अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला अन् आज 'या' महानगरपालिकेत तुफान राजकीय राडा
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढल्याच्या प्रकरणाचे पडसाद KDMC महासभेत उमटले. भाजपने महासभा तहकूब करण्याची मागणी केली, तर मनसे-काँग्रेसने संताप व्यक्त करत सत्तासमीकरणावरून जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT

कल्याण: मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. या प्रकाराचा निषेध करत भाजप नगरसेवक आक्रमक झाले आणि महासभा तहकूब करण्याची मागणी केली. भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांच्या मागणीनंतर महापौर हर्षाली चौधरी-थवील यांनी महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब केली. मात्र, महासभा तहकूब होताच काँग्रेसने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला.
काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी जनतेचे विकासाचे प्रश्न राजकीय मुद्द्यांसाठी वेठीस धरू नका, असा इशारा भाजपला दिला तर मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यावेळी ते असंही म्हणाले की, 'आमच्यामुळे महापौर बसले आहेत. भाजप सत्तेत वाटा घ्यायला आले आहेत. त्यांनी आता निर्णय घ्यावा आणि सत्तेतून बाहेर पडावं. आम्ही सक्षम आहोत', असा टोला लगावला.
हे ही वाचा>> फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्तासमीकरणावरून मनसे आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. त्यात अमित ठाकरे यांच्या मोदी फोटोप्रकरणावरून भाजप नगरसेवकांनी महासभेत या घटनेचा निषेध केला. भाजप गटनेते यांनी संपूर्ण दिवसासाठी महासभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन दिल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर महापौर हर्षाली चौधरी-थवील यांनी महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब करण्याची घोषणा केली. मात्र मनसेघटनेचा प्रल्हाद म्हात्रे हे बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा महापौरांनी त्यांना बसण्यास सांगितले.
महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब झाल्याने आजच्या कामकाजातील विविध विकासकामे, प्रस्ताव आणि महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आता पुढील महासभा कधी घेण्यात येणार आणि प्रलंबित विकासकामांवर चर्चा कधी होणार, याकडे कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
