मुरबाडः मनसे नेते राजू पाटील यांच्या मुरबाड येथील फार्महाऊसवर बिबट्या आणि त्यांच्या ‘रॉकी’ नावाच्या कुत्र्यामध्ये थरारक झुंज झाल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास बिबट्याने कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारत रॉकीवर पाठीमागून हल्ला केला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याला न घाबरता रॉकीने प्रतिकार करत बिबट्याच्या गालाला आणि हनुवटीला जोरदार चावा घेतला. अखेर रॉकीच्या तावडीतून सुटका करून घेत बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
ADVERTISEMENT
राजू पाटील यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती देताना रॉकीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रॉकी स्वभावाने घरातील सर्वांचा लाडका असून संकटाच्या वेळी मात्र तो अत्यंत धाडसीपणे सामना करतो. यापूर्वीही रॉकीने अनेक विषारी सापांचा सामना केल्याचे त्यांनी सांगितले. एका प्रसंगी विषारी सापाने चावा घेतल्यानंतर रॉकीची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र, उपचारानंतर तो बचावला.
दरम्यान, काल संध्याकाळी सुमारे ७.१५ वाजता रॉकी कंपाऊंड परिसरात असताना बिबट्याने जाळीवरून उडी मारत त्याच्यावर अचानक हल्ला केला. बेसावध असलेल्या रॉकीने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याला प्रतिकार केला. रॉकीने बिबट्याच्या डाव्या गालाला आणि हनुवटीला चावा घेतल्याने बिबट्याची सुटका करण्यासाठी धडपड सुरू झाली. अखेर रॉकीने पकड सैल करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.
या झटापटीत रॉकीच्या अंगावर बिबट्याच्या नखांमुळे जखमा झाल्या. मात्र, जखमी अवस्थेतही रॉकीने बिबट्या कुठे गेला, याकडे लक्ष ठेवत ठामपणे उभा राहिल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. घटनेनंतर फार्महाऊसवरील CCTV फुटेज तपासण्यात आले, त्यावेळी संपूर्ण थरारक घटना समोर आली. त्यानंतर रात्रीच डॉक्टरांना बोलावून रॉकीवर प्रथमोपचार करण्यात आले. सध्या रॉकी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मुरबाड वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्याचेही राजू पाटील यांनी सांगितले.
या घटनेच्या निमित्ताने राजू पाटील यांनी मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. मुरबाडसह राज्यातील विविध भागांमध्ये सातत्याने मानव आणि वन्यजीवांमध्ये संघर्षाच्या घटना घडत आहेत. जंगलतोड आणि विकासाच्या नावाखाली वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने अन्न आणि पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्त्यांकडे येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज रॉकीने बिबट्याला पळवून लावलं मात्र उद्या याच ठिकाणी एखादा निष्पाप माणूस, महिला किंवा लहान मूल असू शकतं. मग याला जबाबदार कोण? असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे एकीकडे ‘रॉकी’च्या धाडसाची चर्चा होत असतानाच दुसरीकडे मुरबाड परिसरातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT












