औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी मनसे सज्ज, जाणून घ्या काय आहे मनसेचा R प्लान?

मुंबई तक

27 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:50 AM)

औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. गुढीपाडवा म्हणजेच २ एप्रिलला केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत मशिदींवरचे भोंगे उतरवण्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर १२ एप्रिलला घेतलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी सरकारला मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर भोंग्याचं राजकारण चांगलंच तापलं. यानंतर १ […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. गुढीपाडवा म्हणजेच २ एप्रिलला केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत मशिदींवरचे भोंगे उतरवण्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर १२ एप्रिलला घेतलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी सरकारला मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर भोंग्याचं राजकारण चांगलंच तापलं.

हे वाचलं का?

यानंतर १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या सभेला अद्याप संमती मिळालेली नाही. मात्र मनसेने औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यासंदर्भातला आर प्लानही मनसेने तयार केला आहे. आपण जाणून घेऊ काय आहे मनसेचा आर प्लान

काय आहे मनसेचा R प्लान?

मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. शहरात स्थानिक पातळीवर भोंगे खरेदी सुरू करण्यात आली आहे.

पदाधिकारी आपल्या खिशातून पैसे खर्च करून शक्य तेवढे भोंगे खरेदी करत आहेत. शासनाने ३ मे पर्यंत ठोस भूमिका घेतली नाही तर पहिल्या टप्प्यात मशिदींसमोरच्या मंदिरांवरच भोंगे लावले जाणार आहेत.

शहरात मशिदींजवळच्या मंदिरांची यादी करण्याचं काम सुरू आहे. पुढच्या टप्प्यात मशिदींसमोर मंदिर नसणाऱ्या ठिकाणी जे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते राहतात त्यांच्या घरांवर भोंगे लावण्यात येणार आहेत.

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करण्यासाठी भोंगे खरेदी सुरू केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या भोंग्यांचीही खरेदी औरंगाबादमध्ये सुरू करण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये ५० भोंगे आले आहेत. राज्यभरात स्थानिक पातळीवर खरेदी सुरू आहे असंही सांगण्यात आलं आहे. दिव्य मराठीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम

औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की १५०० ते १८०० रूपये दराने पुण्याहून ५० ते ५५ भोंगे खरेदी करण्यात आले आहेत. आता भोंग्यांसाठी वीज, सीडी प्लेअर लागत नाही. हे बॅटरीवर चालणारे भोंगे आहेत. तसंच ब्लू टुथनेही ते कनेक्ट होतात. वजनाने हलके असणारे हे भोंगे गच्चीवर ठेवणं सोपं जातं. या भोंग्यांवर हनुमान चालीसा वाजवण्यासाठी मनसे त्यांचा उपयोग करणार आहे.

बाळा नांदगावकर यांनी काय म्हटलं आहे?

मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत राज्य सरकारने योग्य ती पावलं उचलली नाहीत तर नेमकं काय करायचं आहे याचा आदेश राज ठाकरे १ तारखेच्या सभेत देतीलच. आमच्याकडे प्लान बी, सी नाही तर आर म्हणजेच राज ठाकरे प्लान तयार आहे. साहेब सांगतील त्या आदेशाचं पालन आम्ही करू.

    follow whatsapp