवसेनेकडून गोकुळ गीते यांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाले.
विजयानंतर तात्काळ विशेष विमानाची व्यवस्था
निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 3 ते 4 तासांतच आणखी एक मोठी घडामोड घडली. गोकुळ गीते यांच्यासाठी शिवसेनेकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा>> नाशिक विधान परिषदः स्वतःची कोणतीही ताकद नसताना अपक्ष गीतेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा गेम ओव्हर, कोण आहे हा जायंट किलर?
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत स्वतः नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. त्यांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली आणि त्यानंतर खास विमानाने दोघेही मुंबईकडे रवाना झाले. या प्रवासाचे काही फोटोही समोर आले असून त्यानंतर राजकीय चर्चांना अधिकच वेग आला आहे.
एकनाथ शिंदेंची भेट होणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ गीते हे मुंबईत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची भेट घेणार आहेत. तसेच आजच ते शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा>> 'अरे ये तो सिर्फ ट्रेलर है...', दाढी खाजवत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना खिजवलं! 'तो' पराभव अन्... नेमकं काय घडलं?
अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी गीते यांच्या मुंबई दौऱ्यामुळे आणि शिवसेना नेत्यांच्या हालचालींमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
शिंदेंची नवी राजकीय खेळी?
राजकीय विश्लेषकांच्या मते, ज्या उमेदवाराने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला, त्याच नेत्याला पक्षात सामील करून घेण्याचा प्रयत्न हा शिंदेंनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना एक मोठा राजकीय संदेश दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही अनेकदा अनपेक्षित राजकीय निर्णय घेत विरोधकांना आणि हितशत्रूंना धक्का दिला आहे. त्यामुळे गोकुळ गीते यांच्या संभाव्य प्रवेशाकडे केवळ पक्षप्रवेश म्हणून नव्हे, तर नाशिकसह राज्यातील आगामी राजकारणाची नवी समीकरणे ठरवणारी चाल म्हणून पाहिले जात आहे.
नाशिकच्या राजकारणात नवी समीकरणे?
गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवत स्वतःचे स्वतंत्र राजकीय वजन सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला तर सगळी राजकीय गणितंच बदलून जातील.
दरम्यान, सध्या सर्वांचे लक्ष मुंबईतील संभाव्य बैठकीकडे लागले असून गोकुळ गीते आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर कोणती राजकीय घोषणा होते, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निकालानंतर काही तासांत घडलेल्या या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT











