कल्याण: मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. या प्रकाराचा निषेध करत भाजप नगरसेवक आक्रमक झाले आणि महासभा तहकूब करण्याची मागणी केली. भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांच्या मागणीनंतर महापौर हर्षाली चौधरी-थवील यांनी महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब केली. मात्र, महासभा तहकूब होताच काँग्रेसने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला.
ADVERTISEMENT
काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी जनतेचे विकासाचे प्रश्न राजकीय मुद्द्यांसाठी वेठीस धरू नका, असा इशारा भाजपला दिला तर मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यावेळी ते असंही म्हणाले की, 'आमच्यामुळे महापौर बसले आहेत. भाजप सत्तेत वाटा घ्यायला आले आहेत. त्यांनी आता निर्णय घ्यावा आणि सत्तेतून बाहेर पडावं. आम्ही सक्षम आहोत', असा टोला लगावला.
हे ही वाचा>> फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्तासमीकरणावरून मनसे आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. त्यात अमित ठाकरे यांच्या मोदी फोटोप्रकरणावरून भाजप नगरसेवकांनी महासभेत या घटनेचा निषेध केला. भाजप गटनेते यांनी संपूर्ण दिवसासाठी महासभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन दिल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर महापौर हर्षाली चौधरी-थवील यांनी महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब करण्याची घोषणा केली. मात्र मनसेघटनेचा प्रल्हाद म्हात्रे हे बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा महापौरांनी त्यांना बसण्यास सांगितले.
महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब झाल्याने आजच्या कामकाजातील विविध विकासकामे, प्रस्ताव आणि महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आता पुढील महासभा कधी घेण्यात येणार आणि प्रलंबित विकासकामांवर चर्चा कधी होणार, याकडे कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
मनसे गटनेते संतापले
''भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तरी मनसेला त्याचा कोणताही फरक पडणार नाही, आमच्यामुळे महापौर बसले आहेत. भाजप सत्तेत वाटा घ्यायला आले आहेत. त्यांनी आता निर्णय घ्यावा आणि सत्तेतून बाहेर पडावं. आम्ही सक्षम आहोत,” असा टोला त्यांनी लगावला. भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली तरी मनसेला त्याची चिंता नसल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा>> फ्लाईंग किस, अश्लील हावभाव, दहीहंडीचा उत्सव या थराला का गेला? अविनाश जाधव EXCLUSIVE
दरम्यान, सत्तेत सहभागी होण्याच्या भाजपच्या भूमिकेवरही प्रल्हाद म्हात्रे यांनी बोचरी टीका केली. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार, याकडे कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जनतेचे प्रश्न मांडण्याची संधीच दिली नाही - काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी
महासभा तहकूब झाल्यानंतर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या विषयाला काँग्रेसचा विरोध नव्हता, मात्र विषय मांडल्यानंतर आपल्याला भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला.
कल्याण-डोंबिवलीतील नागरिक महिनाभर महासभेची वाट पाहत असतात. त्यामुळे महासभा सुरू ठेवून जनतेचे विकासाचे प्रश्न मांडणे गरजेचे होते. केवळ राजकीय मुद्द्यासाठी महासभा तहकूब करून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित ठेवणे योग्य नाही, अशी भूमिका कुलकर्णी यांनी मांडली. दोन-तीन दिवसांत पुन्हा महासभा घेण्यात यावी, अन्यथा जनतेच्या प्रश्नांसाठी पालिका मुख्यालयाजवळ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
'मोदींच्या फोटोसाठी एवढा विरोध असेल तर पदाचा त्याग करा'
कांचन कुलकर्णी यांनी भाजपवर टीका करताना, मोदींच्या फोटोसाठी एवढा विरोध करायचा असेल तर पदाचा त्याग करा, जनतेच्या प्रश्नांचा नाही, असा टोला लगावला. भाजप आणि शिवसेनेचा राजकीय ड्रामा सुरू असल्याचा आरोप करत सत्तेचा फायदा घ्यायचा आणि दुसरीकडे विरोध करायचा, अशी टीकाही त्यांनी केली.
ADVERTISEMENT












