टूलकिट… मोठ्या-मोठ्या सत्ताधीशांना हादरे देणारं ऑनलाइन शस्त्र!

मुंबई तक

• 11:54 AM • 20 Feb 2021

मुंबई: बंगळुरु येथे राहणारी 21 वर्षीय दिशा रवी ही सध्या तुरुंगात आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने शेतकरी आंदोलनाशी निगडीत टूलकिट एडिट केलं होतं. एवढंच नव्हे तर तिने व्हॉट्सअॅप ग्रुप देखील बनवला होता आणि टूलकिट बनविणाऱ्यांना त्या ग्रुपमध्ये अॅड केलं होतं. या ग्रुपद्वारे टूलकिटमध्ये बऱ्याच गोष्टी टाकण्यात आल्या असल्याचा आरोपही तिच्यावर आहे. पोलिसांचं असं देखील […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: बंगळुरु येथे राहणारी 21 वर्षीय दिशा रवी ही सध्या तुरुंगात आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने शेतकरी आंदोलनाशी निगडीत टूलकिट एडिट केलं होतं. एवढंच नव्हे तर तिने व्हॉट्सअॅप ग्रुप देखील बनवला होता आणि टूलकिट बनविणाऱ्यांना त्या ग्रुपमध्ये अॅड केलं होतं. या ग्रुपद्वारे टूलकिटमध्ये बऱ्याच गोष्टी टाकण्यात आल्या असल्याचा आरोपही तिच्यावर आहे. पोलिसांचं असं देखील म्हणणं आहे की, या टूलकिटच्या माध्यमातून 26 जानेवारीला भारतात ज्या प्रकारचं हिंसक आंदोलन झालं त्यानुसार भारताविरोधात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक युद्ध छेडण्याची तयारी सुरु आहे.

हे वाचलं का?

आपण वर जर काही वाचलं असेल त्यात ‘टूलकिट’ शब्द हा वारंवार येत आहे. 26 जानेवारीला जो काही हिंसाचार झाला त्यामागे ‘टूलकिट’च असल्याचं बोललं जात आहे. ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी हे ज्या टूलकिटशी जोडले गेले होते त्या टूलकिटमध्ये खरोखरच एवढी ताकद होती का की, ज्यामुळे देशाचं नुकसान होईल? याशिवाय जगातील इतर देशही या टूलकिटने त्रस्त आहेत? याआधी अशीच टूलकिट आपल्याला आधीही पाहायला मिळाले आहेत? काय हे भारतातील अशा स्वरुपाचं पहिलंच प्रकरण आहे, ज्यामुळे टूलकिट चर्चेत आलं आहे? हे आणि अशा स्वरुपाचे सगळे प्रश्न आपण जाणून घेऊयात सविस्तरपणे.

ग्रे्टाचं ट्विट आणि टूलकिट याविषयी

ग्रेट थनबर्ग या स्वीडीश पर्यावरण कार्यकर्तीने 4 फेब्रुवारीला सकाळी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये इतर गोष्टींसह टूलकिट देखील शेअर केलं गेलं होतं. त्याचदिवशी दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की, हा गुन्हा थनबर्गवर नाही तर टूलकिट बनविणाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासूनच पोलीस टूलकिट बनविणाऱ्यांचा शोध घेऊ लागली.

दरम्यान, 13 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूमधून २१ वर्षीय दिशा रवी हिला याचप्रकरणी अटक केली की, तिने ग्रेटा थनबर्गचं टूलकिट एडिट केलं आहे.

चला, जाणून घेऊयात टूलकिट नेमकं आहे तरी काय?

मुळात एखादं आंदोलन हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन चालविण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. जेव्हा इंटरनेट आणि मोबाइलचा जमाना नव्हता तेव्हा आंदोलनात भाग घेणारे एखाद्या डायरीमध्ये प्लॅनिंग लिहून ठेवायचे. कुठे भेटायचं, काय घोषणा असणार, कोणत्या गोष्टींवर जोर असेल इत्यादी. जेव्हा तंत्रज्ञान बदललं तेव्हा गुगल डॉकवर प्लॅनिंग सुरु झालं. यामुळे एक गोष्ट सहजपणे शक्य झाली की, आपण आपल्या कोणत्याही मित्राला किंवा सहकार्याला या डॉकमध्ये अॅड करणं किंवा काढून टाकणं शक्य झालं. ते देखील रिअल टाइम. असंच काहीसं काम दिशा रवीने टूलकिटमध्ये केल्याचा तिच्यावर आरोप आहे. हेच टूलकिट ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलं होतं. जाणून घ्या या टूलकिटमध्ये नेमकं काय लिहलं होतं?

टूलकिटमध्ये सर्वात वर लिहलं होतं की,

हे डॉक्यूमेंट त्या लोकांसाठी आहे ज्यांना भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाविषयी फार काही माहीत नाही. याच्या माध्यमातून ते परिस्थिती चांगल्या पद्धतीने समजू शकतील. आपल्या हिशोबाने निर्णय घेऊ शकतात की, त्यांना शेतकऱ्यांना समर्थन कसं द्यायचं आहे.

यानंतर भारतातील शेतकऱ्यांच्या स्थितीविषयी 100-200 शब्दात समजविण्यात आलं.

या स्टेपनंतर अॅक्शनबाबत लिहलं गेलं. विशेषत: दोन पद्धतीच्या अॅक्शनबाबत. एक अर्जंट अॅक्शन आणि दुसरी प्रायर अॅक्शन (आधीची कृती) याबाबत लिहलं गेलं होतं. म्हणजे एक अशी कृती जी तात्काळ केली गेली पाहिजे आणि एक अशी कृती जी प्राधान्याच्या आधारे घेतली पाहिजे.

अर्जंट अॅक्शनद्वारे शेतकरी आंदोलनाचं समर्थन करताना #FarmersProtest #StandWithFarmers या हॅशटॅगसह ट्वीट करण्यास सांगितलं होतं.

विेदेशात राहणाऱ्या भारतीयांना असं आवाहन करण्यात आलं होतं की, त्यांनी जवळपासच्या भारतीय दूतावास, मीडिया हाऊस किंवा स्थानिक सरकारच्या कार्यालयांजवळ जाऊन शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करा आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करा.

प्राथमिक अॅक्शन म्हणून #AskIndiaWhy या हॅशटॅगसह डिजिटल स्ट्राईक आणि पंतप्रधान आणि कृषी मंत्री यासारख्या मोठ्या पदांवर असणाऱ्या लोकांना सोशल मीडियावर टॅग करण्यास सांगितलं गेलं होतं.

जगभरात कशा-कशा प्रकारे टूलकिट शेअर केलं गेलं आहे?

जगात कम्प्युटर आणि इंटरनेट क्रांती झाल्यानंतर एकमेकांशी संवाद साधणं हे खूपच सोपं झालं. तसंच टूलकिट देखील वेगाने पसरु लागलं.

इजिप्तमध्ये झालेल्या आंदोलनात सोशल मीडियाची होती महत्त्वाची भूमिका

साधारण 10 वर्षापूर्वी म्हणजे 2011 साली जानेवारी महिन्यात इजिप्तमध्ये एक खूप मोठं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. हे आंदोलन इजिप्तचे राष्ट्रपती हुस्नी मुबारक यांच्याविरोधात पुकारण्यात आलं होतं. हे आंदोलन इजिप्तची राजधानी काहिरच्या तहरीर चौकात केलं होतं. या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं कारण की, या आंदोलनाला कोणताही नेता नव्हता. हे आंदोलन लोकांनी लोकांसाठी चालवलं होतं. यामध्ये सोशल मीडियाने मोठी भूमिका बजावली होती. जेव्हा लोक तहरीर चौकात पोहचले तेव्हा लोकांना फेसबुक आणि ट्विटरवरुन तहरीर येथे येण्याचं आवाहन केलं होतं. जेव्हा आंदोलन वाढलं तेव्हा काही जणांनी आपल्या अनुभवावरुन तहरीर चौकात पोहचणं आणि व्यवस्थितरित्या विरोध प्रदर्शन कसं करावं यासाठी टिप्स देणं सुरु केलं. हळूहळू याच टिप्सला एक डॉक्यूमेंट असं स्वरुप आलं. यामध्ये आंदोलनात सहभागी होण्यापासून सोशल मीडियावर आंदोलन पुढे वाढविण्याबाबत टिप्स होत्या. वेगवेगळ्या टिप्सच्या डॉक्यूमेंटशनला यथावकाश टूलकिटचं स्वरुप आलं होतं.

अमेरिकेतील टूलकिट

अमेरिकेत जेव्हा कृष्णवर्णीय लोकांवर पोलिसांकडून सतत अत्याचार होऊ लागले तेव्हा म्हणजे साधारण 2013 साली ब्लॅक लाइव्ह मॅटर्स मूव्हमेंट सुरु झाली. पण जेव्हा २०२० साली जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर अमेरिकेत जोरदार आंदोलन पुकारण्यात आलं होतं. हळूहळू हे आंदोलन अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये पसरलं होतं. यावेळी लाखो लोक हे रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनादरम्यान, पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीला तोंड देण्यासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक टूलकिट तयार केली गेली होती. यामध्ये असं सांगितलं होतं की, जेव्हा पोलीस कारवाई करेल तेव्हा काय केलं पाहिजे. पोलिसांसमोर काय बोललं पाहिजे. काय नाही बोललं असं बरंच काही…

हाँगकाँगमधील उंदीर-मांजर टूलकिट

हाँगकाँगमध्ये 2019 पासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु आहे. हाँगकाँगच्या नागरिकांना चीनबरोबरच्या प्रत्यार्पण कराराबद्दल तीव्र चिंता वाटत आहे. त्यांचं म्हणणं आहे की, यामुले चीनचा अत्याचार आमि प्रभाव हाँगकाँगमध्ये खूप वाढेल. याच गोष्टीला विरोध करताना 2019 मध्ये हाँगकाँगमधील हजारो तरुण हे रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात देखील टूलकिटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी टूलकिटबाबतत आंदोलक आणि हाँगकाँग पोलीस यांच्यामध्ये उंदीर-मांजराचा खेळ सुरु होता. खरं तर आंदोलक आपलं सर्व प्लॅनिंग हे एका शेअर्ड टूलकिटच्या माध्यमातून करायचे. अशावेळी पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरीही पोलिसांना आंदोलकांना एकत्र येण्यापासून रोखता येत नव्हतं. पोलीस जेवढे अधिक कठोर होत होते तेवढे आंदोलक टूलकिटमध्ये नवं टूल अपडेट करुन त्यांच्यापासून वाचायचे. अशाप्रकारे टूलकिटने हाँगकाँग आणि चीनला देखील हादरा देणं सुरुच ठेवलं आहे.

ही झाली जगातील टूलकिटविषयीची माहिती. आता आपण भारतातील याचविषयीच्या घडामोडींविषयी चर्चा करुयात. भारतात प्रत्येक राजकीय पक्षाचे आयटी सेल हे दररोज सोशल मीडियावर काही ना काही गोष्टी ट्रेंड करण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी एक गुगल डॉक्यूमेंट तयार करतात. हेच डॉक्यूमेंट म्हणजे सायबर जगतात सुरु असणाऱ्या हालचालींची टूलकिटच असते. यामध्ये देखील असंच लिहलेलं असतं की, कोणता हॅशटॅगने कुणाला आणि कधी टॅग करायचं किंवा ट्वीट करायचं. दरम्यान, सध्याच्या काळात टूलकिट हॅक करणं ही काही फार कठीण गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे याचा गैरवापर देखील केला जाऊ शकतो.

    follow whatsapp