शिवसेनेविरोधात जिंकलेल्या गोकुळ गीतेंची श्रीकांत शिंदेंच्या शेजारी बसूनच मोठी घोषणा, शिंदेंच्या खेळीने कोण चेकमेट?

नाशिक विधान परिषद निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदेंनी एक मास्टरस्ट्रोक खेळी केली आहे. ज्या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला त्याच गोकुळ गीतेंना शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून शिंदेंनी आपल्याकडे वळवून घेतलं.

gokul gite who won nashik legislative council election against shiv sena made a major announcement while seated right next to shrikant shinde who has been checkmated by eknath shinde move

गोकुळ गीतेंची मोठी घोषणा

मुंबई तक

• 10:09 PM • 22 Jun 2026

follow google news

नाशिक: नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अवघ्या काही तासांत राजकीय समीकरणांनाच कलाटणी दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने मुंबईत दाखल झालेल्या गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार Shrikant Shinde यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विधान परिषदेत शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची घोषणा केली.

हे वाचलं का?

या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करणारे गोकुळ गीते आता प्रत्यक्षात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मी स्वतः श्रीकांत शिंदेंशी संपर्क साधला - गोकुळ गीते

पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गीते यांनी सांगितले की, निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत शिवसेना नेतृत्वाशी संपर्क साधला.

"आज सकाळीच मी श्रीकांत शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेबांशी संपर्क साधला. त्यावेळी मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की, विधान परिषदेत मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास तयार आहे. त्यानंतर मला नंदनवन बंगल्यावर भेटण्यासाठी बोलावण्यात आले. तिथे शिंदे साहेबांशी सविस्तर चर्चा झाली," असे गीते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या मतदारसंघातील विकासकामे आणि मतदारांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या सहयोगी सदस्याच्या भूमिकेतून काम करण्यास शिंदे यांनी परवानगी दिली आहे.

"जबाबदारी दिल्यास तीही स्वीकारणार"

गोकुळ गीते यांनी भविष्यात पक्ष संघटनेत काम करण्याची तयारीही व्यक्त केली.

"मी कोणतीही पदाची मागणी केलेली नाही. मात्र भविष्यात शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे किंवा उदय सामंत यांनी संघटनेची काही जबाबदारी दिली तर ती पूर्ण ताकदीने पार पाडेन," असे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारीवरून पहिल्यांदाच मोठा खुलासा

आपल्या उमेदवारीमागील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गीते यांनी काही महत्त्वाचे दावे केले.

"मी भाजपचा सक्रिय सदस्य नाही. माझे मोठे बंधू गणेश गीते यांना भाजपकडून विधान परिषद उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महायुतीत ही जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची विनंती केली होती. पण त्यावेळी नरेंद्र दराडे यांना पक्षप्रवेश करतानाच उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते," असा दावा त्यांनी केला.

तसेच, "महायुतीला मदत करण्याची विनंती आम्हाला करण्यात आली होती. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मला अपक्ष उमेदवारी करावी लागली. दुसरीकडे गणेश गीते यांनी महायुतीचा धर्म पाळत भाजपकडून भरलेला अर्ज मागे घेतला होता," असेही त्यांनी सांगितले.

'4 वर्ष आम्ही धमाकेच करतो आहोत...' श्रीकांत शिंदेंचा इशारा

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनीही गोकुळ गीते यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

"गोकुळ गीते हे शिंदे साहेबांच्या कामाने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे ते येत्या काळात शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत. भविष्यात पक्षवाढीसाठी त्यांना जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात आहे," असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी म्हटले की, "प्रत्येकाला काही ना काही कमिटमेंट देऊन पक्षात आणले जाते असे नाही. शिंदे साहेबांवरील विश्वास आणि त्यांच्या कामाची शैली हेच लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करते."

नाशिक विधान परिषद निवडणुकीचा उल्लेख करताना त्यांनी मान्य केले की, "महायुती आणि पक्षाने पूर्ण ताकद लावली होती. तरीदेखील गोकुळ गीते विजयी झाले."

याचवेळी त्यांनी पुढील राजकीय घडामोडींचे संकेतही दिले.

"धमाकेवर धमाके होतच राहणार आहेत. गेली चार वर्षे आम्ही तेच करत आहोत. शिंदे साहेब नेहमी म्हणतात - 'ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'," असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

शिंदेंनी नेमका कोणाला दिला राजकीय शह?

गोकुळ गीते यांच्या विजयामागे भाजपमधील काही स्थानिक नेत्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात आधीपासून सुरू होती. त्यातच गीते यांचे बंधू गणेश गीते हे भाजपशी संबंधित असल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले होते.

मात्र निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी वेगाने हालचाली करत गोकुळ गीते यांना थेट आपल्या गोटात आणले. त्यामुळे ज्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यांनाच सहयोगी सदस्य म्हणून स्वीकारून शिंदे यांनी राजकीय नुकसानाचे रूपांतर संधीत केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे नाशिकमधील राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू होती की, गोकुळ गीते यांच्या विजयात भाजपचा छुपा हात होता. कारण गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते हे भाजपचे स्थानिक आणि वजनदार नेते आहेत. असं असतानाही एकनाथ शिंदेंनी निकालानंतर झटपट डावपेच टाकत आपल्या उमेदवाराला पराभूत करणाऱ्या गोकुळ गीते यांनाच गळाला लावत एक प्रकारे भाजपलाच शह दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी या सगळ्या डावपेचातून नेमकं कोणाला नामोहरम केलंय याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, या खेळीमुळे शिंदे यांनी एकाच वेळी अनेक संदेश दिले आहेत. पराभवातूनही प्रभावी नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न, नाशिकमधील आगामी राजकीय समीकरणांवर पकड मजबूत करण्याची रणनीती आणि संभाव्य नाराज गटांना जवळ घेण्याची भूमिका यामुळे ही चाल विशेष महत्त्वाची मानली जात आहे.