Maratha Protest Dharashiv : धाराशिवच्या उमरगा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत मराठा समाजाने उमरगा तहसील कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली. आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्ते अण्णासाहेब पवार यांनी तहसीलदारांची खुर्ची जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ADVERTISEMENT
सरकार ठोस निर्णय का घेत नाही?
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यावरून मराठा समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. "माझा योद्धा तिथे मरणाच्या दारात आहे आणि सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे," असा संतप्त आरोप करत आंदोलकांनी "एक मराठा लाख मराठा" आणि "मनोज जरांगे पाटील आगे बढो" अशा जोरदार घोषणा दिल्या. तसेच तीन-चार वर्षांपासून आरक्षणाचा लढा सुरू असतानाही सरकार ठोस निर्णय का घेत नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?
तहसीलदारांची खुर्ची जाळली
आंदोलकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर आगामी काळात याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल. "तहसीलदारांची खुर्ची जाळल्याप्रकरणी प्रशासनाला आम्हाला फाशी द्यायची असेल किंवा गोळ्या घालायच्या असतील तरी द्या, आम्ही मागे हटणार नाही," अशी आक्रमक भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली. यासोबतच महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाने रस्त्यावर उतरून या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
हे ही वाचा : DJचा घराखाली दणदणाट, वडिलांचा मृत्यू, मुलीने कॅमेऱ्यासमोर हंबरडा फोडला
प्रशासनाची तारांबळ
तहसील कार्यालयाच्या आवारात खुर्ची पेटवून दिलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले. आतापर्यंत महामार्ग आणि रस्त्यांवर होणारे मराठा आंदोलन आता थेट प्रशासकीय कार्यालयांच्या आवारात पोहोचल्याने राज्यभरात चिंता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT












