हमीद अन्सारींनी पाकिस्तानला भारताची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

मुंबई तक

• 01:45 AM • 14 Jul 2022

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानला भारताची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी यासाठी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांचा हवाला दिला आहे. गौरव भाटिया यांनी केलेल्या आरोपांनुसार पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी हा खुलासा केला आहे की त्यांना हमीद अन्सारी यांनी भारताविषयीची गोपनीय माहिती पुरवली. ही माहिती […]

Mumbaitak
follow google news

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानला भारताची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी यासाठी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांचा हवाला दिला आहे. गौरव भाटिया यांनी केलेल्या आरोपांनुसार पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी हा खुलासा केला आहे की त्यांना हमीद अन्सारी यांनी भारताविषयीची गोपनीय माहिती पुरवली. ही माहिती आयएसआयसोबत शेअर करून भारताच्या विरोधात वापरण्यात आली.

हे वाचलं का?

भारताविषयीची गोपनीय माहिती शेअर करायची हे काँग्रेसचं धोरण होतं का? असाही प्रश्न गौरव भाटिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार हमीद अन्सारी हे जेव्हा भारताचे उपराष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराला पाचवेळा गोपनीय माहिती पुरवली होती. भाटिया यांनी असंही म्हटलं आहे की देशातल्या जनतेने अन्सारी यांना खूप आदर दिला मात्र त्या बदल्यात त्यांनी देशाला काय दिलं? काँग्रेस पक्षाने याचं उत्तर द्यावं अशीही मागणी भाटिया यांनी केली आहे.

गौरव भाटिया यांनी असंही म्हटलं आहे की हमीद अन्सारी हे जेव्हा इराणचे राजदूत होते तेव्हा ते भारताच्याच सुरक्षेला छेद देत होते. एका माजी रॉ एजंटने हा खुलासा केला आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी भारताविषयीची माहिती नको त्या लोकांना दिली होती. एवढंच नाही तर अनेकांची ओळखही उघड केली होती असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आज तकने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या संपूर्ण आरोपांबाबत आता माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचंही स्पष्टीकरण समोर आलं आहे.

हमीद अन्सारी यांनी काय म्हटलं आहे?

माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी नुसरत मिर्झा यांना कधीही भेटलो नाही. त्यांना फोनही केलेला नाही. मीडियामध्ये माझ्याविषयी ज्या बातम्या प्रसारित होत आहेत त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. माझ्याविषयी खोटं पसरवलं जातं आहे. जे हे खोटं पसरवत आहेत त्यात भाजपच्या प्रवक्त्याचाही समावेश आहे. असंही हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हमीद अन्सारी यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

हमीद अन्सारी यांनी पुढे असंही म्हटलं आहे की सध्या या बातम्या पसरवल्या जात आहेत की भारताच्या उपराष्ट्रपतीपदी असताना मी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना निमंत्रित केलं. नवी दिल्लीत दहशतवाद या विषयावर आय़ोजित कार्यक्रमात मी त्यांची भेट घेतली. तसंच मी जेव्हा इराणमध्ये भारताचा राजदूत म्हणून काम करतो होतो तेव्हाही मे देशहिताच्या विरोधात वागलो असाही ठपका माझ्यावर ठेवण्यात येतो आहे. मात्र या सगळ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी उपराष्ट्रपती पदी विराजमान असताना विदेशातल्या पाहुण्यांना निमंत्रण दिलं होतं. कारण तसा सरकारी संकेत असतो. ही सगळी प्रक्रिया सरकारच्या सल्ल्यानुसारच केली जाते असंही हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे. तसंच नुसरत मिर्झा यांना मी कधीही भेटलो नाही किंवा त्यांना कधीही फोन केलेला नाही असंही हमीद अन्सारी यांनी स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp