महाराष्ट्र जाणार अंधारात! वीज कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचं हत्यार

महाराष्ट्रावर बत्ती गुल होण्याचं संकट ओढावलं आहे. राज्य सरकारच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संपाला बुधवारपासून (4 जानेवारी) सुरूवात झाली असून, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत होण्यास सुरूवात झाली आहे. अदाणी वीज कंपनीनं महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना देण्यासाठी राज्य […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:06 AM • 04 Jan 2023

follow google news

महाराष्ट्रावर बत्ती गुल होण्याचं संकट ओढावलं आहे. राज्य सरकारच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संपाला बुधवारपासून (4 जानेवारी) सुरूवात झाली असून, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत होण्यास सुरूवात झाली आहे.

हे वाचलं का?

अदाणी वीज कंपनीनं महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना देण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. अदाणी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, याला वीज कर्मचाऱ्यांच्या विरोध होत आहे.

कामगार संघटनांशी सरकारने चर्चा केली, मात्र चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. आजपासून वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान महावितरणसमोर उभं ठाकलं आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचं महावितरण कंपनीनं म्हटलं आहे.

संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा

वीज कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यानं वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांना इशाराही देण्यात आला आहे. कामगार संघटनांनी बेकायदा संप सुरू न ठेवता तो त्वरित मागे घ्यावा. संप करणाऱ्यांवर मेस्मा कायदा लागू करण्याची वेळ आणू नये, असा इशारा महावितरण व राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला आहे.

वीज कर्मचारी संप सुरू झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. दुपारी 1 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक होणार आहे.

वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याच्या इशारा दिलेला होता. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता संप सुरू झाला असून, महावितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी उपाययोजना केल्या आहेत. वीज पुरवठा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडळ आणि मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी 24 तास संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने नियुक्त केलेल्या संस्थांचे (एजन्सी) कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता आणि कर्मचाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे.

तुमच्या भागात वीज गेल्यास इथे संपर्क करा

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमधील अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. संप काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-१९१२, १८००-२३३-३४३५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आलं आहे.

    follow whatsapp