नाशिक: नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गीते यांनी अत्यंत अनपेक्षितरित्या पराभव करत विजयाचा गुलाल उधळला होता. या विजयानंतर राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, भाजपच्या छुप्या पाठिंब्याच्या आधारावर गोकुळ गीते यांनी हा विजय मिळवला आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपनेच शिंदेंच्या शिवसेनेला नाशकात शह दिला. याच घडामोडीबाबत जेव्हा शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरे यांनी थेट दाढी खाजवत एकनाथ शिंदेंना खिजवलं होतं. पण या टीकेला काही तास होत नाही तोच एकनाथ शिंदेंनी सगळा गेम फिरवला.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना खिजवलेलं
नाशिक विधान परिषद निकालानंतर शिवसेना UBT आमदार आदित्य ठाकरे यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट दाढी खाजवत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना खिजवलं होतं. पाहा नेमकं काय म्हणालेले आदित्य ठाकरे..
प्रश्न: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय.. काय सांगाल?
आदित्य ठाकरे: या प्रश्नानंतर आदित्य ठाकरेंना आपलं हसू आवरलं नाही.. यावेळी एकनाथ शिंदेंना डिवचत आदित्य ठाकरे असंही म्हणाले की, हसता-हसता बोलता येत नाहीए.
प्रश्न: भाजपने शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे का?
आदित्य ठाकरे: यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ज्यावेळी त्यांनी थेट दाढी खाजवत.. 'अरे ये सिर्फ ट्रेलर है...' असं म्हणत एकनाथ शिंदेंना आणखी खिजवण्याचा प्रयत्न केला होता.
हे ही वाचा >> शिवसेनेविरोधात जिंकलेल्या गोकुळ गीतेंची श्रीकांत शिंदेंच्या शेजारी बसूनच मोठी घोषणा, शिंदेंच्या खेळीने कोण चेकमेट?
एकनाथ शिंदेंनी काही तासातच गेम फिरवला..
गोकुळ गीते हे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात शड्डू ठोकून होते. त्यामुळे आज (22 जून) त्यांच्या विजयानंतर ते आता त्यांचा पुढील राजकीय प्रवास हा भाजपसोबत करतील असा सहजसाधा अंदाज सर्वांकडूनच वर्तवला जात होता. मात्र, हाच गाफील क्षण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचूकपणे पकडला आणि थेट ज्या गोकुळ गीतेंनी शिवसेनेला पराभूत केलं त्याच गीतेंना आपल्या बाजूला वळवलं.
निकालानंतर अवघ्या काही तासातच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी पडद्याआड गोकुळ गीतेंशी चर्चा सुरू केली. चर्चा योग्य दिशेने जात असल्याचं लक्षात येताच नाशिक विमानतळावर गोकुळ गीतेंसाठी एक विशेष विमान तयार ठेवण्यात आलं.
हे ही वाचा >> 'अरे ये तो सिर्फ ट्रेलर है...', दाढी खाजवत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना खिजवलं! 'तो' पराभव अन्... नेमकं काय घडलं?
जेव्हा उदय सामंत यांच्यासोबतची प्राथमिक बोलणी यशस्वी ठरली त्यानंतर गोकुळ गीतेंनी थेट विशेष विमानाने मुंबई गाठली. मुंबईत येताच गीतेंनी थेट नदंनवन या शिंदेंच्या शासकीय बंगल्यावर जाऊन बंद दाराआड बराच वेळ चर्चा केली.
अखेर संपूर्ण चर्चा आणि वाटाघाटीनंतर काही वेळाने गोकुळ गीतेंनी श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत आपण शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून म्हणून विधान परिषदेत काम करू असं जाहीर केलं. तसंच आगामी काळात शिवसेना पक्षाची जबाबदारी सांभाळण्याची तयारी देखील त्यांनी यावेळी दर्शवली.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की, एकनाथ शिंदे हे चाणाक्ष राजकारणी आहेत. आपल्या विरोधक आणि हितशत्रूंना गाफील ठेवत डाव आपल्या बाजूने कसा वळवायचा यात ते पारंगत झाले आहेत.
ADVERTISEMENT











