Angar Nagar Panchayat elections : अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली असून, आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतचा अधिकृत आदेश काढला आहे. महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 मधील संबंधित तरतुदीनुसार काही ठिकाणी आवश्यक ती निवडणूकपूर्व कार्यवाही वेळेत पूर्ण न झाल्याचे समोर आल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
अनगरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही नगरपरिषदांमध्ये दाखल अपीलांवर न्यायालयांनी 23 नोव्हेंबरपर्यंत निकाल दिल्यामुळे तिथे प्रक्रिया सुरळीतपणे पुढे गेली. मात्र अनगरचा निकाल 25 नोव्हेंबर रोजी लागल्याने तांत्रिक कारणास्तव प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. सुधारित कार्यक्रम लागू झाल्यानंतर अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एकच वैध उमेदवारी अर्ज असल्याची माहिती आयोगाकडे पाठविली जाणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा करू शकतो.
या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “अनगरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. कोणत्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, हा न्यायालयाचा विषय आहे. आम्ही आदेशाचा अभ्यास करून न्यायालयात आमची भूमिका मांडणार आहोत. अद्याप मला आदेश पाहायला मिळालेला नाही.”
दरम्यान, राज्यातील तब्बल 20 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाल्याने अनेक ठिकाणी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचाराचा जोरदार धुरळा उडत असताना अचानक निवडणूक पुढे ढकलल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या नगरपरिषदांमध्ये प्रक्रिया थांबवण्यात आली आहे, तिथे आता 20 डिसेंबर रोजी मतदान होईल, तर 21 डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. उर्वरित ठिकाणी मात्र 2 डिसेंबरलाच नियोजित मतदान पार पाडले जाणार आहे.
अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी नामांकन दाखल केले होते. छाननीदरम्यान उज्वला थिटे यांच्या नामनिर्देशनपत्रात सूचकाची सही नसल्याचे आढळले आणि त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला. त्यानंतर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनीही माघार घेतली. परिणामी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध नगराध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











