Abhijeet Dipke us education scholarship : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी झालेल्या खर्चावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या निधीबाबत यापूर्वी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी दीपके यांच्या शिक्षणाच्या खर्चाबाबतही महाराष्ट्र सरकारकडे तक्रार केली आहे. तिवारी यांनी 1 ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीत दीपके यांचे वडील छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा पगार सुमारे 60 ते 65 हजार रुपये होता, अशी माहिती देत अशा परिस्थितीत अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा परवडला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोग आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस यांनीही या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, तरीही 'या' जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
अभिजीत दीपकेंचा शिक्षणाचा खर्च किती डॉलर्स?
या आरोपांवर अभिजीत दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या शिक्षणासाठी मिळालेल्या स्कॉलरशिपचे पत्र सार्वजनिक केले असून आवश्यक असल्यास स्कॉलरशिप आणि शिक्षण कर्जाशी संबंधित कागदपत्रेही दाखवण्याची तयारी दर्शवली आहे. दीपके यांनी बॉस्टन विद्यापीठातील कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमध्ये मास्टर ऑफ सायन्स इन पब्लिक रिलेशन्स हा तीन सेमिस्टरचा अभ्यासक्रम केला. त्यांनी सादर केलेल्या पत्रानुसार, 2024 मधील एक आणि 2025 मधील दोन अशा एकूण तीन सेमिस्टरसाठी त्यांना प्रत्येक सेमिस्टरला 12,500 डॉलरची डीन स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली होती. या पत्रात त्यांची निवड उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या गटातून झाल्याचा उल्लेख आहे. प्रवेश समिती त्यांच्या शैक्षणिक कामगिरी आणि अनुभवाने प्रभावित झाल्यामुळे ही शिष्यवृत्ती देण्यात आल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : AI चा प्लॅन अन् तळघरात सापडला वैभवचा मृतदेह, शिक्षकाला अटक; नेमकं प्रकरण काय?
शिक्षणासाठी लागलेला अतिरिक्त खर्च कसा भागवला?
मात्र प्रत्येक सेमिस्टरचा खर्च सुमारे 20 ते 22 हजार डॉलर असल्याने उर्वरित खर्च कसा भागवण्यात आला, हा प्रश्न कायम राहतो. याबाबत दीपके यांचे म्हणणे आहे की त्यांनी सुमारे 50 लाख रुपयांचे शिक्षण कर्ज घेतले होते. हे कर्ज भारतातील एका नामांकित बँकेकडून घेतल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे अद्याप सार्वजनिक झालेली नाहीत. त्यामुळे कर्जाची माहिती सध्या केवळ दीपके आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसारच समोर आली आहे. दीपके यांचा दावा आहे की हे कर्ज अद्याप पूर्णपणे फेडलेले नसून त्याची परतफेड सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेतील शिक्षणासाठी लागलेला अतिरिक्त खर्च त्यांनी कर्जाच्या माध्यमातून भागवला, असे त्यांचे म्हणणे आहे.
अमित तिवारी यांनी आपल्या तक्रारीत आणखी काही मुद्देही उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, कॉक्रोच जनता पक्ष हा नोंदणीकृत राजकीय पक्ष नसतानाही तो राजकीय पक्षाप्रमाणे कार्य करत आहे. तसेच आंदोलकांना देण्यात आलेल्या एक कोटी रुपयांच्या कायदेशीर मदतीबाबतही त्यांनी आक्षेप घेतला असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार कॉक्रोच जनता पक्षाची निवडणूक आयोगाकडे अद्याप नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या तक्रारींवर संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. तसेच दीपके यांनी घेतलेल्या शिक्षण कर्जासंदर्भातील अधिकृत कागदपत्रेही सार्वजनिक झालेली नसल्याने या प्रकरणातील अनेक बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
ADVERTISEMENT











