Bachchu Kadu Farmer Protest, Nagpur : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन सुरु केलंय. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दुधाला योग्य दर आणि कांद्याला स्थिर बाजारभाव या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सकाळपासून प्रहार संघटनेने जबलपूर-हैदराबाद महामार्ग रोखलाय. शेतकऱ्यांना दिलासा न मिळाल्यास रेल्वे रोखण्याचा थेट इशारा देत बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. आंदोलन सुरु असताना प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर झोपलेले पाहायला मिळाले आहेत, त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गांसह चार प्रमुख मार्ग बंद केले आहेत. परिणामी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, गेल्या 15 तासांहून अधिक काळ शेकडो वाहने महामार्गावर अडकून पडली आहेत.
ADVERTISEMENT
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आजवर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा दिलेला नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना, सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. “दिवाळी उलटून गेली, पण सरकार झोपेतच आहे. शेतकरी उपाशी आहे, त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रेल्वे रोखणार ” असे बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा : मोठी बातमी : राज्यातील नगराध्यपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा
बच्चू कडूंनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत?
1. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी कोणत्याही अटींशिवाय जाहीर करावी.
2. शेतमालाला हमीभावासह (MSP) 20% अनुदान द्यावे.
3. शहरासारखेच ग्रामिण घरकुल योजनेत 5 लाखांचे अनुदान द्यावे.
4. पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च मनरेगा योजनेतून करावा.
5. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा.
6. दिव्यांग, निराधार, विधवा आणि अनाथ व्यक्तींना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे.
7. मेंढपाळ व मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न सोडवावेत.
8. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कायमस्वरूपी मार्गी लावावे.
याशिवाय, बच्चू कडू यांनी ऊस उत्पादक आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मागण्या मांडल्या आहेत. ऊसाला 9% रिकव्हरीसाठी प्रति टन 4300 रुपये आणि प्रत्येक टक्क्यासाठी 430 रुपये एफआरपी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देत, गायीच्या दुधासाठी किमान 50 रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी 65 रुपये दर ठरवावा, अशी मागणीही कडूंनी केली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य आणि निर्यात कर कायमस्वरूपी रद्द करावा, तसेच एनसीसीएफ आणि नाफेड या संस्थांचा वापर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवण्यासाठी करावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











