Abrar Ahmed kavya maran sunrisers leeds controversy hundred 2026 bcci reaction : लंडनमध्ये आयोजित 'द हंड्रेड' (The Hundred 2026) या क्रिकेट स्पर्धेच्या पुरुष खेळाडूंच्या लिलावानंतर एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. आयपीएलमधील 'सनरायझर्स हैदराबाद' या संघाच्या मालकीण काव्या मारन यांच्या मालकीच्या 'सनरायझर्स लीड्स' (Sunrisers Leeds) या संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. भारतीय उद्योजक कलानिधी मारन यांच्या 'सन ग्रुप'च्या मालकीच्या या संघाने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी असताना, एका भारतीय मालकीच्या संघाने विदेशी लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे सोशल मीडियावर काव्या मारन यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. काव्या मारन या लिलावाच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याने चाहत्यांनी थेट त्यांच्यावर निशाणा साधला असून हा निर्णय भारतीय भावना दुखावणारा असल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
अबरार अहमदसाठी कोट्यवधींची बोली आणि चाहत्यांचा रोष
या लिलावात पाकिस्तानचा लेग स्पिनर अबरार अहमद याची मूळ किंमत (Base Price) सुमारे 92.5 लाख रुपये इतकी होती. मात्र, त्याला संघात घेण्यासाठी 'सनरायझर्स लीड्स' आणि 'ट्रेंट रॉकेट्स' यांच्यामध्ये चुरशीची बोली लागली. अखेर सनरायझर्सने सुमारे 2.34 कोटी रुपयांना (£190,000) त्याला आपल्या संघात स्थान दिले. अबरार अहमद हा 'द हंड्रेड'मध्ये भारतीय मालकीच्या संघाकडून खेळणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. हा करार होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि सनरायझर्स लीड्सच्या अधिकृत 'X' (ट्विटर) अकाउंटवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. विशेष म्हणजे, या वादानंतर काही वेळातच या संघाचे अधिकृत 'X' अकाउंट सस्पेंड झाले, ज्यामुळे संभ्रम आणखी वाढला. अकाउंट सस्पेंड होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, भारतीय चाहत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळेच हे घडल्याचे बोलले जात आहे.
बीसीसीआयची भूमिका आणि प्रशिक्षक डॅनियल विटोरी यांचे स्पष्टीकरण
या वादावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सावध भूमिका घेतली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले की,"हा विषय बोर्डाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. ही एक विदेशी लीग असून, तिथे खेळाडूंच्या निवडीचा निर्णय त्या लीगचा आणि संबंधित संघांचा आहे, त्यामुळे बीसीसीआय यात काहीही करू शकत नाही." दुसरीकडे, वाढता वाद पाहून सनरायझर्स लीड्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. विटोरी यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांची पहिली पसंती इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद होता, मात्र त्याला 'साउदर्न ब्रेव्ह'ने विकत घेतले. त्यानंतर संघाने रिशाद हुसेन, उस्मान तारिक आणि अबरार अहमद या पर्यायांचा विचार केला. शेवटी संघाची रणनीती आणि मैदानाची गरज ओळखून अबरार अहमदची निवड करण्यात आली, कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता असून तो मधल्या षटकांमध्ये विकेट मिळवून देण्यास सक्षम आहे."
राजकारण विरूद्ध खेळ: क्रिकेट जगतात नवीन चर्चा
व्हिटोरी यांनी पुढे स्पष्ट केले की, खेळाडूंच्या निवडीपूर्वी संघ व्यवस्थापनामध्ये कोणत्याही राष्ट्रीयत्वावर चर्चा झाली नव्हती, तर केवळ खेळाडूच्या कामगिरीवर आधारित निर्णय घेण्यात आले. त्यांच्या हेडिंग्लेसारख्या खेळपट्टीवर अबरार अहमदची फिरकी फायदेशीर ठरू शकते".
तथापि, भारतीय चाहत्यांसाठी हा मुद्दा केवळ खेळापुरता मर्यादित नसून तो राष्ट्रवादाशी जोडला गेला आहे. भारताचे पाकिस्तानसोबतचे तणावपूर्ण संबंध पाहता, भारतीय मालकांनी पाकिस्तानी खेळाडूंना आर्थिक पाठबळ देऊ नये, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. 'द हंड्रेड' लिलावात उस्मान तारिक याच्यानंतर अबरार हा विकला जाणारा दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. आता हा वाद येणाऱ्या काळात शमतो की अधिक उग्र रूप धारण करतो, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडीमुळे काव्या मारन आणि त्यांच्या सन ग्रुपपुढील पेच अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











