मुंबई शहरातली लोकल सेवा ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन मानली जाते. मध्यंतरी कोविडच्या काळात सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद होता, परंतू आता सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अनेकदा ही लाईफलाईन प्रवाशांच्या जिवावर उठल्याचं आपण ऐकलं आहे. मुंबईत अशाच पद्धतीने एका तरुणाला गर्दीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
ADVERTISEMENT
पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते मालाड दरम्यान ही घटना घडली आहे. रतन विश्वकर्मा (वय २२) असं या तरुणाचं नाव असून गोरेगाव ते मालाड दरम्यान झालेल्या या अपघातात रतनचा जागेवरच मृत्यू झाल्याचं कळतंय.
मयत तरुण रतन विश्वकर्मा हा नालासोपारा भागात राहणारा आहे. मंगळवारी संध्याकाळी आपलं काम आटोपून त्याने अंधेरी स्थानकातून ट्रेन पकडली. या वेळी ट्रेनला गर्दी असल्यामुळे रतनला आत शिरताच आलं नाही. प्रवाशांची खच्चून भरलेल्या ट्रेनमुळे रतन दरवाज्यावरच लटकून राहिला. यावेळी तोल सुटल्यामुळे गोरेगाव ते मालाडदरम्यान खांबाचा फटका लागून रतन खाली पडला ज्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
वाशिम : विहीरीचा भाग खचून २ मजुरांचा मृत्यू, १ जखमी
बोरीवली रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरु केला आहे. परंतू रतनच्या अशा पद्धतीने अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकदा रेल्वे प्रशासन असे प्रकार टाळण्यासाठी प्रवाशांना दारात लटकून प्रवास न करण्याचा सल्ला देत असते. परंतू गर्दीच्या वेळी प्रवाशांचाही नाईलाज होत असल्यामुळे असे प्रकार घडत राहतात.
ADVERTISEMENT
