महागाई वाढली महागाई वाढली अशी ओरड होत होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सगळेच ओरड करू लागले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलवरचे दर कमी केले. तसंच राज्यांनाही इंधनावरचे दर कमी करण्याचं आवाहन केलं. भाजपशासित राज्यांनी दर कमी केले. मात्र महाराष्ट्र सरकारने ऐकलंच नाही बहुतेक, त्यांनी इंधनाचे नाही तर दारूचे दर कमी केले, असं म्हणत अमित शाह यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. त्यानंतर पुण्यात बोलत असताना महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेल नाही तर दारू स्वस्त केली असा टोला लगावला.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं लोकमान्य टिळक म्हणत असत. मात्र शिवसेना म्हणते सत्ता मिळवणं हा आमचा जन्मसिद्ध आहे, त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. आज आव्हान देतो. राजीनामा द्या, तिन्ही पक्ष एकत्र लढा भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. सिद्धांत सोडून केलेलं राजकारण कुणालाच आवडत नाही. महाविकास आघाडीच्या अंताची सुरूवात पुण्यापासून करा असंही आवाहन अमित शाह यांनी केलं आहे.
विमानतळ वाढवणं, मेट्रोचे तीन मार्ग, बसेस देणं, मुळा मुठा नदी संवर्धनासाठी निधी देणं, स्टार्ट अपला प्रोत्साहन यासारखी विकासकामं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पुण्याच्या विकासात मोदी सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रासह भारत देश कोरोनामुक्त होवो आणि आत्मनिर्भर भारत हे आपलं ध्येय लवकरात लवकर पूर्ण होवो असं मागणं आपण दगडूशेठ गणपतीपुढे मागितलं आहे असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची पंक्चर रिक्षा, फक्त धूर निघतो -अमित शाह
जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. वचन देऊन विसरणारं हे सरकार नाही. आम्हाला मायावती, अखिलेश यादव, मुलायम सिंह हे उपरोधाने विचारायचे की मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे. आज त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचं भूमिपूजन करून उत्तर दिलं आहे. जेव्हा मनात शुद्ध भावना असते तेव्हा अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष करायचं होतं. तेच दुर्लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लवकरच रामलल्लाचं मंदिर उभं राहतं आहे. देशाला गौरव वाटेल असं मंदिर अयोद्धेत निर्मिलं जातं आहे. त्यामुळे टोमणे मारणाऱ्यांची तोंडं बंद झाली असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
