कोथरुडच्या कुलकर्णी आणि पेठेतले बापट, ध्वनी प्रदुषणावर बेधडक चर्चा VIDEO

मुंबई तक

31 Aug 2026 (अपडेटेड: 31 Aug 2026, 10:26 AM)

Medha kulkarni and Vidyanand Bapat interview : पुण्याच्या गणेशोत्सवातील DJ, ढोल-ताशे, ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर मेधा कुलकर्णी आणि विद्यानंद बापट यांची रोखठोक भूमिका.

Medha kulkarni and Vidyanand Bapat interview

Medha kulkarni and Vidyanand Bapat interview

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्याच्या गणेशोत्सवावरील रोखठोक चर्चा पाहा फक्त 'मुंबई Tak' वर..

point

DJ आणि कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत

Medha Kulkarni | Vidyanand Bapat Interview : पुण्याच्या गणेशोत्सवात DJ, ढोल-ताशे आणि कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवातील जल्लोष, परंपरा आणि उत्सवाचा आनंद एका बाजूला, तर नागरिकांना होणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास आणि नियमांचे पालन करण्याची मागणी दुसऱ्या बाजूला आहे. याच पार्श्वभूमीवर कोथरूडच्या मेधा कुलकर्णी आणि पेठेतील विद्यानंद बापट यांच्यासोबत पुण्याच्या गणेशोत्सवावर विशेष चर्चा करण्यात आली. दोघांनीही आपल्या भूमिकेतून DJ, आवाजाची मर्यादा, गणेश मंडळांचा उत्साह, नागरिकांच्या तक्रारी, मिरवणुका आणि पुण्याच्या बदलत्या उत्सव संस्कृतीवर रोखठोक मत मांडले. मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की त्या आस्तिक असून सण-उत्सवांना त्यांचा विरोध नाही; मात्र उत्सव साजरा करताना दुसऱ्याला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या मते, स्वातंत्र्याचा उपयोग दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची गळचेपी होईल अशा पद्धतीने करता येणार नाही.

हे वाचलं का?

हेही वाचा : गर्भवती महिला कॉन्स्टेबलच्या डोक्यात रॉडने केले वार, पोलीस स्टेशनमध्येच रक्तरंजित थरार

'सार्वजनिक रस्त्यांवर ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये'

मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, पुणे शहरात DJ किंवा ढोल-ताशांचा आवाज प्रमाणाबाहेर गेल्यास नागरिकांचे फोन येतात आणि त्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून आवाज कमी करण्याबाबत सांगितले जाते. त्यांच्या मते, ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न केवळ DJ पुरता मर्यादित नसून सर्व प्रकारच्या वाद्यांना लागू होतो. पारंपरिक वाद्ये असली तरी त्यांची संख्या, आवाजाची पातळी आणि कालावधी यांचा विचार झाला पाहिजे. त्यांनी सांगितले की काही गणेश मंडळांनी DJ न वापरण्याचा निर्णय घेतला असून सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक देखावे, व्याख्याने, कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे त्यांनी कौतुक केले. गणेशोत्सवाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. सार्वजनिक रस्त्यांवर ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यावरही त्यांनी भर दिला.

हेही वाचा : मनोज जरांगेंनी खासदार बंडू जाधवांना दम भरला, फोनवर काय बोलून गेले? VIDEO

'गणेशोत्सवाचा मूळ उद्देश समाजप्रबोधनाशी जोडला तर महत्त्व कायम राहील'

विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक कोंडी या सामाजिक समस्या असून त्यांची धर्म आणि धार्मिक स्वातंत्र्याशी गल्लत करू नये, अशी भूमिका मांडली. त्यांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात वाद्ये वाजवल्याने आजूबाजूच्या नागरिकांना सक्तीचे श्रोते बनवले जाते आणि शांततेत जगण्याच्या त्यांच्या अधिकारावर परिणाम होतो. ढोल-ताशे पारंपरिक आहेत म्हणून त्यांना वेगळे नियम आणि DJला वेगळे नियम असणे तार्किक नाही, असेही त्यांनी सांगितले. पारंपरिक वाद्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करायचे असल्यास बंदिस्त आणि ध्वनिरोधक जागेत ते आयोजित करता येतील, अशी त्यांची भूमिका आहे. मिरवणुकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रुंद रस्त्यांवर मर्यादित मार्ग खुला ठेवून मिरवणूक काढण्याचा पर्याय त्यांनी मांडला. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश समाजप्रबोधनाशी जोडला गेला तर त्याचे महत्त्व कायम राहील, मात्र केवळ धांगडधिंगा, कर्णकर्कश आवाज आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण करणाऱ्या पद्धतीला त्यांनी विरोध केला.

या चर्चेत दोघांनीही सण-उत्सव बंद करण्याची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. मेधा कुलकर्णी यांनी सणांची पद्धत बदलण्याची गरज असल्याचे सांगताना धर्म, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधण्यावर भर दिला. त्यांनी DJमुक्त गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांचे स्वागत केले. विद्यानंद बापट यांनीही ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न सर्व धर्मांना समान पद्धतीने लागू झाला पाहिजे, असे सांगितले. ईद, इतर धार्मिक सण, जयंती आणि मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषण तसेच वाहतुकीला होणारा अडथळा यांनाही समान निकष लागू असावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात DJ, ढोल-ताशे, आवाजाची मर्यादा, नागरिकांच्या तक्रारी, परंपरा आणि उत्सवांच्या बदलत्या स्वरूपावरून निर्माण झालेल्या या चर्चेत कोथरूडच्या मेधा कुलकर्णी आणि पेठेतील विद्यानंद बापट यांच्या भूमिका समोर आल्या आहेत.