'एक कोटी खोका मतदाराला धोका..' ठाकरेंचे नगरसेवक फोडताच पोस्टर्स..

मुंबई तक

28 Aug 2026 (अपडेटेड: 28 Aug 2026, 09:20 AM)

dharashiv politics : धाराशिव नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. भाजपमध्ये जाण्याऐवजी इंदापूरहून परतवून त्यांना पक्षात आणल्याची चर्चा आहे.

dharashiv politics

dharashiv politics

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'एक कोटी खोका मतदाराला धोका..'

point

ठाकरेंचे नगरसेवक फोडताच पोस्टर्स..

Dharashiv Politics, गणेश जाधव : धाराशिव नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, इंदापूरपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला अचानक कलाटणी मिळाली. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या संपूर्ण घडामोडीला ओमराजे निंबाळकर यांचे ‘ऑपरेशन टायगर’ असे संबोधले जात आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : अंबरनाथ : कारमधून उपचारासाठी नेताना अल्पवयीन भाचीवर अत्याचार, मामाला अटक

'एक खोका मतदारांना दिला धोका'

धाराशिव नगरपरिषदेचा विचार केला तर एकूण सात नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. त्यापैकी चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे पक्षांतरबंदी कायदा लागू होतो का, तसेच पुढील काळात कैलास पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धाराशिव शहरात या पक्षप्रवेशाच्या निषेधार्थ उपहासात्मक बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘एक खोका मतदारांना दिला धोका’, ‘क्लीन समताचा दाढीवाला बोका’, ‘एक कोटीचा गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही’, ‘आमचं मत आम्हाला परत द्या’ आणि ‘एक कोटी घेऊन निष्ठा विकली’ अशा आशयाचे बॅनर्स शहरात झळकले आहेत.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या विश्रांतीचे कारण काय? IMD विभागाचा अंदाज

राजकीय आश्वासने दिली गेल्याचीही चर्चा

हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धाराशिवहून मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, रातोरात राजकीय चक्रे फिरली आणि इंदापूरहून त्यांना परत आणण्यात आले. ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सूरज साळुंके, ऋषी मगर आणि सोमनाथ गुरप यांनी आपली यंत्रणा फिरवत या नगरसेवकांना परत आणण्यात यश मिळवल्याची चर्चा आहे. या प्रक्रियेत काही राजकीय आश्वासने दिली गेल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, भाजपमध्ये प्रवेशासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनीही प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना शह देण्यासाठी ओमराजे निंबाळकर स्वतः मैदानात उतरले आणि चार नगरसेवकांना आपल्या पक्षात दाखल करून घेतले.

वास्तविक पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापैकी एका नगरसेवकाचा अद्याप ठावठिकाणा समोर आलेला नाही आणि त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. तर सोनाली रवी वाघमारे आणि ज्ञानेश्वरी राज निकम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कैलास पाटील यांनी ‘गद्दारांना क्षमा नाही’, अशी भूमिका घेत पक्षाशी गद्दारी करून पक्षनिष्ठा विकल्याचा आरोप केला आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ओमराजे निंबाळकर यांनी जनसेवा आणि विकासासाठी या नगरसेवकांचे स्वागत असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कळम नगरपरिषदेचे नगरसेवक भाजपच्या गोटात गेल्यानंतर आता धाराशिव नगरपरिषदेतील चार नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे कैलास पाटील यांच्यासमोर भाजपचे मल्हार राणा पाटील आणि शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर या दोन्ही नेतृत्वांना सामोरे जाण्याचे आव्हान उभे राहिले आहे. आगामी काळात या घडामोडींमुळे धाराशिवचे राजकीय चित्र कसे बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.