मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ( BMC Election 2026 ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सर्वात पहिले मुंबई Tak ला ( Mumbai Tak ) मुलाखत दिली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचं ( Thackeray alliance ) किती आव्हान, मराठी माणूस ( Mumbai Marathi votes ) कोणासोबत, मुंबईचा महापौर ( Mumbai Mayor ) मराठी होणार का? मुंबईचा विकास कोणी केला? या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई Tak च्या टीमने संवाद साधला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेवर नेमका कोणाचं झेंडा फडकणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईवर आपलाच झेंड फडकविण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. अशावेळी मुंबई जिंकण्यासाठी भाजपची नेमकी रणनीती काय, मुंबईच्या विकासाचं व्हिजन काय? या सगळ्या गोष्टी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुंबई Tak च्या महाचावडी'वर अगदी सविस्तरपणे सांगितल्या. मुख्यमंत्री फडणवीसांची हीच मुलाखत वाचा जशीच्या तशी...
'मुंबई Tak च्या महाचावडी'वरची मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत जशीच्या तशी...
प्रश्न: देवेंद्रजी मुंबई महानगरपालिका पाहून तुम्हाला काय वाटतं?
मुख्यमंत्री फडणवीस: मुंबई महापालिकेची इमारत ही अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची इमारत आहे आणि महानगरपालिकाही ऐतिहासिक आहे. देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि मला असं वाटत की, योग्य प्रकारे चालवली तर जगातील सगळ्यात चांगली महानगरपालिका होईल. एवढी क्षमता त्यामध्ये आहे.
प्रश्न: तुम्ही मुंबई महानगरपालिका पहिल्यांदा कधी पाहिली होती?
मुख्यमंत्री फडणवीस: पुष्कळ आधी बघितली होती.. मी आमदार झाल्यावरच बघितली होती. पण विशेषत: महानगरपालिकेच्या आतमधलं जे अवलोकन मी केलं.. ते मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच केलं. त्याच्या आधी आत गेलो होतो.. सत्ता पक्षाच्या कार्यालयात किंवा कोणाच्या कार्यालयात.. पण महापालिकेचं जे सभागृह आहे ते आधी पाहिलं नव्हतं.
प्रश्न: तुम्ही नागपूरचे महापौर होतात.. नागपूरनंतर मुंबईची महानगरपालिका पाहिल्यानंतर असं वाटलं का की, मुंबईचा महापौर व्हायला पाहिजे होतं?
मुख्यमंत्री फडणवीस: असं कधीच वाटलं नाही.. कारण नागपूरचा महापौर झाल्यानंतर मी ऑलरेडी त्याच्या लागोपाठ आमदार झालेलो होतो.. त्यामुळे पुन्हा महापौर व्हायची इच्छा नव्हती.
प्रश्न: आज मी तुम्हाला मेट्रोने घेऊन जाणार आहे.. सहसा मुंबईत लोकल ट्रेनने घेऊन जातात.. या मेट्रोचं श्रेय काही प्रमाणात तु्म्हालाही जातं.. पूर्वी 11 किमीची मेट्रो लाइन होती. मेट्रोला प्राथमिकता द्यायची हे तुम्हाला मुख्यमंत्री झाल्या-झाल्या वाटलं की, नंतर ते लक्षात आलं..
मुख्यमंत्री फडणवीस: निश्चितपणे हे मी ठरवलं होतं. आपण माझं व्हिजन 2013 ला माडलं होतं प्रदेशाध्यक्ष म्हणून.. त्यावेळेस मी सांगितलं होतं की, मुंबईत मेट्रोचं जाळं आपण कसं तयार केलं पाहिजे, मुंबईमध्ये एलिव्हेटेड रस्त्याचं जाळं कसं तयार केलं पाहिजे, मुंबईत बोगदे कसे तयार केले पाहिजे, मुंबईतील गर्दीचं विकेंद्रीकरण कसं करता येईल.. अशा अनेक गोष्टी मी 2013 ला माझ्या भाषणामध्ये मांडल्या होत्या, ज्यावेळेस मी प्रदेशाध्यक्ष होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्याच. विशेषत: मी नेहमी एक गोष्ट सांगतो की, मुंबईत केलेले प्रोजेक्ट्स हे काही सगळे नव्याने मी ठरवून केलेले नाहीत. त्या प्रोजेक्टसचा 25-30 वर्ष आधी विचार झाला होता.
म्हणजे, अटल सेतूचा विचार हा 1962 साली त्यावेळी जे आरडी टाटांनी मांडला होता. माझं श्रेय काय.. हे फक्त चर्चा व्हायच्या आणि कागदं फिरायचे.. काही व्हायचं नाही, परवानगी यायच्या नाहीत. मी मागे लागलो, सगळ्या परवानग्या घेतल्या. सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन परवानग्या घेतल्या आणि गोष्टी अंमलात आणून दाखवल्या आणि ते प्रोजेक्ट आता झालेले आहेत.
प्रश्न: मुंबई किती अनोळखी होती तुमच्यासाठी?
मुख्यमंत्री फडणवीस: फार अनोळखी नव्हती. कारण की, आमदार म्हणून तर 1999 पासून मुंबईमध्ये म्हणजे एक प्रकारे मुंबईची सगळी वाटचाल त्या ठिकाणी पाहतच होतो. विशेषत: काय होतं.. मी महापौर राहिल्यामुळे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये मी एक डिप्लोमा केला होता. त्यामुळे सगळ्या गोष्टींची थोडी माहिती होती. हा पण अगदी मुंबई म्हणाल तर ती थोडी माझ्याकरिता नवीन होती. कारण मुंबई फिरूनच माहिती होती. पण मुंबईतील राजकारण किंवा अशा गोष्टी.. म्हणजे निवडणुका आल्या की कामाला यायचं. म्हणजे पक्ष सांगेल त्या भागात जाऊन काम करायचं. म्हणजे 2009 च्या निवडणुकीत मी ईशान्य मुंबईमध्ये जवळपास 20-25 दिवस राहिलो होतो.
प्रश्न: मुंबई नगरी बडी बाकां असं नेहमी म्हणतात.. पण तसं काही तुम्हाला जाणवत होतं का? की, मुंबई अत्यंत कठीण आहे, मुश्कील आहे.. असं जाणवत होतं का?
मुख्यमंत्री फडणवीस: नाही.. असं काही नाही.. मी तुम्हाला एक सांगतो. जरी मी मुंबईचा आमदार नव्हतो तरी 2004 ला मी एक भाषण केलं होतं. विधानसभेत केलं होतं भाषण.. त्या भाषणात मी सांगितलं होतं की, तुम्ही MMRDA ला बँकेसारखं वापरता. MMRDA ला 450 कोटी रुपये तुम्ही व्याजावर ठेवून दिले आहेत आणि 150 कोटी रुपये तुम्ही खर्च करता. MMRDA केली आहे मेट्रो पॉलिटिन रिजन विकसित करण्याकरिता आणि तुम्ही फक्त बँकेत पैसे ठेवून कुठलीच त्यावर कारवाई करत नाही. तुम्ही जे काही 450 कोटी रुपये आहेत. त्यामध्ये 15 हजार कोटीची कामं करू शकता. मुंबई तुम्ही बदलू शकता.
मला आजही आठवतं की, तेव्हाचे अर्थ खात्याचे सचिव जे होते. ते येऊन मला भेटले आणि ते म्हणाले मीपण हेच सांगायचा प्रयत्न करतो पण कोणी ऐकत नाही. म्हणून मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो पहिलं काम हे केलं की, MMRDA ला बोलावून सांगितलं की, तुम्ही बँक नाहीत. तुम्ही जे काही लोकांकडून पैसे वसूल करता आहात ते तुम्ही पायाभूत सुविधांसाठी लावले पाहिजे. MMRA रिजनमध्ये तुम्ही कामच करत नाही. तुम्ही चौपाटीचं काम करत आहात. MMRA रिजनमध्ये कुठे तुमचं काम आहे.
प्रश्न: तुमचं म्हणणं आहे की, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही प्रोजेक्टसंबंधी कामं सशक्त केलीत? पण त्यामुळे महापालिकेचे अधिकार कमी झाले?
मुख्यमंत्री फडणवीस: नाही, बिल्कुलच नाही.. उलट माझं तर म्हणणं होतं की, महापालिकेत का काम करताय मुंबईच्या? मुंबई महापालिका सक्षम आहे. तुम्ही एमएमआर क्षेत्रामध्ये काम करा आणि मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की, जवळपास 3 लाख कोटीचे प्रोजेक्ट्स.. त्याच, जी MMRDA वर्षाला 400-450 कोटींची कामं करायची.. ती 3 लाख कोटींचे प्रोजेक्ट हे त्या MMRDA च्या माध्यमातून सुरू केले. त्याला अर्थसहाय्य केलं आणि आजही नीट ते सुरू आहेत. कुठेही काही अडचण नाही. त्यामुळे उलट त्यातून MMRDA ची क्षमता वाढली. त्यांची आवक वाढली, त्यांची गुंतवणुकीची क्षमता वाढली.
आज आपण पाहतोय की, एक-एक प्लॉट 3-3 हजार कोटींना ते विकत आहेत. आज एमएमआरडीए एवढी सक्षम आहे की, जेव्हा अटल सेतू तयार करायचा होता त्यावेळी मी विनंती केली की, जायकाचं कर्ज आम्हाला थेट MMRDA वर पाहिजे. कारण तोपर्यंत कधीही थेट बॅलन्स शीटवर कर्ज मिळालं नव्हतं.
मी ज्यावेळेस सगळं समजून सांगितलं.. त्यावेळेस पहिल्यांदा मोदीजींनी हा निर्णय घेतला आणि MMRDA... जिचं ट्रिपल ए रेटिंग आहे तिला थेट कर्ज घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे राज्याची आर्थिक गुंतवणूक कुठेही गुंतवावी लागली नाही. आणि हा आम्ही ट्रेंड केला. हे एवढे जे सगळे प्रोजेक्ट आपण केलेले आहेत लाखो-कोटी रुपयांचे हे सगळे आपण MMRDA च्या बॅलन्स शीटवर केलेले आहेत.
प्रश्न: आपण सीएसटीएम स्टेशनवर आहोत. मी मुंबईत वाढलोय, मला असं कधी वाटलं नव्हतं की, सीएसटीएमला असं अंडरग्राऊंड मेट्रो वैगरे असेल म्हणून.. ही गर्दी जी तुम्हाला आता दिसतेय. ही कमी आहे की, अजून असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
मुख्यमंत्री फडणवीस: नाही.. गर्दी वाढणारच आहे.. आजचा दिवस हा सुट्टीचा आहे.. सवय लागेल.. मी तुम्हाला सांगतो. अधिकृत अंदाज ट्रॅफिक विभागाने दिलं आहे की, या अंडरग्राऊंड मेट्रोमुळे रस्त्यावरचं 30 टक्के ट्रॅफिक कमी झालंय. टॅक्सी, शेअर टॅक्सी.. या सगळ्याची गर्दी कमी झाली आहे. 30 टक्के लोकं हे मेट्रोने प्रवास करत आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढणारच आहे.
प्रश्न: तरी सुद्धा मुंबईची सगळ्यात मोठी अडचण ही काय आहे की... खासकरून महापालिका निवडणुकीच्या वेळेस लोकं विचार करतात की, महानगरपालिकेच्या मुद्द्यावर मतदान करायचं की, तुम्ही राज्य सरकारकडे पाहून मतदान करायचं?
मुख्यमंत्री फडणवीस: असं आहे की... विकासाच्या व्हिजनकडे पाहून मतदान करायचं.. कोणाकडे व्हिजन आहे? कोणी मांडलं व्हिजन, कोणी करून दाखवलं? बघा.. बाकी लोकं फक्त बोलबच्चन देत राहिले. इतक्या वर्षात त्यांच्याकडे दाखवायला काही नाही ना..
प्रश्न: आता होर्डिंग लागले आहेत.. कोस्टल रोड आम्ही केला.. 92 हजार कोटीच्या ठेवी केल्या.
मुख्यमंत्री फडणवीस: अरे कोणाचंही पोरगं आपलं म्हटलं म्हणून आपलं थोडी होतं.. अरे बाजूवाल्याचा पोरगा मांडीवर बसवला तरी थोडा आपला पोरगा होतो.. कोस्टल रोड का झाला नाही मी यायच्या पूर्वी? का नाही झाला? याचं कारण होतं कोस्टल रोडकरिता ज्या परवानग्या होत्या त्या परवानग्या कधीच मिळाल्या नाहीत. मी स्वत: 5 बैठका घेतल्या कोस्टल रोडकरिता केंद्र सरकारमध्ये. सगळे अधिकारी होते त्यांना माहिती कशा प्रकारे दिशा देण्याचं काम केलं. ते सगळं केल्यानंतरही सुप्रीम कोर्टापर्यंत.. प्रत्येक याच्यावर कोर्ट केस झाली.. ते सगळे जिंकून आलो.
हे इतक्या कोत्या मनाचे लोक आहेत, की ज्यावेळी कोस्टल रोडचं सगळं काम केलं.. आणि त्यावेळी प्रश्न असा होता की, महानगरपालिकेला द्यायचं की, MMRDA ला द्यायचं की, MSRDC ने करायचं.. मला उद्धवजी म्हणाले की, महानगरपालिकेला द्या. म्हटलं ठीकए... महानगरपालिकेला करा..
एक दिवस सकाळी अचानक मला न सांगता उद्धवजींनी त्याचं भूमीपूजन करून टाकलं. मी काही म्हटलं नाही.. आता मी मुख्यमंत्री.. ते कुठल्याही पदावर नव्हते. ते कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते. त्यांना अधिकारही नव्हता.. तरीही विकासामध्ये राजकारण करायचं नाही.. म्हटलं.. मला आयुक्त म्हणाले की, साहेब तुम्ही परत करणार असाल तर आमची तयारी आहे. कारण त्यांनी करून टाकलं.. मी म्हटलं अख्ख्या मुंबईला माहितीए की, कोस्टल रोड कोणी केली. त्याच्या परवानग्या कोणी आणल्या.. रोज बातम्या छापून यायच्या जेव्हा परवानग्या यायच्या. प्रत्येक बैठकीत काय झालं, तिथे काय झालं. कशा प्रकारे आम्ही त्याला दिशा दिली.. त्यामुळे श्रेयाकरिता थोडी मला काही लढाई करायची आहे.
प्रश्न: एक काळ असा होता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये... राज्यामध्ये वेगळं सरकार, मुंबई-ठाण्यात वेगळं सरकार.. पण त्यावेळेस या गोष्टींची कधी अडचण नाही झाली.. पण आता या गोष्टी बदलल्या आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? की, वर पण आमचं सरकार आणि खाली पण आमचं सरकार असेल तरच गोष्टी सुरळीत होतील. असं काही आहे का?
मुख्यमंत्री फडणवीस: हे आम्ही दाखवलंय.. हा काही नियम नाही.. मी काही याला नियम म्हणत नाही. मी तुम्हाला एक सांगतो.. पृथ्वीराज चव्हाण साहेब नेहमी सांगायचे की, माझा महत्त्वाचा प्रोजेक्ट कोस्टल रोड आहे. ते मुख्यमंत्री होते.. त्यांची तेव्हाच्या शिवसेनेशी किंवा महापालिकेशी संबंध अतिशय चांगले होते. केंद्रात मनमोहन सिंह साहेबांचं सरकार होतं.. हे दर वेळेस जायचे आणि परत यायचे. एक परवानगी आणू नाही शकले.. कोणीच नाही.. मी त्यातल्या अडचणी समजवून घेतल्या. ते कोस्टल रोडचं काही करू शकले नाही.
मोदीजी हे विकासाचं व्हिजन असलेले.. त्यांच्या समोर विषय मांडले की, तात्काळ ते विषय मार्गी लावतात. त्यामुळे मोदीजींनी त्या आमच्या अडचणी समजून घेतल्या, त्याला मान्यता दिली. तीन पर्यावरण मंत्री त्यादरम्यान बदलले केंद्रामध्ये.. पण एक-एक करून त्यामधील सगळे अडथळे आम्ही दूर केले. नंतर प्रश्न हा निर्माण झाला होता की तुम्ही कोस्टल रोड तयार करता आहात त्यामुळे रेक्लमेशन तयार होणार, रेक्लमेशनमुळे जागा तयार होणार आहे त्यात तुम्ही नव्याने रियल इस्टेट तयार कराल. मी प्रतिज्ञापत्र दिलं, एक पत्र दिलं.. की, नाही तिथे फक्त गार्डन करेन. तिथे कुठलंही रियल इस्टेट तयार करणार नाही.
जेवढा परिसर तयार होईल.. जवळपास 150-200 एकर जागा तयार होईल कोस्टल रोडमुळे.. तिथे आम्ही फक्त गार्डन करू बाकी काही नाही..
प्रश्न: रिअल इस्टेटचा उल्लेख केला म्हणून.. ही एक फार मोठी समस्या आहे मुंबईमध्ये खासकरून रिअल इस्टेटच्या नावाने पैसा कमवला जातो. धारावी पुनर्विकास असेल किंवा कुठलाही पुनर्विकास प्रोजेक्टमध्ये त्या प्रकारचे आरोप व्हायला सुरुवात होते. तुम्ही मुख्यमंत्री असताना म्हणाला होतात की, त्या गोष्टीवर तुम्हाला चाप लावायचा आहे. तुम्ही मुंबईच्या बाहेरचे राजकारणी आहात. असं म्हणतात की, मुंबईत आल्यावर सवयी लागतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या तुमचा अनुभव कसा होता त्यामध्ये? तुम्ही त्यावर कसा अंकुश ठेवणार.
मुख्यमंत्री फडणवीस: हे खरंच आहे की, मला खूप मोठ्या प्रमाणात अनियमितता, भ्रष्टाचार पाहायला मिळाला. पण हळूहळू करून मी बऱ्यापैकी त्यावर अंकुश आणला. मागच्या माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा अंकुश आणून दाखवला. बऱ्यापैकी गोष्टी मार्गी लावल्या. तु्म्ही बघा आता पारंपारिक प्रोजेक्ट जे आहेत त्यामध्ये अडचणी आहेत. नव्या प्रोजेक्टमध्ये अडचणी नाहीत. नव्या प्रोजेक्टमध्ये सगळी पडताळणी केल्याशिवाय आम्ही त्याठिकाणी परवानगी देत नाही.
प्रश्न: ज्या भ्रष्टाचाराच्या केसेस.. तुम्ही मधल्या काळात बरेच आरोप-प्रत्यारोप केले होते. हे आपल्याला करायचं ते करायचं.. वैगरे.. त्याचं काय पुढे?
मुख्यमंत्री फडणवीस: नाही.. सगळं चालू आहे, म्हणजे कुठेच थांबलेलं नाही. म्हणजे आम्ही जी कारवाई करायची ती करतच आहोत.
प्रश्न: एक आरोप असाही केला जातो की, जेवढी वर्ष शिवसेनेने सत्ता उपभोगली मुंबई महानगरपालिकेत.. तुम्ही त्यांचे साथीदार होता. तुमचे इकडे जे लोकं आहेत ते त्यांचे साथीदार होते.
मुख्यमंत्री फडणवीस: तुमच्या माहितीकरिता.. 2017 ते 2022 आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो. आम्ही त्याठिकाणी चौकीदार होतो.
प्रश्न: चौकीदार म्हणून कधी दांडा वैगरे चालवला का?
मुख्यमंत्री फडणवीस: चालवला.. जोरात चालवला.. त्यांनी तर त्यावेळी जो उच्छाद मांडला. त्याचे पुरावे मी सभेदरम्यान देणार आहे ना.. काय-काय उच्छाद मांडलेला तो.. त्याही वेळी आमच्या लोकांनी आंदोलनं केली, लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले.. मुंबईकरांकरिता आम्ही संघर्ष केला.
प्रश्न: मला वाटतं तिकीट काढावं लागेल..
मुख्यमंत्री फडणवीस: नाही.. आम्ही तिकीट काढून ठेवलं आहे. तुमचं पण तिकीट काढलं आहे. काळजी करू नका.. सगळ्यांचे तिकीट काढून ठेवले आहेत.
प्रश्न: तिकिटांचा विषय निघाला म्हणून.. तिकीट काढणं सोप्पंय की कठीण आहे? महापालिकेमध्ये...
मुख्यमंत्री फडणवीस: तिकीटं काढणं सोप्पंय इथली.. महानगरपालिकेमध्ये जिंकून येणंही सोप्पं आहे. पण तिकीट वाटणं कठीण आहे.
प्रश्न: मी कामानिमित्त दिल्लीला सहसा जातो.. त्यावेळी लोअर परळहून एअरपोर्टला मी ट्रेनऐवजी मेट्रोने जातो. T2 ला ती जोडली गेली आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचता येतं.
मुख्यमंत्री फडणवीस: बघा.. मेट्रो हा एक असा पर्याय आहे एकतर त्याची एकूण स्वच्छता आणि बाकी गोष्टी यामुळे थोडा जो एलिट क्लास आहे.. त्यांनाही वापरण्याकरिता मेट्रो काही चुकीची वाटत नाही.
प्रश्न: मेट्रो महाग होतेय असं वाटतंय का? प्रोजेक्ट महाग होतोय म्हणून..
मुख्यमंत्री फडणवीस: प्रोजेक्ट महाग असेल.. जगामध्ये अशाप्रकारचे प्रोजेक्ट कॅपिटल इटेन्सिव्ह असल्यामुळे महाग पडतात. पण रनिंग कॉस्ट निघते, कॅपिटल कॉस्ट निघायला वेळ लागतो. आता आम्हाला कॅपिटल कॉस्टमध्ये अत्यंत कमी दरात कर्ज मिळाल्यामुळे आमचं चांगलं आहे. पण लवकरच रनिंग कॉस्ट निघते त्याची..
आता सगळ्या मेट्रो वर्ष, दोन वर्षात त्या ठिकाणी ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये जातील. पण एकूण नफा मिळविण्यास वेळ लागेल. त्याचा विचारही करू नये. कारण ती कॉस्ट कोणती आहे तर एन्व्हॉरमेंटल कॉस्ट आहे. तुम्ही जेव्हा मेट्रो करता तेव्हा रस्त्यावरच्या गाड्या कमी होतात त्यामुळे कार्बन कम्युटेशन जे कमी होतं ती कॉस्ट आपण कधी धरतच नाही. ती कॉस्ट आपण धरली पाहिजे.
साहील जोशी: माझे सहकारी आलेले आहेत, आपण चावडी सुरू करणार आहोत. मुंबई Tak ची ही आमची टीम आहे. आज आपण मेट्रोच्या डब्ब्यात ही चावडी करणार आहोत.
प्रश्न: मेट्रोच्या वेगाने महाराष्ट्राचं राजकारण बदलताना दिसतंय. आपण बघितलं की, ज्या पद्धतीच्या युती-आघाडी महाराष्ट्रात झाल्या. एकनाथ शिंदे साहेब तुमच्यासोबत आहेत पण बरीच ठिकाणी अशी का आहेत की, स्ट्रॅटेजिक युती दिसतेय.. तुम्ही त्यांना सोबत ठेवलेलं नाहीए की, निवडणुकीनंतरच्या युतीसाठी त्याचा वापर केला जाणार?
मुख्यमंत्री फडणवीस: मुळात.. या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांचं मन सांभाळावं लागतं. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही शेवटपर्यंत युतीचा प्रयत्न केला. पण 1-2 जागांवरून आमची युती तुटली. तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू. जवळपास आम्हाला वाटतं 12-13 आम्ही ठिकाणी युतीत आहोत. काही ते आणि राष्ट्रवादी युतीत आहे. काही ठिकाणी आम्ही आणि राष्ट्रवादी युतीत आहोत. त्यामुळे वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे.
प्रश्न: तुम्हाला तरी लक्षात राहतं का की कोणाबरोबर युतीत आहोत..?
मुख्यमंत्री फडणवीस: असं नाही.. दोन राष्ट्रवादीही युतीत आहेत. त्यामुळे कोण कोणासोबत आहे..
प्रश्न: तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत छ. संभाजीनगर, अकोला वैगरे.. इथून तुम्हाला सकाळपर्यंत फोनाफोनी चालू असेल ना? युती करायची, नाही करायची..
मुख्यमंत्री फडणवीस: आता छ. संभाजीनगर.. माझा खूप आग्रह होता की, युती झालीच पाहिजे. मी प्रयत्नही केला.. पण आता एका प्रभागात यांनाही पाहिजे, त्यांनाही पाहिजे. अशा याच्यावर तुटली.. काय होतं की, स्थानिक नेत्यांचं मनही सांभाळावं लागतं. खरं म्हणजे मी आमच्या लोकांना सांगितलंय, एक-दोन माणसं गेले तर काय फरक पडतो.. शेवटी सगळे तर काही निवडून येत नाही. पण त्यांचाही आग्रह होता की, हा तर आपला सीटिंग नगरसेवक आहे. सीटिंगचा वॉर्ड कसा द्यायचा.. एकमेकांना अनेक प्रपोजल दिले.. पण त्यांनी सांगितलं आम्हाला मान्य नाही. मग तोडली...
प्रश्न: भाजपचा घराणेशाहीला विरोध आहे, या निवडणुकीत तुम्ही स्वत: आदेश दिले होते की घराणेशाही नसेल. असं असतानाही घराणेशाही दिसली. तुम्ही म्हणालेले कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पण कार्यकर्ते रडताना, आक्रोश करताना दिसले.. तुमचा आदेश याचं उल्लंघन कसं काय झालं?
मुख्यमंत्री फडणवीस: मुळात, आम्ही घराणेशाही केलीच नाही. पण हे खरं आहे की, काही ठिकाणी रणनीतीच्या आधारे युती होती तिथे तो प्रश्न निर्माण झाला. आमच्याकडे नियम केला होता की, जे काही नगरसेवक होते त्यांना घराणेशाही समजू नये कारण ते पूर्वी नगरसेवक झाले आहेत. बाकी इतर आपण अशा पद्धतीने करू नये.
पण आपण पुण्याचा विचार केला.. तर पुण्यात शरद पवारांचे आमदार हे आमच्यासोबत आले. त्यांनी आल्यानंतर सांगितलं की, हा प्रभाग आम्हाला द्या.. कारण मागच्या वेळेस आम्ही निवडून आलो होतो. त्यांच्या मुलाकरिता आम्ही आधीच हो म्हणालो होतो. पण जे उमेदवार त्यांनी ठरवले.. त्यात कोणी दूरचा नातेवाईक आहे.
आता तुम्ही विचार केला तर त्या गावांमध्ये समोरचेही नातेवाईकांचं गाव आहे. पण आमचे जे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांना तिकीट मागितलं होतं. पण ते आम्ही नाही म्हटलं
प्रश्न: राहुल नार्वेकरांच्या घरातच तीन तिकीटं दिली आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस: त्यात काय आहे.. त्यांच्याकडे आधीपासूनच दोन जण होतेच. तिसरं तिकीट जे आहे ते आम्ही रणनीतीच्या आधारे निर्णय केला. बाकी आम्ही कुठेही दुसरीकडे असं केलं नाही.
प्रश्न: ही निवडणूक थोडी मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यावर चालली आहे. समजा, मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आली तर मुंबईतील मराठीपण कसं टिकवून ठेवणार आहात? हे तुम्ही कसं पाहणार आहात?
मुख्यमंत्री फडणवीस: पहिल्यांदा तुम्ही डोक्यातून काढून टाका की, मराठी वोट बँक दुसऱ्याची आहे आणि अमराठी आमची आहे. मराठी वोट बँक आमची आहे. हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसाने भाजपला मतं दिली नसती.. सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे 15 उमेदवार निवडून येत आहे. दुसरे कोणाचेच नाहीत. कोणीही दावा करू द्या.. भाजपच नंबर 1 राहिलेला आहे.
सगळ्या मराठीबहुल भागात आम्ही निवडून येतो. त्यामुळे मराठी, अमराठी.. सगळे आमचेच आहेत. असं आहे की, पहिल्यांदा मुंबईचं मराठीपण कोणी घालवू शकत नाही. मुंबई मराठीच आहे. कॉस्मोपॉलिटिन शहर आहे. या शहरामध्ये व्यवसायाकरिता लोकं येतात. पूर्वी मजूर यायचे.. आता या शहरामध्ये जे लोकं येतात.. टेक्नोलॉजीचं क्षेत्र आहे, आर्थिक बाबींशी संबंधित क्षेत्र आहे. त्यामध्ये देखील बाहेरून लोकं येतात. तरीही मुंबईचं मुंबईपण हे कुठेही घालवू शकत नाही कोणी.
आज बघा, मुंबईच्या गणेशोत्सवात.. सर्व प्रकारचे लोकं गणेशोत्सव साजरा करताना दिसतात ना तुम्हाला.. अगदी पारंपारिक मराठी पद्धतीने साजरा करताना दिसतात. त्यामुळे मुंबईची संस्कृती आपल्याला टिकवायचीच आहे. पण मुंबईची संस्कृती आणि त्याची जी वाटचाल आहे ती कुठेही इकडेतिकडे होऊ देणार नाही. त्यात काही तडजोड करणार नाही, ते कोणीही करू शकत नाही.
प्रश्न: पण कसंय.. आता कृपाशंकर सिंह म्हणतात की, उत्तर भारतीय महापौर झाला तर काय चुकीचं आहे?
मुख्यमंत्री फडणवीस: एक तर कृपाशंकर सिंह कुठे म्हणाले.. मीरा-भाईंदरमध्ये म्हणाले.. मुंबईत नाही म्हणाले. दुसरं.. कृपाशंकर सिंह हे आमचे अधिकृत प्रवक्ते आहेत का?
आता यांच्याकडे कोणी काही बोलतं.. तुम्ही आपलं मीरा-भाईंदरचं काढलं आणि मुंबईत दाखवलं. तुम्ही फार हुशार लोकं आहात. म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल.
प्रश्न: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युती हा भाजपसाठी चिंतेचा विषय आहे की संधीचा विषय आहे. भाजप याचं विश्लेषण कसं करतं.. युती तुमच्यामुळे झाली असं म्हणतात..
मुख्यमंत्री फडणवीस: त्याचं श्रेय घ्यायला मी 100 टक्के तयार आहे. मी तर त्यांचे आभार मानतो की, त्यांनी मला श्रेय दिलं. म्हणजे जी बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती.. जे बाळासाहेब करू शकले नाहीत ते मी जर करू शकलो.. तर मराठी माणसाला एकत्रित आणण्याचं काम मी केलंलं आहे. पण आता या युतीला खूप उशीर झाला आहे. असं आहे की, दोघांची मतं संपल्यानंतर ते एकत्र आलेले आहेत.
2009 साली एकत्र आले असते तर वेगळा निकाल आला असता.. आता एकत्र येऊन काही फायदा नाही. आता तुम्हाला मी सांगतो.. दोघांच्या मतांची टक्केवारी एवढी कमी आहे की, मराठी माणूसही यांना मत देणार नाही आणि अमराठीही यांना मत देणार नाही. त्यामुळे स्पष्टपणे सांगतो की, हे एकत्रित आल्याची आम्हाला काही चिंता नाही. आम्ही निश्चितपणे जिंकू.
आम्हाला यात संधी जास्त दिसते. याचं कारण काय आहे की, एकतर या दोघांचंही प्राबल्य एकाच ठिकाणी आहे. तिथे आमची मतं कधी हललेच नाही. आमची मतं कायम आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात अडचणी तयार झाल्या आहेत.
प्रश्न: देवेंद्रजी आता तुम्ही म्हणून टाका ना भाजपचा महापौर होईल म्हणून, जर सत्ता आली तर.. कारण 137 तुम्ही लढवत आहात, 90 शिंदे लढवत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस: नाही तुमची कितीही इच्छा असली.. भाजपचा महापौर व्हावा अशी तुमची मनापासून इच्छा असली तरी महापौर हा महायुतीचा होईल.
प्रश्न: तुम्ही नगरपरिषदा आणि नगर पंचायती निवडणुकांच्या प्रचारात नेहमी विकासावर बोलत होतात. तर भौतिक विकासाचं राजकारण करताना पर्यावरणाबाबत अडचणी येतात. एखादा प्रोजेक्ट जेव्हा येतो तेव्हा कुठे द्वंद असतं मनात की पहिले विकास की पहिले पर्यावरण? कारण तपोवन म्हणा, आरे म्हणा.. यावरून तुमच्यावर एकदम जहरी टीका झालीए.. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय.
मुख्यमंत्री फडणवीस: पहिल्यांदा पर्यावरणच महत्त्वाचं आहे. पण आपण ज्या मेट्रो 3 मध्ये बसलो आहोत ज्याला उद्धवजींनी विरोध केला, स्थगिती दिली.. 10 हजार कोटींनी याची किंमत वाढवली. त्या मेट्रो 3 च्या संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टात केस गेली आणि याचा एन्व्हॅरमेंटल इम्पॅक्ट अॅनालिसेस मांडला तेव्हा सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात लिहून ठेवलं आहे की, आरेमध्ये जी झाडं कापली ती सगळी झाडं त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन शोषून घेतील तेवढं ही मेट्रो 82 दिवसांच्या फेऱ्यांमध्ये करते.
आता मला सांगा.. की पर्यावरणाकरिता ती झाडं महत्त्वाची की मेट्रो महत्त्वाची? 82 व्या दिवसानंतर येणाऱ्या प्रत्येक दिवशी ही जर मेट्रो या ठिकाणी आपल्याला पर्यावरणपूरक असं वातावरण देणार असेल. इथल्या कार्बनडायऑक्साइडला कमी करणार असेल तर कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे?
बरं हे तर मी नाही ठरवेल.. एन्व्हॅरमेंटल इम्पॅक्ट अॅनालिसेस हा थर्ड पार्टीने करवला. सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने त्याची समीक्षा केली आणि सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं. तरी स्थगिती दिली.
बरं त्यांनी (ठाकरे सरकार) स्वत: जी कमिटी तयार केली होती त्या कमिटीने देखील त्यांना सांगितलं की, हीच (आरे) जागा बरोबर आहे. ते मुख्यमंत्री असताना झाली होती कमिटी.. त्याही कमिटीने सांगितलं. तरीही थांबवून ठेवलं.
10 हजार कोटीने याची जी किंमत वाढली आज ती किंमत कोणाकडून वसूल होणार?
प्रश्न: तरी हे द्वंद आहे का कुठे पर्यावरण की विकास?
मुख्यमंत्री फडणवीस: हे द्वंद नाहीच.. माझं म्हणणं आहे की, याठिकाणी पर्यावरणच पहिलं आलं पाहिजे. मात्र, आपल्याला प्रोजेक्ट्स करताना, विकास करताना पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो ते कमी करण्याचा विचार केला पाहिजे. ते कमी करून विकास केला पाहिजे.
प्रश्न: नवी मुंबईत असं चित्र दिसतंय की, तुमचे दोन आमदारच एकमेकांशी भिडतायेत. मंदा म्हात्रे म्हणतात की गणेश नाईकांना, संजीव नाईकांना Cm साहेबांनी फोन करून सांगितलं की, मला घ्या चर्चेत तरी सुद्धा ते मला घेत नाही. AB फॉर्मसुद्धा पळवले असं सुद्धा म्हणाले. हे आरोप तुमच्या दोन आमदारांमध्ये सुरु आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस: काही सामने हे ऐतिहासिक असतात.. नवी मुंबई तयार झाल्यापासून ऐतिहासिक सामने चालले आहेत. असं आहे की, चिंता करून तर काही फायदा नसतो. पण शेवटी त्यांच्यामध्ये कितीही मतभेद असले तरी दोघंही समजदार आहेत, परिपक्व आहेत. त्यामुळे पक्षाचं नुकसान नाही होऊ देणार.
प्रश्न: भाजप मित्र पक्षांसोबत जागा वाटप करताना सगळी तयारी करून बसतं. तुमची तीन ठिकाणी शंभर टक्के युती झाली. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली.. बाकी ठिकाणी तुम्ही रणनीती आखून युती केली आहे किंवा रणनीती आखून युती तोडली आहे. हे सगळं तुमचं ठरलेलं असतं की त्या-त्या परिस्थितीनुसार ठरतं.
मुख्यमंत्री फडणवीस: काही ठरलेलं नसतं. सगळीकडे युती करायची या प्लॅननेच आम्ही बसलो. पण त्यावेळेस आमच्या डोक्यात हे पक्कं होतं की, सगळीकडे युती होऊ शकत नाही. प्रयत्न हा सगळीकडे केला पाहिजे. काही ठिकाणी दोन्हीकडचे कार्यकर्ते खूप परिपक्व वागतात. त्यामुळे तिथे युती करणं हे सोप्पं असतं. आता तुम्हाला सांगतो कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या निवडणुकीनंतर तुलनेने आमची ताकद वाढली होती. म्हणून आमच्या लोकांचं मत होतं की, आपल्याला अधिक जागा मिळायला हव्यात.
शिंदे साहेबांकडे.. मागच्या शिवसेनेला 52 जागा मिळाल्या होत्या आणि काही काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे इतर लोकंही पक्षात आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लोकं होते. त्यामुळे इथे प्रश्न होता.. आम्ही प्रश्न मिटवला. आमचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी भूमिका घेतली की ठीकए.. आपण यात तडजोड करायची असेल तर थोडं नुकसान करावं लागेल. आम्ही सहन केलं.
प्रश्न: निष्ठावंतांची यावेळेस खूप चर्चा आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही लोकं अंगावर पेट्रोल ओतून घेत आहेत.. म्हणजे फार विदारक व्हिडिओ आहेत. तर बाहेरच्या लोकांना आल्यानंतर जी तिकिटं मिळाली त्यामुळे रोष दिसतोय. तुम्ही असे नेते आहात की, ज्यांनी कायम अशा लोकांना पण सोबत घेतलंय आणि नव्यांना पण सोबत घेतलंय. या लोकांना तुम्ही कसं समजवणार?
मुख्यमंत्री फडणवीस: आपण एक समजून घेतलं पाहिजे की, माध्यमांमध्ये जे दिसतायेत ते सगळे काही निष्ठावान नाहीए. काही निओ-निष्ठावंत आहेत. म्हणजे काल-परवा येऊन ते निष्ठावंत झाले आहेत. पण काही निश्चित निष्ठावंत असतील. मुळामध्ये या निवडणुकीची अडचण काय लक्षात घ्या.. प्रत्येक निवडणूक एक पिढी तयार करते. 2017 ची निवडणूक झाल्यानंतर 2022 पर्यंत एक पिढी तयार झाली. त्यांना निवडणूक लढता आली नाही. कारण 2022 साली निवडणूक झाली नाही. त्यानंतर 4 वर्ष जवळपास.. 2022 ते 2026 अशी एक पिढी तयार झाली. त्यामुळे 2026 च्या निवडणुकीत 2017 ची पिढी आणि 2022 ची पिढी अशा दोन पिढ्या एकत्रित उतरल्या.
जागा तेवढ्याच आहेत. त्यामुळे या निवडणुकीत.. फक्त आमच्या पक्षात नाही सगळ्या पक्षात हीच परिस्थिती पाहायला मिळाली. पुण्यामध्ये उद्धवजींचं पोस्टर फाडणारे, कुठेतरी राष्ट्रवादीचा झेंडा जाळणारे.. असे देखील आपण लोकं पाहिले. याचं कारण काय तर खूप जास्त इच्छुक तयार झाले.
दुप्पट लोकं तिकिटं मागू लागले. अलीकडच्या काळात काय होतं की, आता लोकांना तात्काळ गोष्टी हव्या आहेत. 5 वर्ष थांबण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. एक काळ होता की, कार्यकर्ते 20-20 वर्ष काम करायचे आणि त्यानंतर त्यांना तिकिटं मिळायची. आता ती स्थिती नाही. त्यामुळे थोडं स्पर्धात्मक आशा-आकांक्षा लोकांच्या आहेत. कठीण गेलं.. अर्थात जेवढं जास्त दाखवलं गेलं तेवढं नव्हतं. म्हणजे दोन-चार, दोन-चार लोकं होते. काय असतं.. कॅमेरा समोर आहे म्हटल्यानंतर थोडा चेव तर येतोच ना..
प्रश्न: तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की, ठाकरे ब्रँडच्या विरोधात तुमच्याकडे एक मोदी ब्रँड आहे. तु्म्हाला किती आत्मविश्वास आहे की, मोदी ब्रँड हा ठाकरे ब्रँडवर मात करू शकतो.
मुख्यमंत्री फडणवीस: बघा.. ठाकरे ब्रँड हा मोस्ट पॉवरफुल ब्रँड होता.. जोपर्यंत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. ते एकमेव ब्रँड होते. त्यानंतर ब्रँड नाही..
प्रश्न: आता शिंदे ब्रँड आहे?
मुख्यमंत्री फडणवीस: शिंदे हे एक राजकारणातील वेगळं चुंबक आहे. शिंदे हे वेगळं चुंबक आहे..
प्रश्न: फडणवीस ब्रँड आहे?
मुख्यमंत्री फडणवीस: फडणवीस ब्रँड नाही... फडणवीसचा काही स्वत:चा वजूद नाही. फडणवीस जे काही ते भाजपमुळे आहेत. भाजपचा नेता म्हणून फडणवीसचा वजूद आहे.
प्रश्न: देवा भाऊ वैगरे असे होर्डिंग लागले होते.. आम्हाला वाटत होतं की देवा भाऊ पण ब्रँड आहे?
मुख्यमंत्री फडणवीस: ते प्रेम आहे.. तो ब्रँड नाही.. ते जनतेने दिलेलं प्रेम आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, मी कुठेही या नंदनवनात फिरत नाही की, माझ्यामुळे भाजप आहे, माझ्यामुळे सत्ता आहे.. माझ्यामुळे विजय आहे. मला हे माहिती आहे की, भाजपची ताकद माझ्या मागे आहे. हो.. माझा चेहरा दिसेल कारण मी आज नेता आहे. पण त्या नेत्याच्या मागची ताकद ही देवेंद्र फडणवीस नाहीए. ती भाजप आहे..
प्रश्न: तुम्ही म्हणालात की, एक नवीन पिढी तयार होते आहे पक्षातील.. तर ही पिढी प्रामुख्याने तुम्हाला बघून घडते आहे. तर ही देवा भाऊची किंवा देवेंद्र फडणवीसांची पिढी म्हणून भाजपमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळेल का?
मुख्यमंत्री फडणवीस: भाजपमध्ये दोन गोष्टी असतात.. त्या-त्या वेळी जे नेते तयार होतात. ते राज्याचं नेतृत्व आणि केंद्राचं नेतृत्व असे दोन्ही नेतृत्व पाहून तयार होतात. आता आम्ही लोकांनी अटलजी, अडवाणीजी, प्रमोदजी, गोपीनाथजी यांना पाहून तयार झालो. तसं त्या-त्या वेळचे जे नेते असतात त्यांच्याकडे पाहून लोकं तयार होतात.
प्रश्न: दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर असं म्हणत आहेत की, मुंबई धोक्यात आहे. 2007, 2012, 2017 ची निवडणूक यामध्ये हा नरेटिव्ह राहिला आहे की, मुंबई धोक्यात आहे.. आणि ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. असं का आहे?
मुख्यमंत्री फडणवीस: मी विधानसभेतच सांगितलं होतं की, निवडणूक जवळ आलीए आता हा डायलॉग येणार की, मुंबई तोडण्याचा डाव. त्यांनाही माहितीए की, मुंबई कोणी तोडू शकत नाही.. मुंबई तोडली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रापासून मुंबई कधीच वेगळी होणार नाही. त्यांना हे समजत नाही की, आता यावर मतदान होत नाही. लोकांनाही समजलेलं आहे. अडचणच ही झालेली की, लोकांच्या जवळचे प्रश्न काय आहेत. हे त्यांना समजत नाही. किंवा कदाचित.. ही पण शक्यता आहे की, ते एवढे हुशार आहेत की, त्यांना हे पण माहिती आहे की, विकासावर चर्चा झाली तर आपल्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही.
त्यामुळे चर्चा भावनिक मुद्द्यांवरच ठेवा.. मुंबई तोडणार यावरच चर्चा ठेवा.. कारण विकासावर आलात तर लोकं विचारतील तुम्ही काय केलं ते दाखवा.
प्रश्न: मराठी माणसाचा नेमका प्रश्न तुम्हाला काय वाटतो.. मराठी माणूस नेमका कोणत्या गोष्टीत भरडला जातो?
मुख्यमंत्री फडणवीस: सगळ्यात महत्त्वाचा मराठी माणसाचा महत्त्वाचा प्रश्न हा घराचा आहे. हा मराठी माणूस दक्षिण मुंबईतून हद्दपार का झाला? स्वस्तात घर नाही म्हणून हद्दपार झाला. दक्षिण मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला घर आम्ही देतोय. हे फक्त बोलत राहिले. गिरणी कामगार गेले, मराठी माणूस गेला..
कोणाकरता केलं? मोर्चे काढले.. मोर्चांनी पोट भरतं का? तुमच्याकडे इतके वेळा सत्ता होती.. तुम्ही एक प्रोजेक्ट केला? तुम्ही एकही नाही केला.. बीडीडी चाळीचा प्रोजेक्ट मी करून दाखवला. बीडीडी चाळीमध्ये 80 हजार लोकं.. जे मुंबईतून हद्दपार झाले असते मराठी माणूस...
प्रश्न: आदित्य ठाकरे पण त्याचं श्रेय घेतात..
मुख्यमंत्री फडणवीस: काय त्यांचा संबंध सांगा ना.. आदित्य ठाकरे आमदार व्हायच्या आधीपासून तो प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे. ते तर आमदारच नव्हते. जेव्हा आम्ही बीडीडी चाळीचं बांधकाम सुरू केलं तेव्हा आदित्य ठाकरे आमदार व्हायचे होते.
प्रश्न: ते म्हणतात की, आताचे सत्ताधारी फक्त फित कापायला आले.. म्हणून ते म्हणतात आमचं श्रेय..
मुख्यमंत्री फडणवीस: मुंबईकरांना माहितीए.. त्यामुळे शेजाऱ्याचं पोरगं यांनी आपल्या मांडीवर बसवलं तरी आपलं पोरगं म्हणून त्यांना कोणीच श्रेय देणार नाही. मुंबईला माहितीए की, इन्फ्रस्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये काय घडलेलं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो.. बीडीडीचाच प्रश्न विचारतो.. इतके वर्ष बीडीडी का झालं नाही?
कारण यांचा रस बिल्डरमध्ये होता. मी निर्णय केला की, बिल्डर येणार नाही.. म्हाडा स्वत: करेल म्हाडा स्वत: पैसा लावेल. ते यायच्या आधी टेंडर केलं मी, बांधकाम सुरू केलं. माझं झालेलं भूमीपूजन त्यांनी दुसऱ्यांदा केलं.
प्रश्न: मुंबईतील मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही याच्यासाठी एखादी पॉलिसी योजना तुमच्या डोक्यात आहे का? कारण मराठी माणसाला इथे 2-3 कोटींची घरं नाही परवडणार, आपल्याला जावं लागणार.. ती भीती त्यांच्या मनात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस: ती भीती काढण्याकरिता.. फक्त आम्ही बीडीडीवर थांबलो नाही. अभ्युदय नगर.. दुसरी मराठी माणसांची जागा.. आता अभ्युदय नगरवाल्याला विचारा.. इतके वर्ष तिथे शिवसेनाच होती ना.. उद्धवजींची सेनाच होती. इतके वर्ष का बरं बिल्डरच्या विळख्यात फसून राहिले. आज बांधकामाच्या स्टेजवर मी तीन वर्षात आणून दाखवलं अभ्युदय नगर.. बांधकाम चालू होतंय आता.
मराठी माणसाला फक्त घर नाही.. 120 फुटाच्या घरात राहणारा माणूस हा 520 फुटामध्ये चालला आहे. ज्या मराठी माणसाला वाटत होतं की, वसई-विरारच्या पलीकडे जावं लागेल.. आज त्याला आपण त्या ठिकाणी मोफत घर देतोय. हा सगळा पुनर्विकास सुरू केलेला आहे. म्हणून मी म्हणतो तुम्ही सांगा ना काय केलं मराठी माणसासाठी? मी सांगतो छाती ठोकून मराठी माणसासाठी काय केलं.
प्रश्न: भावनिक मुद्द्याच्या राजकारणाला तुम्ही कसं प्रत्युत्तर देणार?
मुख्यमंत्री फडणवीस: भावनिक राजकारणाशिवाय ते काहीच करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही. प्रत्येकाचं ज्यावेळेस मी उत्तर देईल ना.. ते निरुत्तर आहेत.
प्रश्न: तरीही भाजपकडून ही भीती घातली जाते ना.. की, खान महापौर होईल जर शिवसेना आली तर..
मुख्यमंत्री फडणवीस: मी तर स्पष्टपणे म्हटलं.. हिंदू होईल, महायुतीचा होईल आणि मराठी होईल. त्यांच्या मुलाखती बघा.. ते म्हणतात खानही मराठी बोलत असेल तर तो मराठीच आहे. याचा अर्थ काय?
प्रश्न: पण ही हिंदुत्व विरुद्ध मराठी लढाई आहे का?
मुख्यमंत्री फडणवीस: हिंदुत्व आणि मराठी वेगळं होऊच नाही.. हे बाळासाहेबांनीच सांगितलं आहे. प्रत्येक मराठी माणूस हा हिंदुत्ववादी आहे.
प्रश्न: हिंदुत्व हा तुमचा भावनिक मुद्दा आहे ना?
मुख्यमंत्री फडणवीस: तो राहीलच तो आम्ही सोडूच शकत नाही.. पण त्याच्यावर आम्ही मत मागत नाही ना. आम्ही त्यासोबत विकास मांडतो. ते विकास मांडतच नाहीत. मी तर 4 वेळा चँलेंज दिलं ना.. की, उद्धवजींच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवा आणि 1 हजार रुपये मिळवा. माझे हजार रुपये वाचलेच आहेत.
प्रश्न: आपण आता मेट्रोतून सिद्धीविनायक स्टेशनच्या बाहेर पडलोय. मुंबईच्या बाहेर सुद्धा शहरीकरण हे फार वाईट पद्धतीने झालं आहे. मग ते ठाणे असेल.. ठाण्यात सुद्धा तुम्ही पहारेकरी होता. फक्त मुंबईत नाही.. तिकडचा पहारा करताना देखील तुम्हाला काही तरी आढळून आलं असेलच ना?
मुख्यमंत्री फडणवीस: आम्ही जो विकास केलं आहे आणि जे नियोजन केलंय ते MMR चं केलं आहे. मेट्रो ही ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या सगळ्या भागात चालली आहे. रोडचं नेटवर्क त्यानंतर बोगदे या सगळ्या भागात सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचं नियोजन.. तुम्ही बघा एक आणखी गोष्ट सांगतो..
मुंबईला पिण्याचा पाण्याकरिता गार्गाइचा प्रोजेक्ट.. किती वर्ष ऐकतोय आपण.. तीन वेळा तो वनविभागाने नाकारला. आम्ही अभ्यास केला त्याचा.. का नकार देत आहेत. सोपी गोष्ट होती.. त्यांचं म्हणणं होतं की, तुम्ही एक गाव बाहेर काढतायेत.. 5 गावं आहेत तुम्ही जर पाचही गावं बाहेर काढली तर आमचं अभयारण्य सुरक्षित होईल आणि आम्हाला परवानगी देता येईल.
15-20 वर्षात त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. ज्यावेळेस मी त्यात लक्ष घातलं आणि त्याच्या बैठका घेतल्या आणि अडचण समजून घेतली. त्यानंतर काही तज्ज्ञांना बसवलं, आमचे प्रवीण परदेशी आहेत ज्यांचा यावर अभ्यास आहे. आणि हा निर्णय केला. गार्गाईला परवानगी मिळाली.. गार्गाईचं टेंडर निघालं. म्हणजे मुंबईच्या पिण्याच्या पाण्याकरिता 500 एमएलडी पाणी आणि गार्गाई हा सगळ्यात स्वस्त प्रोजेक्ट.. सगळ्यात जवळचा प्रोजेक्ट.. केला मंजूर. आता हे यांना का नाही मंजूर करता आलं?
प्रश्न: जे आरोप मुंबईच्या बाबतीत झाले तेच आरोप ठाण्याच्या बाबतीत सुद्धा झाले. संजय केळकरांनी केले होते ते आरोप.. त्याबद्दलही काही ना काही होईलच ना?
मुख्यमंत्री फडणवीस: पहिली गोष्ट अशी आहे की, राजकारणात जेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो तेव्हा आरोप-प्रत्यारोप केले. पण मोठ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा आम्ही सोबत आहोत. जेवढा आम्ही MMR रिजनचा विचार केला आहे तेवढा कोणीही केलेला नाही. आज तुम्ही संपूर्ण MMR रिजनमध्ये सुरू असलेली कामं पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. देशामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक MMR रिजनमध्ये आहे.
प्रश्न: आता शिंदेंसोबत काम करताना कसं वाटतं? आपण त्यात तीन भाग करूया. 2014 ते 2019 मध्ये कसं वाटलं.. 2019 ते 2022 आणि 2022 ते 2024 मध्ये कसं वाटलं?
मुख्यमंत्री फडणवीस: आम्ही जे सोबत आहोत ना.. त्याचा पाया हा 2014 ते 2019 आहे. 2014 ते 2019 मध्ये त्यांच्या पक्षात त्यांच्यावर जो अन्याय होत होता तेव्ही मी त्यांच्यासोबत होतो. ज्यावेळी त्यांना दाबलं ज्याचं.. त्यांना एमएसआरडीसीचं खातं का दिलं? हे समजून दिलं की, या खात्यात काही नाही. मी त्यावेळेस.. शिंदे साहेबांना विचारा तुम्ही.. मी त्यांना सांगितलं की, शिंदे साहेब महाराष्ट्रातील सर्वात मोठं खातं हे करून दाखवा. आणि करून दाखवलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तेव्हापासून ती आमची जी मैत्री आहे किंवा जे काही संबंध आहेत ते तयार झाले.
2022 ते 2024 ते मुख्यमंत्री होते आणि मी उपमुख्यमंत्री होते. पण कधीही आमच्या दोघांच्या संबंधात कुठेही अंतर आलं नाही. माझा तो स्वभाव आहे.. आता काल सकाळी त्यांनी फोन केला की, मी रात्रभर जागा आहे. त्यामुळे मी आज काही मंत्रिमंडळ बैठकीला येऊ शकणार नाही. कारण तब्येत ठीक वाटत नाही.
मी म्हटलं.. तीनच विषय आहेत, साधे विषय आहेत.. नाही आलात तरी चालेल. ते आले नाही. मीडियाने चालवलं.. शिंदे नाराज.. आले नाही. आता याला काही उत्तर नाही. आमच्यातील संबंध सहज आहेत एकदम. कधीही कुठलीही अडचण आली तरी लगेच बोलून त्या दूर करू शकतो.
कधी अशी वेळ येते की, पक्षाकरिता आम्हाला भूमिका घ्यावी लागते. म्हणजे एखादी भूमिका आम्हा दोघांना पटते पण आमच्या पक्षांना नाही पटत. त्यावेळेस मग आम्ही बोलतो आणि सांगतो की, हे नाही शक्य.. आमचा पक्ष नाही ऐकत.
प्रश्न: मागच्या वर्षी मी तुमची मुलाखत केली होती. त्यात तुम्हाला विचारलं होतं.. की, महाराष्ट्रात एक समुद्र मंथन सुरू आहे त्यातून सगळं अमृत निघतंय ते सगळं तुमचे सहकारी पक्ष घेतायेत. म्हणजे त्याचं नाव मी घेत नाही.. पण यावेळी जे मंथन झालंय त्यात तुम्हाला अमृत शेवटी मिळालंय का?
मुख्यमंत्री फडणवीस: आम्ही विषही मिळालं तर अमृत समजून घेतो. त्यामुळे काही अडचण नाही. विषाला अमृतात परिवर्तीत करायची ताकद ठेवणारे आम्ही लोकं आहोत. आम्ही विषही पिऊ, अमृतही पिऊ..
प्रश्न: आपण हा जो भाग आहे.. तो ठाकरेंचा गड समजला जातो.. तुम्हाला वाटतं हा अजूनही गड राहील? ठाकरे ब्रँड संपेल असं वाटतं का? शेवटी ठाकरे ब्रँड संपणार नाही यावर ते एकत्र आलेले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस: पहिली गोष्ट.. कोणी कोणाला संपवत नसतं. राजकारणात जय आणि पराजय होत असतो.. त्यामुळे हा संपेल तो संपेल यावर विश्वास ठेवणारा मी नाही. दुसरं मी पुन्हा एकदा सांगतो.. ठाकरे ब्रँड एकच होता. आता ठाकरे ब्रँड नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड होता. आता ब्रँड वैगरे काही नाही.. त्यामुळे या निवडणुकीत आमची महायुती निवडून येईल आणि महायुतीचा महापौर बसवू हा मला पूर्ण विश्वास आहे.
प्रश्न: दोन पवार पण एकत्र येत आहेत. पवार ब्रँड पण एकत्र येतोय. त्याने काही पुढे जाऊन अडचण..
मुख्यमंत्री फडणवीस: ते सगळे मोठे मोठे लोकं आहेत. मी सामान्य माणूस आहे. माझा कुठलाही ब्रँड नाही. त्यामुळे एवढंच सांगतो की, लोकांनी आमचं काम बघितलेलं आहे. मी जे व्हिजन मांडलं ते अस्तित्वात आणू शकतो. हे मुंबईने, पुण्याने, नागपूरने, MMR रिजनने सगळ्यांनी पाहिलं आहे. सगळ्या महानगरांना माहिती आहे की, जे-जे बोलत होतो ते सगळं करून दाखवलं आहे. त्यामुळे निश्चितपणे लोकं आम्हाला मत देतील.
ADVERTISEMENT











