Rupali Thombre Patil on Vidyanand Bapat : पुण्यातील गणेशोत्सव डीजेमुक्त आणि ध्वनीप्रदूषण न करता साजरा करावा, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी भूमिका जागरूक नागरिक विद्यानंद बापट यांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवरून आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बापट यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये बापट यांच्या पुणेकर असण्यावरच प्रश्न उपस्थित करत, पुण्यातील गणेशोत्सवाबाबत पुणेकरांना शिकवू नये, अशी भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला थेट दिली सत्ता सोडण्याची धमकी.. 'ते' नेमकं प्रकरण काय?
"पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये"
रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “अरे देवा बापट नावाने पुणेकर म्हणून गंडावले की. सध्या गाजत असलेले विद्यानंद बापट हे पुणेकर नाहीत म्हणून गणपती बाप्पा उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली. पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं!” तसेच रत्नागिरीहून सात वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीसाठी आलेल्या व्यक्तीने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. “आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान - पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार,” अशी भूमिका त्यांनी पोस्टमधून मांडली.
हेही वाचा : Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?
वर्गणीसाठी कार्यकर्ते उन्हात फिरले- रुपाली ठोंबरे
ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुण्यातील गणेशोत्सवाच्या परंपरेचाही उल्लेख केला आहे. नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, श्रीमंत थोरले आणि बाजीराव रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करत कार्यकर्ते लहानाचे मोठे झाले. पेठेत घराघरांतून आणि दुकानातून वर्गणी काढून गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्याची 130 वर्षांची परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं. “इथे ढोलाच्या थापेवर कार्यकर्त्यांचे बालपण गेलंय, गणपतीच्या वर्गणीसाठी कार्यकर्ते उन्हात फिरले,” असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच पुण्यात राहायचं असेल तर पुण्याची संस्कृती समजून घ्यावी लागेल, तिला विरोध करून प्रसिद्धी मिळवता येणार नाही, असं म्हणत त्यांनी बापटांवर टीका केली आहे.
नेटकऱ्यांकडून ठोंबरेंच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
या पोस्टनंतर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “अजित पवार असते तर विद्यानंद बापटांना पाठिंबा दिला असता,” अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या नेटकऱ्याने पुण्याच्या संस्कृतीबद्दल किंवा गणपती उत्सव साजरा करण्याबद्दल बापट बोलत नसून त्यांचा मुद्दा DJ, डॉल्बी आणि आवाजाचा असल्याचं म्हटलं आहे. तसेच लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला आणि ते स्वतः पुण्यातील नव्हते, तेही रत्नागिरीतून आले होते, असंही नेटकऱ्यांनी सांगितलं .
ADVERTISEMENT












