SIR Form In Xerox Shop : नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 19 मधील एका झेरॉक्सच्या दुकानात निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेचे मूळ अर्ज मोठ्या प्रमाणावर झेरॉक्स करण्यासाठी आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका नागरिकाने या दुकानामध्ये हे शासकीय अर्ज झेरॉक्स होताना पाहिले आणि दुकानदाराकडे चौकशी केली. हे अर्ज भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याकडून आणण्यात आल्याचे समजल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत पोलिसांना पाचारण केले.
ADVERTISEMENT
कार्यकर्ता पोलीस ठाण्यातून पळाला?
या घटनेदरम्यान घटनास्थळी जोरदार वाद आणि झटापट झाली. भाजप कार्यकर्त्यावर दादागिरी करून अर्जांच्या बॅगा तिथून हलवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या संवेदनशील वैयक्तिक माहितीचा, जसे की मोबाईल नंबर आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा, गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व कागदपत्रे आणि संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले; मात्र पोलीस ठाण्यातून तो कार्यकर्ता पळून गेल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
हे ही वाचा : Personal Finance: Home Loan घेताना लोक करतात या 5 मोठ्या चुका...
भाजप कार्यकर्त्याकडे कसे पोहोचले?
केवळ बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असणे अपेक्षित असलेले हे मूळ अर्ज भाजप कार्यकर्त्याकडे आलेच कसे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण माहितीच्या सुरक्षेवर आणि डेटा लीकच्या शक्यतेवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून, या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
हे ही वाचा : जळगाव : पहाटे घराबाहेर पडले अन् रेल्वेखाली झोकून दिले; दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या
गोपनीय डेटाचा गैरवापर
या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाची ही मोहीम फसवी असून या माध्यमातून गोपनीय डेटाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता पोलीस आणि निवडणूक आयोग या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












