Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?

मुंबई तक

04 Sep 2026 (अपडेटेड: 04 Sep 2026, 08:52 AM)

Center Point : गणेशोत्सवातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचवेळी सोशल मीडिया क्रिएटर संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Center Point

Center Point

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?

Center Point : आजची गोष्ट सुरू होते एका नदीपासून. एका नदीला जबरदस्त पूर आलेला असतो. एक मच्छीमार नदीच्या काठावर बसून मासेमारी करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात त्याला नदीमध्ये एक नवीकोरी गोधडी वाहत जाताना दिसते. त्याच्यातला स्वार्थ जागा होतो आणि त्याला वाटतं की ही गोधडी आपल्याला मिळाली तर आपलं कामच होईल. मग तो वाहत्या पाण्यात उडी मारतो. गोधडी त्याच्या हाताला लागते, पण ती प्रचंड भिजलेली असते. त्यामुळे ती गोधडीच त्या मच्छीमाराला ओढत घेऊन जाऊ लागते. पाण्यामध्ये मच्छीमार ओरडायला लागतो, “अरे, ही गोधडी मला सोडत नाहीये! गोधडी मला सोडत नाहीये!” खरं तर मच्छीमार गोधडीला सोडत नसतो. ही गोष्ट माणसाच्या मानसिक गुलामगिरीची आणि दुःखाची आहे. जोपर्यंत तो ते सोडत नाही, तोपर्यंत ती गुलामगिरी आणि ते दुःखही त्याला सोडत नाही. तुम्ही म्हणाल की आजच्या विषयाचा आणि या गोष्टीचा काय संबंध? तर ते जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

विद्यानंद बापट तुम्हाला माहिती असतील. पुण्याचे विद्यानंद बापट सध्या खूप गाजत आहेत. सगळीकडे त्यांच्या मुलाखती होत आहेत. कारण काय आहे? तर त्यांनी डीजेला विरोध केलेला आहे. त्यांनी ढोल-ताशांच्या आवाजाला विरोध केलेला आहे. रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या मंडपांना विरोध केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव व्हावा, यासाठी त्यांचा आग्रह आहे. आता मुद्दा काय आहे? हे विद्यानंद बापट मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत आणि आता नारायण पेठेमध्ये राहतात. ते बीपीओमध्ये काम करतात. त्यांची उंची असेल पाच-साडेपाच फूट आणि वजन असेल 50-52 किलो. पण या माणसाची हिंमत बघा. या माणसाने अख्ख्या व्यवस्थेलाच आव्हान दिलंय. कुठल्या व्यवस्थेला? ज्या व्यवस्थेने आपल्या पूर्ण समाजमनाला हिंदुत्वाशी जोडलं, त्या व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिलं. म्हणजे केवढी मोठी हिंमत दाखवली! गणेशोत्सवाच्या आधी पालिकेने एक सभा बोलावली होती. त्यामध्ये गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मतं जाणून घेतली जात होती. त्यामध्ये हे महाशय उभे राहिले आणि विद्यानंद बापटांनी तिथे सडेतोडपणे पाच-सात मिनिटांचं भाषण केलं. ते म्हणाले की, या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा हेतू आपण विसरत चाललो आहोत. प्रचंड ध्वनी प्रदूषण होतं. मंडळं रस्त्यावर मंडप टाकतात. 60 ते 70 टक्के रस्ता मंडपामध्ये जातो. शहरात ट्रॅफिक जाम होतं. लहान मुलं, वृद्ध माणसं, कुत्री-मांजरींसारखे प्राणी या डीजेच्या भिंतींच्या आणि ढोल-ताशांच्या आवाजाने घाबरून जातात. त्याचा कानांवर परिणाम होतो. डीजे आणि अलीकडच्या काळातील सगळी वाद्यं ही एक प्रकारे आपला उत्सव चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट करतात, असं त्यांचं म्हणणं होतं.

पण मग विषय आला की ढोल-ताशे तर पारंपरिक वाद्य आहेत, मग त्याचं काय करायचं? तर त्याचंही त्यांच्याकडे उत्तर होतं. ते म्हणाले की, ढोल-ताशे कशासाठी वाजवले जायचे? पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी युद्ध व्हायचं, त्यावेळी योद्ध्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्यामध्ये उत्साह संचारावा म्हणून ते वाजवले जायचे. ते रणांगणातली वाद्यं आहेत. बंदिस्त शहरांमध्ये वाजवली जाणारी वाद्यं नाहीत. आता शहर चारही बाजूंनी सिमेंटच्या जंगलाने बंद झालं आहे. तिथे तुम्ही ती वाद्यं वाजवत आहात, त्यामुळे खूप त्रास होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ती तुम्ही हमरस्त्यावर वाजवता. कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये किंवा नदीपात्रामध्ये वाजवत नाही. त्यामुळे त्याचा लोकांच्या आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं की, गेल्या वर्षी सोलापूर शहरामध्ये डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा झाला आणि असं पुण्यामध्येही होणं शक्य आहे. मग प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये तीन-साडेतीन हजार गणेश मंडळं आहेत. त्यातली काही गणेश मंडळं रजिस्टर्ड आहेत, बाकीची अनरजिस्टर्ड आहेत. पण या गणेश मंडळांचं काय? ही गणेश मंडळं म्हणजे राजकीय पक्षांच्या छोट्या-मोठ्या शाखा आहेत. त्यांना सगळं फंडिंग असेल किंवा त्या मंडळांसाठी हे राजकीय पक्ष अशा काळामध्ये बरीच मदत करतात. मग ही मंडळं राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळामध्ये त्याची परतफेड करतात. तर हे असं सगळं गणित आहे.

त्यामुळे सत्ताधारी मंडळी आणि विरोधातली मंडळी सावध झाली. “अरे, गणेश मंडळांनाच जर विरोध होत असेल तर हे आपल्या अंगाशी येईल,” असं त्यांना वाटलं आणि मग ती आक्रमक झाली. तिथे लोक आक्रमक झाल्यानंतर बापटांना गप्प बसावं लागलं. बापटांना पोलिसांनी संरक्षण दिलं, पालिकेच्या सभागृहातून बाहेर काढलं. त्यानंतर बापटांच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्यात आली. पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे तर असं म्हणाले की, “या बापटांना कोण काळं कुत्रं विचारत नाही, गल्लीतलं काय त्यांचं ऐकायचं?” अर्थात मला काय कल्पना नाही; पण निवडणुकीत मतं मागताना कदाचित त्याची तपासणी आधी धीरज घाटे करत असतील की गल्लीतलं कुत्रं कोणाला विचारतं. त्याच लोकांची मतं मागावीत, ज्यांना गल्लीतलं कुत्रं विचारतं. ज्यांना गल्लीतलं कुत्रं विचारत नाही, त्यांची मतं मागू नयेत, असं काही क्रायटेरिया त्यांच्या तपासणीमध्ये आहे का, माहीत नाही.

पण मग हे मंडळवाले त्यांच्या अंगावर आले. जवळपास बापटांना जबरदस्त विरोध होऊ लागला. पुण्यामध्ये त्यांच्या मुलाखती रोज सुरू होत्या. त्यामधले विषय वेगवेगळे होते. द्वैत-अद्वैत, आपलं हिंदुत्व, पुराणकाळातील वेद आणि बाकी अनेक गोष्टींवर ते भाष्य करत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्वतः पुण्याच्या कार्यकारिणीमध्ये या विषयाचा उल्लेख करावा लागला. ते म्हणाले की, पुण्यातले लोक पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करतील, असा मला विश्वास आहे. म्हणजे एका पद्धतीने डीजे या प्रकाराला मुख्यमंत्र्यांनाही जाहीरपणे विरोध करावा लागला.

आता याचा परिणाम काय झाला? तर परिणाम असा झाला की, आज सकाळी ते बापट टिळक रोडवर एका वाहिनीला मुलाखत देत होते. तेवढ्यात एक व्यक्ती आला आणि त्याने थेट बापटांना मारहाण करायला सुरुवात केली. बापटांना मारहाण सुरू झाल्यानंतर तिथल्या कॅमेरामनने आणि बाकीच्या लोकांनी त्याला अडवलं, दूर केलं आणि बापटांना सुरक्षित ठिकाणी नेलं. तेवढ्यात पोलीस आले. पोलिसांनी बापटांना सोबत घेतलं आणि त्यांना सुरक्षित केलं. हा मारणारा माणूस कोण आहे? तर त्याचं नाव संतोष चव्हाण आहे. तो पुण्यातल्या कोथरूडमधील राऊतवाडीचा रहिवासी असल्याचं कळालेलं आहे आणि प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष आहे. म्हणजे हा गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे.

बापटांची भूमिका कळाल्यानंतर त्याला काय वाटलं? तर त्याला असं वाटलं की आपण यांना मारलं पाहिजे. म्हणजे बापटांचं एक स्वतंत्र मत आहे. ते चुकीचं आहे की बरोबर आहे, याची वेगळी चर्चा होऊ शकते. गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याची वेगळी चर्चा होऊ शकते. पण त्याची चर्चा करायला हा कार्यकर्ता तयार नाही. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतो. म्हणजे तो किती महान काम करतो, शिकलेला आहे की नाही, हेही आपल्याला कळतंय. आता त्याने मारहाण केली, हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याचे व्हिडिओ समोर यायला लागले की, त्याने याआधीही व्हिडिओ केले होते. त्यामध्ये गणेश मंडळाच्या पाठीशी कोणी उभं राहत नाही, वगैरे मुद्दे मांडले होते.

मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की, एखाद्याला स्वतंत्र मत मांडण्याचा अधिकार आहे किंवा नाही? जर सत्ताधारी पक्ष असेल, गणेश मंडळं असतील किंवा एखाद्या समोरच्या व्यवस्थेला एखादं मत आवडत नसेल, तर ते मतच मांडायचं नाही का? लोकशाहीमध्ये ‘फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन’मध्ये आपल्याला हा दिलेला अधिकार आहे. तो अधिकार आपण बजावायचा नाही का? का? तर ही दहशत, ही झुंडशाही, ही मनोवृत्ती समोरच्याचं काहीतरी मत आहे आणि त्याचा आदर करणं हे त्यांच्या स्वभावातच नाहीये. मला असं वाटतं की हा सर्वात मोठा धोका आहे.

विद्यानंद बापटही काही कच्चे नाहीत. त्यांना प्रतिक्रिया विचारली की, “बाबा, तुम्हाला मारहाण झाली. मग तुमचं काय मत आहे?” तर ते म्हणाले की, “पोलीस नव्हते, असं बघून त्या चव्हाणने हल्ला केलेला आहे. प्रसिद्धीसाठी त्याने हल्ला केलेला आहे. या सगळ्याचं व्हिडिओ फुटेज आहे. पोलिसांनी ते बघावं आणि कारवाई करावी.” ते म्हणतात की, “अशा व्यक्तींना पोलीस चौकीत नेऊन त्यांचा समाचार घ्या. मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं नसतं, हे त्याशिवाय त्यांना कळणार नाही.”

दुसरी गोष्ट अशी आहे की, अशा मनोवृत्तीच्या लोकांशी युक्तिवाद तरी कसा करणार? कारण हे झोंबी मानसिकतेचे लोक आहेत. झोंबी मानसिकतेचे लोक म्हणजे कुठल्याही पद्धतीने चर्चेवर किंवा संवादावर विश्वास नसलेली लोकं. अशी लोकं एककल्ली असतात. तर अशा लोकांशी कशी चर्चा करायची, हा पण एक प्रश्न आहे. बाकी ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि रहदारीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने उत्सव साजरा करा. आमचा काही विरोधच नाहीये. फेर, इनफ भूमिका अशी आहे की, बाबा, अशा पद्धतीने उत्सव साजरा करायला कोणाचा विरोध असू शकतो? कोणाचा असू शकत नाही.

पण प्रश्न असा आहे की, सवंग प्रसिद्धीसाठी अशा व्यक्तीने हल्ला केलेला आहे, असं बापटांचं मत आहे. आता हे झालं एक बापट. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की, जर तुमचं मत त्या समूहाला आवडलं नाही, त्या पक्षाला आवडलं नाही किंवा त्या संघटनांना, त्या संस्थांना आवडलं नाही, तर ते तुम्हाला सायलेंस करू शकतात. ते तुमच्यावर हल्ला करू शकतात, जीव घेण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला गप्प बसवण्यासाठी ते हरतऱ्हेचे दहशतीचे मार्ग अवलंबू शकतात.

विद्यानंद बापट एकटे आहेत का? नाही. अजून एक उदाहरण बघा, मग तुम्हाला लक्षात येईल. संतोष पंडित हे महाशय तर फार फेमस आहेत. ते युट्यूबर आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, विरोधकांना अडचणीत आणणारे व्हिडिओ करत असतात. दहा लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत या माणसाचे. यूट्यूबवरती जवळपास 1.39 मिलियन सबस्क्रायबर आहेत. जनरली जनतेसाठी असलेले नियम-कायदे लोकप्रतिनिधी कसे पाळत नाहीत, ते कसे पायदळी तुडवतात, सेलिब्रिटी लोक त्याला कसा फाटा देतात, अशा पद्धतीचे ते व्हिडिओ करत असतात. त्याशिवाय दर्जाहीन विकासकामं, रस्त्यांची दुरवस्था आणि शहरांची झालेली अवस्था यावरतीही ते बोलत असतात.

आता प्रश्न असा आहे की, या महाशयांना काल रात्री साडेबारा-एक वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचं कारण काय सांगितलं? तर तुम्ही बदनामी केली, तुम्ही अश्लील कमेंट्स केल्या, चंद्रकांत दादा पाटील आणि आणखी एका भाजपच्या नगरसेविकेबद्दल चुकीची वक्तव्यं केली. आता प्रश्न असा आहे की, मी फक्त क्रोनोलॉजी सांगणार आहे. बाकीचं जे आहे ते तुम्ही ठरवायचं, प्रेक्षकांनी ठरवायचं की यातलं सत्य काय आहे.

या वादाची सुरुवात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाली. त्याचं कारण होतं की एरंडवणे भागामध्ये संतोष पंडितांनी एक व्हिडिओ केलेला होता. तिथे चंद्रकांत दादा पाटील आमदार आहेत. त्यांच्या निधीतून एक ओपन जिम उभारण्यात आलेली होती. त्या ओपन जिमच्या ठिकाणी जो बोर्ड लावण्यात आला होता, त्यावर असं लिहिण्यात आलं होतं की या विकासकामाच्या खर्चासाठी चार कोटी २१ लाख रुपये खर्च झालेले आहेत. आता ओपन जिमव्यतिरिक्तसुद्धा काही कामं झालेली आहेत का, माहीत नाही. त्यावरतीही खर्च झालेला असू शकतो.

पण मग चंद्रकांत दादांनी जशी जिम उभारली आहे, तशीच आणखी कुठल्या आमदार-खासदारांनी उभारली आहे का, हे चेक करणं पंडितांनी सुरू केलं. मग त्यांना भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी उभी केलेली जिम सापडली. संतोष पंडितांनी केलेल्या दाव्यानुसार, सेम क्वालिटीची, चंद्रकांत दादांनी उभी केलेल्या जिमसारखीच जिम 2023-24 मध्ये भीमराव तापकीरांनी अवघ्या चार लाखांत उभी केली. प्रश्न तर उपस्थित होणारच.

शिवाजीनगरमध्ये भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्याच जिमसाठी एका वर्षानंतर, म्हणजे 2024-25 या वर्षासाठी दहा लाख रुपये खर्च केले. प्रश्न असा आहे की, अचानकपणे तशाच पद्धतीची, त्याच क्वालिटीची जिम एका वर्षामध्ये दुप्पटपेक्षा जास्त खर्चात कशी काय होऊ शकते? आणि त्याच जिमसाठी चंद्रकांत दादांनी बोर्डवर लिहिलेला खरा खर्च किती आहे, हे माहीत नाही. पण चार कोटी 21 लाख रुपये कसे खर्च होऊ शकतात, हा प्रश्न आहे.

आता हे सगळे व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाची पळापळ झाली आणि मग त्यांनी जाहीर केलं की या जिमची किंमत चार कोटी वगैरे नाही. या जिमची किंमत 9 लाख 8 हजार रुपये इतकी आहे.

आता हे सगळं करताना संतोष पंडितांनी दोन-तीन चुका केल्या. काय चुका केल्या? ओपन जिमबद्दल त्यांनी चंद्रकांत दादांना प्रश्न विचारले होते. उत्तर द्यायला पहिल्यांदा समोर आल्या होत्या त्या भाजपच्या नगरसेविका मिताली सावळेकर. मग एका व्हिडिओमध्ये संतोष पंडितांनी मिताली सावळेकरांचा उल्लेख ‘टट्टू’ म्हणून केला. अर्थात, तसाच उल्लेख तुम्हाला आठवत असेल तर मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेमध्ये केला होता ‘भाड्याचे टट्टू’. त्यानंतर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी सुधारित म्हणून संस्कृतमधला शब्द वापरला. दुसऱ्या वेळेला भाषण करताना ‘भाटक गर्दभ’ असा शब्द त्यांनी वापरला होता. असो. मिताली सावळेकरांना ‘टट्टू’ म्हटल्यामुळे संतोष पंडितांबद्दल आधीपासून रोष होता. अर्थात त्यांनी महिलांचा सन्मान करायला हवा. महिला नगरसेविकांबद्दल बोलताना थोडं सांभाळून बोलायला हवं, याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही.

आता हे झालं पहिल्या आठवड्यात. मग आला 11 ऑगस्ट. क्रोनोलॉजीदेखील पाहू, म्हणजे आपल्याला समजेल. 11 ऑगस्टला पुन्हा त्यांनी चंद्रकांत दादांवर टीका करणारा एक व्हिडिओ केला. विषय तोच ओपन जिमचा. पण यावेळी अश्लील हातवारे केल्याचा आरोप आहे. आता प्रश्न असा आहे की, हे करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही ज्यावेळेला कुठलीही बाब मांडता, त्यावेळेला तुमच्या शब्दांमधून किंवा तुमच्या देहबोलीतून कुठल्याही पद्धतीने चुकीचा मेसेज जाऊ नये, याची काळजी घ्यायला पाहिजे.

मग आणखी दोन दिवस गेले. 11 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आधी रस्त्याची डागडुजी सुरू होती आणि डांबरीकरण चालू होतं. रस्ते चकाचक करण्याची घाई चालू होती. संतोष पंडितांनी एक व्हिडिओ केला. तिथे ते म्हणाले की, “बघा, काल-परवापर्यंत सरकार सांगत होतं की युद्ध चालू आहे. रशिया-युक्रेनमध्ये, तिकडे इराणमध्ये आणि आणखी काही देशांमध्ये. मग अशा पद्धतीने तिकडे डांबर उपलब्ध नाही आणि म्हणून आपल्या रस्त्याची डागडुजी थांबली आहे,” अशा पद्धतीचा प्रचार किंवा स्पष्टीकरण सरकारने दिलं होतं. मग मुख्यमंत्री येण्याआधीच कसं काय डांबर तुम्हाला मिळालं, असा प्रश्न त्यांनी विचारला.

आता प्रश्न असा आहे की, प्रश्न व्हॅलिड होता. पण त्यामध्ये केलेला जो अविर्भाव किंवा हातवारे आहेत, ते जरा आक्षेपार्ह होते, असं तक्रारदारांचं म्हणणं आहे. प्रश्न असा आहे की, आज राज्यात असा एकही रस्ता नाही की ज्याच्यावर खड्डे नाहीयत. खरं तर खड्ड्यातच कुठे-कुठे रस्ते आहेत, अशी बऱ्याच ठिकाणची अवस्था आहे. आणि तुम्हाला त्याची कल्पना आहे, कारण तुम्ही रोज रस्त्यांवरून चालत असता. प्रत्येकाने आपला अनुभव स्वतःशी चेक करून बघावा.

आता प्रश्न असा आहे की, हे सगळं झालं. त्याला झाले १५ दिवस. १५ दिवस ना कोणी तक्रार केली, ना कोणी संतोष पंडितांना जाब विचारला, ना कोणी पोलिसांकडे गेलं. काहीच झालं नाही. 15 दिवसांनंतर मग आला 31 ऑगस्ट. 31 ऑगस्टला काय झालं? राज्याची भाजपची कार्यकारिणी पुण्यामध्ये होती. मग टिळक रोडवरून, पुण्यातल्या रस्त्यांवरून गोपीचंद पडळकर यांच्या गाड्यांचा ताफा निघालेला होता. पांढऱ्या रंगाच्या शुभ्र गाड्या, त्यामध्ये बसलेले गोपीचंद पडळकर, मागे त्यांचे सहकारी, बॉडीगार्ड आणि नंबर प्लेट मराठीमधून एचएसआरपी नंबर प्लेट गायब.

संतोष पंडितांनी नेहमीप्रमाणे काच खाली घ्यायला लावली आणि प्रश्न विचारला. गोपीचंद पडळकर संतापले. ते म्हणाले, “पहिल्यांदा व्हिडिओ बंद कर.” एचएसआरपी नंबर प्लेट विचारतो म्हणजे काय? सत्ताधारी आमदारांना असे प्रश्न विचारायचे असतात का? संतोष पंडित विचारत राहिले. तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अर्थातच त्याची खूप चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्याच्यामुळे पक्षाची असेल, नेत्यांची असेल, प्रतिमा थोडीफार मलीन झाली, अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या.

मग आता रस्त्यावर संतोष पंडितांनी भाजपला अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर आला ३ सप्टेंबर. पहाटेचे साडेबारा-एक वाजले होते. संतोष पंडित आपल्या घरात झोपलेले होते. पंडितांच्या दारावर थाप मारण्यात आली. दार वाजवण्यात आलं, खिडक्या वाजवण्यात आल्या. संतोष पंडित उठायला तयार नव्हते. पोलिसांनी मग काचेच्या खिडक्या वाजवल्या. त्यानंतर संतोष पंडित बाहेर आले आणि मग पोलिस त्यांना घेऊन गेले. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांनी अश्लील हातवारे केल्याचा, चुकीच्या पद्धतीने चंद्रकांत दादा पाटील आणि नगरसेविका सावळेकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

मुद्दा असा आहे की, कायदा त्याचं काम करेल. मी तुम्हाला क्रोनोलॉजी सांगितली की संतोष पंडितांनी काय-काय केलं. प्रश्न असा आहे की, प्रश्न विचारायचे की नाही? विरोधक म्हणतात की नागरिकांना सायलेंस करण्याचा हा प्रयत्न आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट केलेलं आहे. त्यानंतर रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी ट्विट केलेलं आहे.

विद्यानंद बापट असो किंवा संतोष पंडित असो किंवा अन्य कोणी नागरिक असो, या प्रत्येकाला तितकेच अधिकार आहेत जितके सत्तेत बसलेल्या आमदार-खासदारांना किंवा पंतप्रधानांना आहेत. आता प्रश्न असा आहे की, जर प्रश्न विचारल्यामुळे अशा पद्धतीने विद्यानंद बापटांसारख्या एखाद्याला मारहाण होत असेल, तर त्याच्यातून मेसेज काय द्यायचा? जर तुम्ही सरकारविरोधात किंवा एखाद्या संस्था-संघटनेविरोधात बोललात, तर तुम्हाला अशा पद्धतीने भररस्त्यात मारहाण केली जाईल आणि तुमच्या बचावाला कोणी येणार नाही, हा संदेश द्यायचा आहे का? भीती दाखवायची? दहशत निर्माण करायची?

धीरज घाटेंनी “त्यांना कुत्रं विचारत नाही,” असं म्हणून एका प्रकारे त्यांचा प्रतिवाद करण्याऐवजी त्यांच्यावर अरेरावी करण्याचा केलेला प्रयत्न काय दर्शवतो? प्रश्न आहेत. विद्यानंद बापट या एकमेव गृहस्थाचं हे म्हणणं आहे का महाराष्ट्रामध्ये की डीजेमुक्त जयंती, पुण्यतिथी, गणेशोत्सव, देवीचे उत्सव असले पाहिजेत? अगदी गणपतीलाही, ज्याला आपण १४ कला आणि 64 विद्यांचा अधिपती म्हणतो, त्या गणेशाला सुद्धा अशा पद्धतीचा उत्सव अपेक्षित आहे का? की त्याच्या उत्सवामध्ये अशा डीजेच्या भिंती उभ्या करून लोकांना त्रास देऊन, रस्त्यावर अश्लील अविर्भाव करत नाचणं अपेक्षित आहे?

त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणी कुठे काय तक्रार केली, हे ऐकिवात नाही. संतोष पंडित या नागरिकाने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला आणि म्हणून त्याला ही शिक्षा झाली आहे का, हा प्रश्न आहे. त्यांनी भाषेच्या, देहबोलीच्या मर्यादा पाळायला हव्यात, याबद्दल कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही. पण मग एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या आमदार-खासदारांच्या गाड्यांवर 31 ऑगस्ट ते आज 3 सप्टेंबरपर्यंत काय कारवाया केल्या? किती चलन फाडलेली आहेत?

रस्त्यावर साधा हेल्मेट नसेल मुंबईसारख्या शहरामध्ये आणि जर व्यक्ती थांबला नाही, तो समोरून निघून गेला, तर पोलीस मागून फोटो काढतात आणि तुमच्या घरी दंडाची पावती येते. ज्या रस्त्यावर 60 चा स्पीड असताना 61 किंवा 62 किलोमीटर प्रतितास वेगाने तुम्ही गाडी चालवली, तर दोन हजार रुपयांची दंडाची पावती येते. त्या देशामध्ये, त्या रस्त्यांवर या आमदार-खासदारांना काहीच नियम नाहीयत का? एचएसआरपी नंबर प्लेट नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर संतोष पंडितांना सुद्धा सायलेंस करण्याचा प्रयत्न झाला.

गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी फोन करून अत्यंत अश्लील शिवीगाळ केली. जर अश्लील हातवारे करणाऱ्याला अटक केली जाते, तर संतोष पंडितांना फोन करून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या, त्यांच्या अख्ख्या खानदानाचा उद्धार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे का? हा प्रश्न आहे.

मला असं वाटतं की, ही जी गंमत आहे, ती समाजातल्या अनेक लोकांना पंडितांना ज्या पद्धतीने अटक केली किंवा ज्या पद्धतीने विद्यानंद बापटांना मारहाण झाली, त्याचं काही लोक समर्थन करतात आणि म्हणून ती गोष्ट मी सुरुवातीला सांगितलेल्या नदीच्या पुराच्या गोष्टीशी जोडली जाते. आपण आपला सद्सद्विवेक जर विसरलो आणि मानसिक गुलामगिरीमध्ये अडकलो, तर आपलं काय होतं? आपल्याला असं वाटू लागलंय की एखाद्या संस्था, संघटना, पक्ष यांनी सांगितलेल्या पद्धतीने उत्सव साजरा करणं म्हणजेच उत्सव. या मानसिक गुलामगिरीला फाटा कोणी द्यायचा प्रयत्न केला, तर ते आपल्याला सहन होत नाही.

मला असं वाटतं की हे दुःख आहे, हे फ्रस्ट्रेशन आहे. बापट म्हणतायत त्याचा प्रतिवाद ते करू शकत नाहीत. बापटांना तार्किक उत्तर देऊ शकत नाहीत. त्यावेळेला ते बापटांना केवळ मारहाण करू शकतात. संतोष पंडितांना ते उत्तर देऊ शकत नाहीत. संतोष पंडितांच्या प्रश्नांचं ते निरसन करू शकत नाहीत. त्यावेळेला संतोष पंडितांवर सायलेंस करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यांना फोनवर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता अत्यंत अश्लील शिवीगाळ करू शकतो. फार-फार तर एफआयआर करू शकतो.

मला असं वाटतं की साधा मेसेज आहे तोंड उघडाल तर तुमचा एक तर बापट होईल किंवा पंडित होईल. मला असं वाटतं की ज्या-ज्या वेळेला अशा पद्धतीचा प्रयत्न कोणी केलाय, त्या-त्या वेळेला हजारो बापट, हजारो पंडित एकाच वेळेला समोर आले पाहिजेत. त्या संस्था, संघटना, पक्ष यांना सुद्धा हजार चेहरे विद्यानंद बापटांचे दिसले पाहिजेत, प्रश्न विचारताना. हजार संतोष पंडित दिसले पाहिजेत, प्रश्न विचारताना.

आपलं काम प्रश्न विचारायचं आहे. सत्तेला कायम प्रश्न विचारणं हेच लोकशाही मजबूत करण्याचं एकमेव साधन आहे. बाकी नदीच्या पुरामध्ये जर घोंगडी वाहत जात असेल, तर तिला हात घालू नका. घातलात तर ती तुम्हाला वाहून घेऊन जाईल. इतकं तिच्यासोबत वाहत जाऊ नका.