गणेश जाधव, धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी येथील MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खासापुरी गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
कर्ज आणि शेतीच्या नुकसानीचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश देशमुख पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या डोक्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतातील सोयाबीन पीक जळून गेल्याने तो आर्थिक अडचणीत होता, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे.
हे ही वाचा>> अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला अन् आज 'या' महानगरपालिकेत तुफान राडा
प्रथमेशच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. प्रथमेशला पाच बहिणी असून, कुटुंबाची जबाबदारीही त्याच्यावर होती. त्यामुळे शिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि आर्थिक परिस्थिती याचा ताण त्याच्या आयुष्यात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
MPSC ची तयारी करताना दोन प्रयत्न
प्रथमेशने MPSC परीक्षेसाठी यापूर्वी दोन वेळा प्रयत्न केले होते. मात्र, स्पर्धा परीक्षांमधील अनिश्चितता, आर्थिक अडचणी आणि शेतीचे नुकसान यामुळे तो मानसिक तणावाखाली असावा, असा दावा नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केला आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दोन दिवसांपूर्वी गावाहून पुण्यात परतला
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा पुण्यात गेला. पुण्यात गेल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रथमेशच्या मृत्यूमुळे खासापुरी गावातही शोक व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा>> MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं? पुण्यातील मोर्चाची स्टोरी
नारायण पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पुण्यातील नारायण पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या नोटमध्ये नेमके काय नमूद आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, प्रथमेशच्या मृत्यूमागील नेमकी कारणे, कर्जबाजारीपणाची स्थिती आणि इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
आज सायंकाळी अंत्यसंस्कार
प्रथमेश देशमुखच्या पार्थिवावर आज सायंकाळी खासापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT












