जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची दिशा अधिक आक्रमक करण्याचे संकेत मनोज जरांगे यांनी दिले आहेत. मराठा महिलांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांना हळद-कुंकू लावत आरक्षणाची मागणी करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
जरांगे यांनी यावेळी हळदी-कुंकवाच्या माध्यमातून आरक्षणाचा मुद्दा सरकारच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन महिलांना केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने महिलांकडून दिलेले हळदी-कुंकू स्वीकारले आणि त्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला नाही, तर त्यांची मोठी बदनामी होईल, असा दावा त्यांनी केला.
‘आरक्षण दिलं नाही तर इज्जतीचा कचरा होईल’
जरांगे म्हणाले की, ‘मराठा महिलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला कुंकू लावून आरक्षणाची मागणी केली आणि त्यानंतरही आरक्षण दिले गेले नाही, तर त्यांच्या इज्जतीचा कचरा होईल. हळदी-कुंकू स्वीकारूनही आरक्षण न दिल्यास त्यांना आयुष्यात वर मान करून चालता येणार नाही’, अशी तीव्र भाषा त्यांनी वापरली.
‘हिंदू संस्कृतीची जाण असेल तर दाराबाहेर येतील’
‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला हिंदू संस्कृतीची जाण असेल, तर त्या मराठा महिलांना भेटण्यासाठी घराबाहेर येतील’, असेही जरांगे यांनी म्हटले. महिलांनी दिलेले हळदी-कुंकू स्वीकारणे हा या आंदोलनातील महत्त्वाचा भाग असेल, असा संदेश त्यांनी दिला.
‘हळदी-कुंकू स्वीकारलं तर आरक्षण द्यावं लागेल’
‘जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने मराठा महिलांकडून हळदी-कुंकू स्वीकारले, तर त्यानंतर आरक्षण द्यावे लागेल’, असा दावा जरांगे यांनी केला. त्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने मुंबईत जाऊन ही मागणी मांडावी, असे त्यांनी आवाहन केले.
‘गिनिज बुकमध्ये नोंद होऊ शकते’
‘हळदी-कुंकूसाठी कोट्यवधी महिला मुख्यमंत्र्यांच्या दारात आल्या, तर त्याची गिनिज बुकमध्ये नोंद होऊ शकते, असेही जरांगे म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने हळदी-कुंकू स्वीकारले तरी नोंद होईल आणि स्वीकारले नाही तरी नोंद होईल’, असा दावा त्यांनी केला.
‘आल्या नाहीत तर डाग लागून जाईल’
‘मराठा महिलांनी हळदी-कुंकू देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या स्वीकारण्यासाठी बाहेर आल्या नाहीत, तर त्यांच्या प्रतिमेला डाग लागेल’, असेही जरांगे यांनी म्हटले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांनी पुढे यावे आणि मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर हळदी-कुंकूच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी मांडावी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महिलांच्या सहभागाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT












