Avinash Jadhav and Marathi Girl Kalyan Dombivali Video ,डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाला प्रश्न आणि मराठी माणसांवरील अन्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. मराठी तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव शुक्रवारी (दि.23) थेट डोंबिवलीत दाखल झाले असून, यावेळी त्यांनी महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. डोंबिवलीमध्ये एक मराठी तरुणी शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत असून, पालिकेकडून केवळ तिच्याच गाडीवर वारंवार कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय.
ADVERTISEMENT
दुसरीकडे मात्र, स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय फेरीवाल्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करत अविनाश जाधव डोंबिवलीत येताच परिसरातील फेरीवाल्यांमध्ये एकच पळापळ उडाल्याचे चित्र दिसून आले. मनसे पदाधिकारी रस्त्यावर उतरताच अनेक फेरीवाले आपली गाडी घेऊन पसार झाल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, संबंधित मराठी तरुणीने माध्यमांसमोर आपली खंत व्यक्त करताना गंभीर आरोप केले. माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊनही पालिकेकडून माझ्यावरच कारवाई केली जाते, तर इतर फेरीवाल्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप तिने केला. यामुळे पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा : जालना : दुचाकीवरुन आले अन् युवकावर तीन गोळ्या झाडल्या, शहराच्या मध्यवर्ती भागात तरुणाची हत्या
मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. मराठी माणसावर अन्याय सहन केला जाणार नाही. महापालिकेच्या या दुटप्पी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल. या घटनेनंतर डोंबिवलीत फेरीवाला धोरण, हप्ता वसुली आणि मराठी विरुद्ध परप्रांतीय असा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, पुढील काळात या प्रकरणावरून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मग आम्ही मराठी आहोत म्हणून आमच्यावर अन्याय का ? तरुणीचा थेट सवाल
परप्रांतीयांना टपऱ्या टाकायला परवानगी मिळते, मग आम्ही मराठी आहोत म्हणून आमच्यावर अन्याय का ? असा थेट सवाल करत एका मराठी तरुणीने मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मला तुम्ही टपरी टाकून द्या, त्यावर राज ठाकरे यांचा फोटो लावून द्या, अशी भावनिक मागणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ डोंबिवलीतील असल्याचे सांगितले जात असून, अविनाश जाधव यांच्या समोर तरुणीने रोजगार, संधी आणि मराठी माणसांवरील कथित दुजाभावाबाबत आपली खदखद व्यक्त केली. मराठी तरुणांना व्यवसाय, टपरी, रोजगार मिळताना अडचणी येतात, मात्र परप्रांतीयांना सहज परवानग्या मिळतात, असा आरोप यावेळी तरुणीने केला. तरुणीचे म्हणणे ऐकून घेत अविनाश जाधव यांनी तरुणीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठी विरुद्ध परप्रांतीय या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











