Inside Story : निधीची बोंबाबोंब करणाऱ्या 'त्या' 6 खासदारांनी तुमची किती कामे केली?

Inside Story : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी सत्ताधारी गटात जाण्याचे कारण म्हणून विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या निधीच्या खर्चाची आकडेवारी वेगळे चित्र दाखवत असल्याचे समोर आले आहे.

 Sahil Joshi Explained

Sahil Joshi Explained

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 10:59 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंच्या 6 खासदारांना खरंच निधी मिळत नव्हता?

point

Sahil Joshi Explained

Inside Story : महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणून विरोधी पक्षात राहून विकासकामे करणे कठीण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही खासदारांनी उघडपणे सांगितले की, विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघांना आवश्यक निधी मिळत नाही, त्यामुळे रस्ते, स्ट्रीट लाईट, ट्रान्सफॉर्मर यांसारखी छोटी-मोठी विकासकामेही पूर्ण करणे कठीण होत आहे. मतदारांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिले असताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे या खासदारांनी मांडले.

हे वाचलं का?

हेही वाचा : शिवसेनेविरोधात जिंकलेल्या गोकुळ गीतेंची श्रीकांत शिंदेंच्या शेजारी बसूनच मोठी घोषणा, शिंदेंच्या खेळीने कोण चेकमेट?

खासदारांनी पक्षांतर करताना कोणती कारणे दिली? 

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले असले तरी खासदार म्हणून अपेक्षित कामे करता येत नसल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही विरोधी पक्षात असल्यामुळे विकासकामांमध्ये अडथळे येत असल्याचा दावा केला. गावपातळीवरील रस्ते, वीजसंबंधित कामे आणि इतर मूलभूत सुविधांसाठी आवश्यक मंजुरी व निधी मिळण्यात अडचणी येत असल्याने मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देणे कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे या दोन्ही खासदारांनी सांगितले.

हेही वाचा : ज्याने शिवसेनेला हरवलं त्यालाच शिंदेंनी तासाभरात फोडलं? 'जायंट किलर'साठी शिंदेंकडून भलतंच ऑपरेशन!

खासदारांना किती निधी मंजूर झाला? किती खर्च केला? किती कामे झाली? 

खासदाराचे नाव  एकूण मंजूर निधी  खर्च केलेला निधी   पूर्ण झालेली कामे 
संजय जाधव  14.07 कोटी  3.78 कोटी   56 पैकी 25
संजय देशमुख  18.06 कोटी  1.42 कोटी  106 पैकी 07
संजय दिना पाटील 14.7 कोटी  15 लाख  40 पैकी 00
भाऊसाहेब वाकचौरे 14.7 कोटी   71 लाख  135 पैकी 02
नागेश पाटील  19 कोटी  5.06 कोटी  79 पैकी 28
ओमराजे निंबाळकर  18.5 कोटी  1.97 कोटी  130 पैकी 21

खासदारांना किती निधी मंजूर झाला होता? किती खर्च झाला? 

मात्र या दाव्यांची पडताळणी करताना एमपी लॅड निधीच्या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार संबंधित सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. संजय जाधव यांना 14.75 कोटी रुपये मंजूर झाले असताना त्यांनी सुमारे 3.78 कोटी रुपये खर्च केले. संजय देशमुख यांना 18.06 कोटींपैकी फक्त 1.42 कोटी रुपये खर्च करण्यात आले. संजय दिना पाटील यांना 14.70 कोटी रुपये मंजूर झाले असताना त्यांनी केवळ 15 लाख रुपये खर्च केल्याची नोंद आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना 14.70 कोटी रुपये मंजूर झाले होते, मात्र त्यापैकी सुमारे 71 लाख रुपये खर्च करण्यात आले. नागेश पाटील अष्टीकर यांनी 19 कोटींपैकी सुमारे 5.6 कोटी रुपये खर्च केले, तर ओमराजे निंबाळकर यांनी 18.5 कोटींपैकी सुमारे 1.97 कोटी रुपये खर्च केल्याचे आकडेवारीत दिसून येते.

या सर्व आकडेवारीतून एक बाब स्पष्टपणे समोर येते की, संबंधित खासदारांना निधी मंजूर झाला होता; मात्र त्या निधीच्या खर्चाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. अनेक प्रकल्प सुचवले गेले असले तरी त्यातील पूर्ण झालेल्या कामांची संख्या मर्यादित असल्याचेही नोंदींमधून दिसते. त्यामुळे विकासकामांसाठी निधीच मिळाला नाही हा दावा आणि उपलब्ध आकडेवारी यामध्ये काही प्रमाणात विसंगती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पक्षांतरामागे विविध राजकीय कारणे असू शकतात, मात्र जनतेसमोर मांडण्यात आलेल्या ‘निधीअभावी विकासकामे करता आली नाहीत’ या दाव्याची सत्यता तपासताना उपलब्ध आकडे वेगळे वास्तव दर्शवत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.