MPSC drug inspector group b recruitment cancelled : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगामार्फत या पदासाठी २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेनंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?
परीक्षेतील गैरप्रकाराबाबत ईमेलद्वारे तक्रारी अन् गैरप्रकार झाल्याचे समोर
यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ जुलै २०२६ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. २२ जुलै रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ४८५ आणि अपात्र ठरलेल्या ३ अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर २२ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत आयोगाला काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून परीक्षेतील गैरप्रकाराबाबत ईमेलद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या.
हेही वाचा : 'पप्पा, मला सोडून जाऊ नका', कुणालच्या मावशीने आणखी काय सांगितलं?
एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे चौकशीतून समोर
या तक्रारींमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच २० मार्च २०२६ रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाले होते आणि ही प्रश्नपत्रिका सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती, असा दावा करण्यात आला होता. तक्रारींचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आयोगाने २७ जुलै २०२६ रोजी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस उपआयुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई यांनी आयोगाला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला.
गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे चौकशीत दिसून आले आहे. या प्रथमदर्शनी निष्कर्षाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता, निष्पक्षता आणि आयोगावरील उमेदवारांचा विश्वास कायम राखण्याच्या दृष्टीने आयोगाने औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेबाबतचे स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT












