shahajibapu patil emotional phone call about manoj jarange patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील अंतरवाली सराटीत पोहोचले. पोहोचताच क्षणी शहाजीबापू पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाया पडले. त्यानंतर आंदोलनस्थळी घोषणा होताच वातावरण बदलले. जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती बिघडलेली असल्याचे पाहून शहाजीबापू पाटील भावुक झाले. त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची परिस्थिती अत्यंत बिकट आणि नाजूक असल्याचे सांगत सरकारने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: मुलीच्या भविष्यासाठी SSY की PPF? जाणून घ्या कोणती योजना फायदेशीर
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर
शहाजीबापू पाटील यांनी मराठा समाजाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय शेती असून जमिनीचे तुकडे होत चालल्याने पुढील पिढ्यांसमोर मोठे प्रश्न निर्माण होत असल्याचे नमूद केले. स्वतःच्या कुटुंबातील शेतीचे उदाहरण देत त्यांनी जमिनीचे विभाजन होत गेल्यानंतर शेतीचे क्षेत्र कमी होत असल्याचे सांगितले. आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील मराठा समाजाचे लक्ष अंतरवाली सराटीकडे लागले असल्याचेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे पाहून परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : रात्री घराबाहेर पडली अन् अचानक गायब! बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खळबळ
'जरांगे पाटलांची प्रकृती पाहता शक्य तितक्या लवकर सरकारने निर्णय घ्यावा'
या प्रश्नावर सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांवर विश्वास व्यक्त केला. काही लोकांकडून चुका झाल्या असतील, मात्र शिंदे यांची तळमळ प्रामाणिक असल्याचे त्यांनी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगितले. शहाजीबापूंनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलण्याची तसेच शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधण्याची भूमिका मांडली. सगळी माणसं या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असून मनोज जरांगे पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने सुरू केलेल्या उपोषणाला यश मिळाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकारने आज-उद्या नव्हे, तर जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
मराठा समाजाच्या कुणबी दाखल्यांच्या मागणीचाही शहाजीबापू पाटील यांनी उल्लेख केला. ज्यांचे दाखले रोखले जात आहेत, त्यांना सद्बुद्धी मिळावी आणि नियमानुसार कुणबी दाखले मिळावेत, ही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्यात मराठा समाज बसत असल्याचा दावा करत त्यांनी पूर्वजांच्या नोंदींमध्ये नाव आढळत असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील हे तमाम मराठा समाजाचा गावगाडा चालवण्यासाठी संघर्ष करत असल्याचे सांगत शहाजीबापूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आपण तरुण असताना अण्णासाहेब पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालो होतो, अशी आठवणही त्यांनी सांगितली. सध्याच्या आंदोलनासाठी तरुणांनी केलेल्या उठावाचे त्यांनी आभार मानले आणि मराठा समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी सरकारकडे मागणी केली.
ADVERTISEMENT












