Maharashtra Weather : येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासाठी हे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अरबी समुद्रात कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसून, गुजरात ते मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता आता कमी झाली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त ढग आतल्या बाजूला म्हणजेच राज्याच्या दिशेने सरकत असल्याने महाराष्ट्रात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. याच प्रणालीचा परिणाम म्हणून ओडिशामध्येही अतिमुसळधार पावसाचा 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
चार आठवड्यांत दिसणार मोठे बदल
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 10 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या चार आठवड्यांच्या काळात हवामानात मोठे बदल दिसतील. पहिल्या आठवड्यात मध्य भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून देशाच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण अचानक लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सध्याचा महिना हा मान्सूनच्या परतीचा महिना असल्याने, हा परतीचा पाऊस सुरू झाल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत.
हे ही वाचा : समजून घ्या : रोहित पवार यांना काँग्रेसचा काय सल्ला? म्हणून राष्ट्रवादीसमोर अट?
पाणीटंचाईची तूट भरुन निघेल का?
हा परतीचा पाऊस असण्याची शक्यता राज्याची चिंता वाढवणारी ठरली आहे. 'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा संपूर्ण पावसाळ्यात राज्यात सुरुवातीपासूनच पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अपेक्षित सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारणपणे परतीच्या पावसाने ही तूट काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होते; मात्र सद्यस्थितीत पावसाचा जोर आणि पुढील आठवड्यापासून पाऊस कमी होण्याचा अंदाज पाहता, ही पाणीटंचाईची तूट पूर्णपणे भरून निघेल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा : पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी निघाली, वाटेत तरुणीच्या मानेवर मित्राकडून ब्लेडने वार
'या' ठिकाणी येलो अलर्ट
पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांना मध्यम ते मुसळधार पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. शनिवारी पावसाची व्याप्ती वाढणार असून, मोजके जिल्हे वगळता वाशिम, यवतमाळ, अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिकसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर रविवारी नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












