‘मोदी निवडणूक जिंकून देणारे यंत्रमानव’; काश्मीरप्रश्नी आरसा दाखवत ठाकरेंचा ‘सामना’तून सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये झालेल्या सभेत काश्मीर प्रश्नावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. मोदींच्या भाषणातील याच मुद्द्यावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ अग्रलेखातून टीका सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. सामना अग्रलेखातून मोदींचं कौतुक करताना चिमटेही काढण्यात आलेत. अग्रलेखात म्हटलंय, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण […]

Mumbai Tak

मुंबई तक

13 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:43 AM)

follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये झालेल्या सभेत काश्मीर प्रश्नावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. मोदींच्या भाषणातील याच मुद्द्यावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ अग्रलेखातून टीका सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

सामना अग्रलेखातून मोदींचं कौतुक करताना चिमटेही काढण्यात आलेत. अग्रलेखात म्हटलंय, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो. भारतीय जनता पक्षाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे”, अशी टीका ठाकरेंकडून करण्यात आलीये.

काश्मीर प्रश्नावरून सामनातून मोदींना सवाल करण्यात आलेत. “पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादेत आणखी एक जळजळीत विधान केले ते कश्मीरविषयी. आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील अनेक वेगवेगळी संस्थाने विविध राज्यांमध्ये विलीन केली. देश एकसंध केला, पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केवळ कश्मीरचा एक प्रश्न सोडवता आला नाही. कश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आज आपण सरदारांनी दाखवलेल्या मार्गानेच जात आहोत.’ मोदी यांनी हे अत्यंत परखड व जळजळीत भाष्य केलं.”

“मोदी कश्मीर व नेहरूंबाबत हे भाषण करत असताना तिकडे कश्मीरात काय सुरू होते? 10 ऑक्टोबरला सकाळपासूनच कश्मिरी पंडित आपल्या सुरक्षेसाठी श्रीनगर व इतरत्र रस्त्यांवर उतरले होते. कश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी पंडित रस्त्यांवर उतरून केंद्र सरकारविरोधात आक्रोश करीत होते. आंदोलन करीत होते. आमचे संरक्षण करा. आम्हाला सुरक्षित स्थळी हलवा, अशा किंकाळ्या फोडत होते. हे चित्र धक्कादायक तितकेच मन विषण्ण करणारे आहे”, अशी चिंता व्यक्त करताना मोदींना खडेबोल सुनावले आहेत.

“नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे? कश्मीरात गेल्या पाच महिन्यांपासून कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग वाढले आहे. पंडित भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. केंद्र सरकारने पंडितांना सुरक्षेची हमी दिली होती, पण पंडित मारले जात आहेत व पलायन करीत आहेत. यात नेहरूंचा काय दोष?”, असा सवाल करत ठाकरेंनी सामनातून टीकास्त्र डागलंय.

“कश्मीरमध्ये पंडित व इतर हिंदू जीव मुठीत धरून जगत आहेत. पंतप्रधानांपर्यंत ही सत्य माहिती पोहोचू नये याचे आश्चर्य वाटते. रशिया-युक्रेन युद्धावर आपले पंतप्रधान बोलतात. त्याचा चांगलाच आंतरराष्ट्रीय गवगवा झाला, पण कश्मीरात जे सुरू आहे त्याचे खापर नेहरूंवर फोडून पंतप्रधान मोदी मोकळे झाले. नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी मोदी यांना पंतप्रधान केले. मोदी हे का विसरत आहेत? मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा प्रश्न पडावा अशी त्यांची वक्तव्ये आहेत. पुन्हा त्यांना आता गुजरात निवडणुकीच्या चक्रव्यूहात पक्षाने अडकविले, म्हणजे कश्मिरी पंडितांच्या किंकाळय़ा हवेतच विरणार. आता नेहरू काय करणार?”, असं म्हणत ठाकरेंनी सामनातून मोदींच्या भूमिकेवरच निशाणा साधला आहे.

    follow whatsapp