नाशिक विधान परिषदः स्वतःची कोणतीही ताकद नसताना अपक्ष गीतेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा गेम ओव्हर, कोण आहे हा जायंट किलर?

रोहित गोळे

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 03:26 PM)

Nasik Legislative Council Election Results: नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव करणारे गोकुळ गीते कोण हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. जाणून घ्या नाशिकच्या राजकारणातील हा ‘जायंट किलर’ नेमका कोण.

nashik legislative council election result independent candidat gokul gite deals a knockout blow to shinde shiv sena despite having no independent political base who is this giant killer

नाशिक विधान परिषद

Google CTA

Nashik legislative Council Results News:  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे. या विजयामुळे गोकुळ गीते हे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले असून त्यांना “जायंट किलर” म्हणून संबोधले जात आहे.  

हे वाचलं का?

कोण आहेत गोकुळ गीते?

गोकुळ गीते हे नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव असलेले राजकीय कार्यकर्ते मानले जातात. ते दीर्घकाळ भाजपशी संबंधित राहिले असून जिल्हा पातळीवर त्यांनी संघटनात्मक काम केले आहे. याशिवाय महत्त्वाची बाब अशी की, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे ते कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय समजले जातात.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांमध्ये गोकुळ गीते यांचा चांगला संपर्क असल्याचे सांगितले जाते. 

बंडखोर उमेदवारीमुळे रंगलेली निवडणूक

नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, उमेदवारी वाटपावर नाराज झालेल्या गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. वरिष्ठ नेते, मंत्री आणि पक्ष संघटनांनी गीतेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गीते यांनी माघार घेण्यास नकार दिला.  

महायुतीच्या मतांमध्ये फूट

निवडणुकीदरम्यान गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे नरेंद्र दराडे आणि त्यांच्या समर्थकांनी गीते यांच्याशी अनेक बैठका घेतल्या होत्या. मात्र, गीते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले. ज्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

स्थानिक राजकारणातील मजबूत नेटवर्क

राजकीय विश्लेषकांच्या मते, गोकुळ गीते यांचा विजय हा केवळ पक्षीय समीकरणांचा परिणाम नसून स्थानिक पातळीवरील मजबूत नेटवर्क, वैयक्तिक संपर्क आणि नाराज जनप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला. अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक नेत्यांनी अपक्ष गीतेंना पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.  

राज्याच्या राजकारणात वाढलेलं महत्त्व

नरेंद्र दराडे यांच्यासारख्या प्रस्थापित नेत्याचा पराभव करून गोकुळ गीते यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ताकद सिद्ध केली आहे. या निकालामुळे नाशिक जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा राजकारणात गीते यांची भूमिका अधिक महत्त्वाची मानली जात आहे.

दुसरीकडे, नरेंद्र दराडे यांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला असून त्यांनी निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता महायुतीच्या सर्वच नेत्यांवर निवडणुकीत मदत न केल्याचा थेट आरोप केला आहे.

दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय हा केवळ एका जागेचा निकाल नसून महायुतीतील अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि व्यक्तिमत्त्वाधारित राजकारणाचा परिणाम मानला जात आहे. पण यामुळेच राज्यात पुन्हा एकदा शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप असा महायुतीतील अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे.