कायद्याची थट्टा! पोलीस ठाण्यातच लाथाबुक्क्यांनी आणि पोलिसाच्या पट्ट्याने बेदम मारहाण

मुंबई तक

• 04:44 AM • 02 Jan 2022

– सुरेन्द्र रामटेके, वर्धा पोलीस ठाण्यातच लाथाबुक्क्या आणि पट्ट्याने मारहाण केली जात असेल, तर तक्रार न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न वर्धा जिल्ह्यात घडलेल्या घटनेनं उपस्थित होऊ लागला आहे. फेसबुकवरील पोस्टच्या कारणावरून एका व्यक्तीने पोलिसांच्या कक्षातच तरुणाला लाथाबुक्क्या आणि पट्ट्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टीच्या पोलीस ठाण्यात ठाणेदारांच्या कक्षामध्येच फिर्यादी मंगेश तायवाडे […]

Mumbaitak
follow google news

सुरेन्द्र रामटेके, वर्धा

हे वाचलं का?

पोलीस ठाण्यातच लाथाबुक्क्या आणि पट्ट्याने मारहाण केली जात असेल, तर तक्रार न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न वर्धा जिल्ह्यात घडलेल्या घटनेनं उपस्थित होऊ लागला आहे. फेसबुकवरील पोस्टच्या कारणावरून एका व्यक्तीने पोलिसांच्या कक्षातच तरुणाला लाथाबुक्क्या आणि पट्ट्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

वर्धा जिल्ह्यातील आष्टीच्या पोलीस ठाण्यात ठाणेदारांच्या कक्षामध्येच फिर्यादी मंगेश तायवाडे याला आरोपी राजेश ठाकरेने पोलिसांच्या सुंदरीने मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक केली. याप्रकरणात सहआरोपी म्हणून पोलीस हवालदार विनायक घावट यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी याबद्दलची माहिती दिली.

काय घडलं?

आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील अंतोरा येथे राहणारा मंगेश तायवाडे या तरुणाने राजेश ठाकरे नावाच्या व्यक्तीसंदर्भात फेसबुकला एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर राजेश ठाकरेने पोलीस स्टेशन गाठले. ही माहिती मंगेश तायवाडेला मिळताच तो सुद्धा पोलीस ठाण्यात गेला. पोलीस ठाण्यात ठाणेदारांच्या कक्षात दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने तिथेच ठेवून असलेल्या पोलिसांच्या सुंदरीने आरोपी राजेश ठाकरे याने मंगेशला चांगला चोप दिला. मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर वायरल करण्यात आला.

पोलीस ठाण्यातच आरोपीकडून तरुणाला मारहाण करण्यात आली. मात्र, तिथे उपस्थित इतर पोलीस कर्मचारी फक्त बघत होते, अशी माहिती आता समोर येत आहे. परंतु मदतीला कोणीही धावले नाही. या घटनेनंतर मंगेशने भीतीपोटी तेथून पळ काढत गाव सोडला आणि तो मुंबईला निघून गेला, परंतु तोपर्यंत व्हिडीओ व्हायरल झाला होता.

व्हायरल व्हिडीओतील घटनेची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना कळाली. त्यांनी स्वतः चौकशी करण्याकरिता आष्टी पोलीस स्टेशन गाठले. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर अखेर रात्री उशिरा आरोपी राजेश ठाकरे (रा. अंतोरा) आणि सहआरोपी असलेल्या हवालदार विनायक घावट यांच्यासह दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी राजेश ठाकरेला अटक केली. तर सहआरोपी असलेल्या हवालदाराला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी दिली. दरम्यान, पोलीस ठाण्यामध्येच जर अशा प्रकारे घटना घडत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे फिर्याद करायची असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

    follow whatsapp