विनायक मेटेंचं जाणं मराठवाड्यावरील पहिला आघात नाही; ‘या’ चार नेत्यांची एक्झिट होती धक्कादायक

मुंबई तक

• 07:29 AM • 15 Aug 2022

मराठवाडा तसा राज्यात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, राज्याला तसेच देशाला या मराठवाड्याने अनेक लढवय्ये नेते दिले. मात्र, मराठवाड्यातील या नेत्यांना नियतीने लवकरच येथील जनतेपासून हिरावून घेतलं. त्यामुळे या नेत्यांचं जाणं हे मराठवाड्यावर मोठं आघात मानलं जात आहे. अगदी प्रमोद महाजनांपासून विनायक मेटेंपर्यंत नेते अकाली जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण होत […]

Mumbaitak
follow google news

मराठवाडा तसा राज्यात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, राज्याला तसेच देशाला या मराठवाड्याने अनेक लढवय्ये नेते दिले. मात्र, मराठवाड्यातील या नेत्यांना नियतीने लवकरच येथील जनतेपासून हिरावून घेतलं. त्यामुळे या नेत्यांचं जाणं हे मराठवाड्यावर मोठं आघात मानलं जात आहे. अगदी प्रमोद महाजनांपासून विनायक मेटेंपर्यंत नेते अकाली जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण होत आहे.

हे वाचलं का?

प्रमोद महाजन –

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून येणारे प्रमोद महाजन. यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवला होता. महाराष्ट्रात घराघरात भाजप पोहचवण्याचं काम त्यांनी आपले मित्र गोपीनाथ मुंडेंसोबत केलं. कालांतराने देशाच्या राजकारणात त्यांचा दबदबा निर्माण झाला. मराठवाड्यातील छोट्याशा गावातून आलेले प्रमोद महाजन यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री देखील राहिले होते. भाजपचे पुढचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जायचे. मात्र, अचानक 3 मे 2006 रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांच्याच भावाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. राष्ट्रीय राजकारणात आपली ओळख निर्माण करणाऱ्या या नेत्याने वयाच्या 57 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भाजपसह मराठवाड्याला देखील मोठा धक्का पोहचला होता.

विलासराव देशमुख –

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येते जन्मलेले विलासराव देशमुख यांनी सरपंच ते मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीयमंत्री इथपर्यंत मजल मारली होती. बाभळगावातून आपल्या राजकारणाला सुरवात केलेले विलासरावांनी आपले कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर दिल्लीतील काँग्रेसवर आपली छाप सोडली. त्यामुळे बाभळगावच्या नेत्याला दोनदा मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यांच्या काळाची आज देखील आठवण काढतात. विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या लातूर जिल्ह्याचा कायापालट करून टाकला होता. राज्यासह देशाच्या राजकारणात त्यांची एक वेगळी ओळख होती. मात्र, 14 ऑगस्ट 2012 साली यकृताच्या कॅन्सरमुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला. पुन्हा मराठवाड्याला हानी पोहचली.

गोपीनाथ मुंडे-

गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीच विसरू शकत नाही. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून त्यांनी देखील आपल्या राजकारणाला सुरवात केली होती. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या जोडीने सामान्यांच्या प्रश्नांसाठी रान उठवले. लोकनेता म्हणून गोपीनाथ मुंडे प्रसिद्ध होते. त्यांनी देखील 1980 पासून 2009 पर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. नंतर दोनदा बीड लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. यादरम्यान विरोधीपक्ष नेता, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री ते केंद्रीय मंत्री या पदांवर ते पोहचले. गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होती. 2014 साली देशात भाजपची सत्ता आली पण अचानक 3 जून 2014 रोजी दिल्लीत एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मराठवाड्यावर जणू काही आभाळच कोसळला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आज देखील त्यांच्या जाण्याचं दुःख मराठवाड्यातील जनता पचवू शकलेली नाही.

राजीव सातव –

राजीव सातव महाराष्ट्रासह काँग्रेसमधील एक महत्वाचं नाव. हिंगोलीतुन निवडून येणारे राजीव सातव हे गांधी घराण्याचे अगदी जवळचे मानले जायचे. हिंगोली आमदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष ही पदे त्यांनी उपभोगली. 2014 साली मोदी लाटेत देखील ते चांगल्या मतांनी लोकसभेत निवडून गेले होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठवले होते. त्यांच्याकडे काँग्रेसचे भविष्य म्हणून पहिले जायचे. मात्र अवघ्या 46 व्या वयात त्यांचे निधन झाले. 16 मे 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि पुन्हा एकदा मराठवाड्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली.

विनायक मेटे –

मराठवाड्यातील नेत्यांचं अकाली जाणं, हे सत्र पुढे देखील सुरूच आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून आलेले विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आपली हयात घातली. समाजासाठी अनेक, मोर्चे आंदोलने केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील मराठा समाजाचे ते प्रमुख नेत्यांपैकी एक होते. सलग 5 टर्म ते विधान परिषदेचे आमदार राहिले. 14 ऑगस्ट 2022रोजी बीडहून मुंबईला जाताना त्यांचा देखील अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. त्यांच्या देखील अकाली जाण्याने मराठवाड्याचं नुकसान झालं आहे.

    follow whatsapp