फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : 'ते' एक्सक्लुझिव्ह CCTV मुंबई Tak च्या हाती VIDEO

मुंबई तक

02 Sep 2026 (अपडेटेड: 02 Sep 2026, 04:37 PM)

Phaltan Doctor Suicide Case : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई Tak च्या हाती आले आहे.

Phaltan Suicide Case

Phaltan Suicide Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : 'ते' एक्सक्लुझिव्ह CCTV मुंबई Tak च्या हाती VIDEO

point

डॉक्टर राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ

Phaltan Doctor Suicide Case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. या प्रकरणात आता रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच थेट राज्याच्या प्रधान सचिवांकडे धाव घेत, रुग्णालयात होत असलेल्या कथित राजकीय दबावाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील एक EXCLUSIVE CCTV फुटेज मुंबई Tak च्या हाती लागले असून, या फुटेजमुळे डॉ. रूपनवर यांच्यावर झालेल्या दमदाटी आणि मारहाणीच्या आरोपाला बळ मिळाल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : “जर फाशी घेण्याची वेळ आली तरी…”, जरांगेंसोबतच्या चर्चेत जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाल्या?

डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मृत्यूनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना एक मागणीपत्र पाठवले आहे.

या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, रुग्णालयातील वैद्यकीय निर्णयांमध्ये सातत्याने राजकीय हस्तक्षेप होत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना बाहेरून प्रचंड दबावाला सामोरे जावे लागत आहे. या दबावामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून, डॉ. संपदा मुंडे आणि आता डॉ. राजेंद्र रूपनवर या दोन युवा डॉक्टरांच्या मृत्यूमागे हाच दबाव कारणीभूत आहे का, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी. या पत्रावर रुग्णालयातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सह्या केल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे हा केवळ एका डॉक्टरचा मुद्दा न राहता संपूर्ण यंत्रणेवर असलेल्या दबावाचा मुद्दा बनला आहे.

हेही वाचा : Shiv Sena सुनावणी: ठाकरेंवर शिंदेंचा पहिला घाव.. सुप्रीम कोर्टात आज शिंदे गटाची ‘बॅटिंग’; प्रत्येक अपडेट LIVE

EXCLUSIVE CCTV फुटेजमध्ये काय दिसतंय?

या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मानला जात असलेले CCTV फुटेज आता समोर आले आहे. हे फुटेज त्या दिवशीचे आहे, ज्या दिवशी प्रसाद कोंडे-देशमुख हे शस्त्र परवान्यासाठी (गन लायसन्स) वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णालयात आले होते.

फुटेजनुसार घटनाक्रम पाहिला तर त्यात, निळ्या शर्टमध्ये डॉ. राजेंद्र रूपनवर रुग्णालयाच्या परिसरात दिसत आहेत. त्यानंतर प्रसाद कोंडे-देशमुख आणि त्यांचा सुरक्षा रक्षक रुग्णालयात प्रवेश करताना दिसत आहेत. सर्वात शेवटी तत्कालीन वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. लीला मदने घटनास्थळी येताना दिसत आहेत.

या दरम्यानच डॉ. रूपनवर यांना प्रमाणपत्र देण्यासाठी दमदाटी करण्यात आली आणि प्रसाद कोंडे-देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सर्व घटना रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडल्याचा आरोप असल्याने या फुटेजला तपासात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

डॉक्टर संपदा मुंडे यांनीही केली होती आत्महत्या 

धक्कादायक बाब म्हणजे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील हा दुसरा बळी आहे. 2025 मध्ये याच रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी कामाच्या तणावातून आत्महत्या केली होती. वर्षभरात दोन डॉक्टरांचे असे जाणे,  आरोग्य यंत्रणेतील प्रशासकीय अनागोंदी आणि राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर चित्र समोर आणत आहे.

दरम्यान, या प्रकरणात सरकारने वैद्यकीय अधीक्षिका डॉ. लीला मदने यांना निलंबित केले असून, आरोग्य विभागाची स्वतंत्र चौकशी समिती आणि पोलीस तपास सुरू आहे. दादर रेल्वे पोलिसांनी नोंदवलेला ‘झिरो एफआयआर’ आता सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सखोल तपासाचे आश्वासन दिले आहे. पालकमंत्री यांनीही दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

मात्र, आता समोर आलेले CCTV फुटेज आणि कर्मचाऱ्यांनी प्रधान सचिवांकडे केलेली थेट तक्रार यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉ. रूपनवर यांच्या मृत्यूमागे नेमका कोणता राजकीय दबाव होता? रुग्णालयात खरंच गुंडागर्दी चालते का? आणि वर्षभरात दोन डॉक्टरांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस आणि आरोग्य विभागाच्या चौकशीतूनच समोर येतील.

रुपनवर यांचा मृतदेह फलटण उपजिल्हा रुग्णालयात; परिसरात तणाव, संतापाचा उद्रेक!

नुकताच डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मृतदेह फलटण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून, रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक, डॉक्टर आणि विविध संघटनांची गर्दी झाली आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर याच रुग्णालयातील आणखी एका युवा डॉक्टरच्या मृत्यूने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे... सध्या रुग्णालय परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.