मोहिते पाटलांवर बरसले, अकलूजमध्ये सभा ठरली; विजयानंतर राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया

Rajendra Raut : विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर राजेंद्र राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका करत आगामी राजकीय लढतींचे संकेत दिले.

Rajendra RaRajendra Rautut

Rajendra Raut

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 11:59 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोहिते पाटलांवर बरसले, अकलूजमध्ये सभा ठरली

point

विजयानंतर राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया

Rajendra Raut on Dhairyasheel Mohite Patil, Solapur : विधानपरिषद निवडणुकीतील विजय मिळवल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देताना हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासाचा असल्याचे म्हटले. विधानसभेच्या निवडणुकीत अपयश आले असले तरी त्यानंतर बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे जनतेचा पाठिंबा सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले असून संपूर्ण जिल्ह्यातील लोकांची भावना होती की काम करणारा कार्यकर्ता विधान परिषदेत पोहोचला पाहिजे, असे राऊत यांनी नमूद केले. सर्व मतदार बंधू-भगिनींनी दाखविलेल्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाल्याचे सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले. ते सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : भास्कर जाधव म्हणाले, 'नार्वेकर कोण लागून गेला?' आता मिलिंद नार्वेकरांचं जोरदार प्रत्युत्तर

राऊतांचा मोहिते पाटलांवर निशाणा 

विजयानंतर बोलताना राऊत यांनी मोहिते पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असल्याचे सांगत मोठ्या फरकाने विजयाचा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष निकालाने वेगळे चित्र दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या दीड महिन्यांपर्यंत सर्वांशी आपले चांगले संबंध होते, परंतु काही जणांच्या अहंकारामुळे परिस्थिती बदलल्याचा आरोप त्यांनी केला. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा करत जर खरोखरच लढण्याची तयारी होती तर स्वतःच्या घरातील उमेदवार मैदानात उतरवायला हवा होता, असेही त्यांनी म्हटले. आपण कोणाचे उणे-दुणे काढण्याच्या भूमिकेत नसल्याचे सांगतानाच आरोप झाले तर त्याला उत्तर देण्यास आपण सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Maharashtra Weather : हवामानात उलटफेर, येत्या काहीच तासांत मान्सून धुमाकूळ घालणार; पण..

डीसीसी बँकेच्या कारभारावर टीका

राजेंद्र राऊत यांनी पुढील काळात जिल्ह्याच्या विकासावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशनानंतर अकलूजमध्ये मोठी सभा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत त्यांनी डीसीसी बँकेच्या कारभारावर टीका केली. शेतकऱ्यांची बँक अधिक सक्षम करण्यासाठी काम केले असून ठेवी वाढविण्याचे आणि संस्थांना बळकटी देण्याचे प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बंद पडलेल्या जिल्हा दूध संघालाही पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

बार्शी तालुक्यात केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत राऊत यांनी भविष्यात संपूर्ण जिल्ह्यात त्याच धर्तीवर विकास घडवून आणण्याचे आश्वासन दिले. सिंचन, रस्ते, एमआयडीसी, साठवण तलाव आणि दळणवळणाच्या सुविधा यांसारख्या कामांमुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांना सल्ला देताना त्यांनी लोकशाहीत अहंकाराला स्थान नसल्याचे म्हटले. सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही न्याय मिळतो, हे या निकालाने सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. राजेशाही थाट आणि आदेश देण्याची मानसिकता आता चालत नसून लोकांमध्ये जाऊन काम करावे लागते, असेही ते म्हणाले. आगामी राजकीय घडामोडींबाबत निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल आणि त्यानंतर पुढील दिशा ठरेल, असे सांगत त्यांनी आपल्या विजयाला जनतेचा कौल असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.