डोंबिवली: डोंबिवलीतील मनसे कार्यालयात भाजपमधून पुन्हा मनसेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी मोठे राजकीय विधान केले आहे. "पुढच्या अडीच वर्षांत मी आमदार होणार, 100 टक्के" असा ठाम दावा करत त्यांनी कल्याण ग्रामीणमधील SIR मतदार यादी, EVM, निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील तब्बल दोन लाख 55 हजार मतदारांची नावे वगळल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणत्याही वादात न पडण्याची भूमिका मनसेने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील मनसे कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना मनसे नेते राजू पाटील यांनी आगामी राजकारणाबाबत मोठा दावा केला. पुढील अडीच वर्षांत आपण पुन्हा आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र SIR प्रक्रियेनंतर सुमारे दोन लाख 55 हजार मतदारांची नावे यादीतून कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये मृत, स्थलांतरित आणि ठावठिकाणा नसलेल्या मतदारांची नावे असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
यावेळी त्यांनी EVM, निवडणूक आयोग आणि भाजपवरही टीकेची झोड उठवली. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत भाजप हिंदुत्व आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही वादात किंवा भांडणात न पडण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे सांगत, विरोधकांकडून मनसेला जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राजू पाटील यांनी केला.
डोंबिवलीत भाजपला मनसेचा मोठा धक्का
दुसरीकडे डोंबिवलीत मात्र भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या महिला कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली असून त्यांच्यासोबत भाजपच्या शेकडो महिलांनीही मनसेत प्रवेश केला. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रभागात आणि त्यांच्या राहत्या घराशेजारीच असलेल्या मनसे नेते राजू पाटील यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी राजू पाटील यांनी "घाबरण्याची गरज नाही, आपण रवींद्र चव्हाण यांच्या घराशेजारीच पक्षप्रवेश करत आहोत" असे म्हणत भाजपला टोले लगावले.
डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात मनसेच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विधानसभा निवडणुकीत मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या काही महिला कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली. त्यांच्यासोबत भाजपच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला यावेळी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी घरवापसी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. "काही लोक घरातून बाहेर गेले होते. निवडणुका हा राजकारणातील उत्सव असतो. त्यात छोटे-मोठे वाद होतात, काही वेळा कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला जात नाही आणि नाराजीतून लोक पक्ष सोडतात. मात्र पैशासाठी गेलेल्यांना मनसेत प्रवेश नाही. जे भावनेतून आणि नाराजीतून गेले होते, त्यांचे आम्ही मोठ्या मनाने स्वागत करतो,"
"काही जणांना धमक्या दिल्या जात असल्याचे माझ्या कानावर आले. पण घाबरण्याची गरज नाही. आपण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या घराच्या शेजारीच हा पक्षप्रवेश करत आहोत. मग घाबरण्याचे कारणच काय? हा लोकशाहीतील मतांचा विषय आहे. तुम्हाला एखादा पक्ष आवडला नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात येत आहात," भाजपमधून आलेल्या महिलांचा आणि इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. त्यांना पक्षात योग्य जबाबदाऱ्या दिल्या जातील. भाजपमध्ये ज्या पद्धतीने महिलांना संघटनात्मक कामाची सवय आहे, त्याच पद्धतीने मनसेतही त्यांना संधी दिली जाईल. असे सांगितले.
दरम्यान, पक्षप्रवेश सुरू असताना फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर राजू पाटील यांनी मिश्किलपणे, "अरे, हे फटाके रवींद्र चव्हाण यांनी वाजवले का?" अशी टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि राजकीय टोलेबाजीची चर्चा रंगली.
ADVERTISEMENT












