‘वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट’ महाविकास आघाडीमुळे गेला? ‘त्या’ RTI अर्जात काय?

मुंबई तक

02 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यानं वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टची पुन्हा चर्चा सुरू झालीये. वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न न केल्यानं गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र, यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून माहिती देण्यात आलीये. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न न केल्यानं हा प्रकल्प गेल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय. मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणारे […]

Mumbaitak
follow google news

टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यानं वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टची पुन्हा चर्चा सुरू झालीये. वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न न केल्यानं गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र, यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून माहिती देण्यात आलीये. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न न केल्यानं हा प्रकल्प गेल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय.

हे वाचलं का?

मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणारे संतोष अशोक गावडे यांनी माहिती अधिकारात वेदांता फॉक्सकॉन बद्दलची माहिती मागितली होती. नेमकं या माहिती अधिकारात काय विचारण्यात आलं होतं आणि त्याला काय उत्तर देण्यात आली ते पाहुयात…

प्रश्न – वेदातांने केलेल्या अर्जाची तारीख

उत्तर -वेदांताने ५ जानेवारी २०२२ आणि ५ मे २०२२ रोजी प्रकल्पाबाबत स्वारस्य अभिव्यक्ती (प्रकल्प उभारण्यासंदर्भात इच्छा व्यक्त) केली होती. वेदांताने १४ मे २०२२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे गुंतवणुकीबाबत अर्ज सादर केला.

प्रश्न -वेदांसाठी झालेली उच्च स्तरीय कमिटीची तारीख

उत्तर – १५ जुलै २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची बैठक घेण्यात आली.

प्रश्न – नवीन सरकार आल्यानंतर झालेला पाठपुरावा

उत्तर –

१) १४ जुलै २०२२ आणि १५ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वेदांता कंपनीस पत्र लिहून महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी पाचारण केलं.

२) १५ जुलै २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची High power committee (HPC) बैठक घेण्यात आली.

३) २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये वेदांताचे जागतिक व्यवस्थापकीय संचालक आकर्ष हेब्बर यांचा समावेश होता.

४) मुख्यमंत्र्यांनी २६ जुलै २०२२ रोजी वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अगरवाल यांना पत्र लिहून सामंजस्य करार करण्यासाठी आमंत्रित केलं.

५) २७ व २८ जुलै २०२२ रोजी फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींसोबत तळेगाव, टप्पा क्र. ४ येथे भेट देण्यात आली. प्रस्तावित जमिनीची व उपलब्ध सुविधांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये आंध्रा डॅम, जल शुद्धीकरण केंद्र व पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा समावेश होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या स्थळ पाहणीसाठी उपस्थित होते. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत जेसीबी, विटेस्को, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व मर्सिडीज् या कंपन्यांना भेट देण्यात आली.

या भेटीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक परिसंस्थेबाबत कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.

६) सदर मुक्कामी दौऱ्यात फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींना पुणे शहरातील निवासी संकुले, हॉटेल्स, मॉल्स व शैक्षणिक सुविधा दाखवण्यात आल्या. त्यामध्ये पुणे विद्यापीठ, आयसर, फ्लेम युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस स्कील युनिव्हर्सिटी इत्यादींचा समावेश होता.

७) ५ ऑगस्ट २०२२ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अगरवाल यांची मुंबईमध्ये भेट घेतली व प्रस्तावित प्रकल्पाला शासनाचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

आरटीआय अर्जाला एकाच दिवसात उत्तर, उदय सामंतांनी वाटल्या प्रती

माहिती अधिकारात माहिती मागणारा हा अर्ज ३१ ऑक्टोबरला करण्यात आला होता. संतोष गावडे यांच्या अर्जाला ३१ ऑक्टोबर रोजी एमआयडीसीकडून उत्तर देण्यात आलं. आरटीआय अर्ज केल्यानंतर कमीत कमी तीन दिवसांनी उत्तर दिलं जातं. मात्र, एकाच दिवसांत उत्तर मिळाल्यानं यावर शंका व्यक्त होत आहे. महत्त्वाचं म्हणजे उदयोगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत अर्जाला मिळालेली माहितीची पत्रक वाटली.

    follow whatsapp